राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांना मारहाण; भाजप नगरसेवकासह इतरांवर गुन्हा दाखल

लहान मुलांच्या भांडणातून हाणामारीची घटना नगर शहरातील एकवीरा चौकात शनिवारी रात्री 10 वाजणाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. चत्तर यांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकासह आठ ते नऊ जणांविरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच महिन्यात मारहाणीच्या दोन घटना घडल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी आता तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकवीरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते. हे भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. हे भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना जायला सांगितले. त्याच वेळी त्या ठिकाणी राजू फुलारी यांनी अंकुश चत्तर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले. त्यानंतर दोन मोटार सायकलवरून काही मुले आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाडया तेथे आल्या आणि त्यातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता. तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. तू स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय, अशी विचारणा करत मारहाण केली. त्यावेळी स्वप्निल शिंदे त्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे,नसेल संपला तर त्याला संपवुन टाका असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण केली.

रक्ताच्या थारोळ्यामध्ये अंकुश त्या ठिकाणी पडला होता. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अंकुश चत्तर व भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. नेमके वाद कशामुळे होते याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या घटनेची माहिती घेतली. अंकुश याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरांमध्ये या अगोदर याच महिन्यामध्ये ओंकार भागानगरे याची धारदार शस्त्राने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच आता दुसऱ्यांदा ही घटना याच तोफखाना हद्दीमध्ये घडल्यामुळे चर्चा होत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप नगरसेवक शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर रात्रीतून ते सर्वजण फरार झाले आहेत. पहाटेच्या सुमाराला पोलिसांनी या प्रकरणातील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. अंकुश याची तब्येत खालावली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.