भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

– प्रा. शकुंतला रवींद्र पाटील

हिंदुस्थानचे पहिले गृहमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्याचा लाचलुचलपत प्रतिबंधक विभाग संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृतीचे व समाज प्रबोधनाचे कार्य दरवर्षी करीत असतो. या वर्षीदेखील 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2018 हा सप्ताह भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती सप्ताह म्हणून राबविला गेला. त्यानिमित्त हा लेख…

भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा संचार जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. असे एकही वर्तमानपत्र नाही  ज्यामध्ये भ्रष्टाचाराची बातमी नाही आणि असा एकही दिवस नाही की, त्याबाबत तुम्हाला भ्रष्टाचाऱयाची बातमी वाचायला मिळणार नाही. ‘लोभ आणि मोह’ या हव्यासातून भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा जन्म होतो.

लोकसंख्यावाढ, वाढलेल्या मूलभूत गरजा आणि मागणी पुरवठय़ांमधील तफावत, जीवघेणी स्पर्धा यातूनच मग उपाय, इलाज यासाठी झगडताना कळत-नकळत दिलेली लाच हीच भ्रष्टाचाराला केलेली साथ आहे. चांगल्या कार्यासाठी दिले गेलेले बक्षीस भ्रष्टाचारात कसे परावर्तित झाले हे अजूनही समजलेले नाही. माणूस जन्माने कधीच भ्रष्ट नसतो. अतृप्त इच्छा, हव्यास, लोभ, मोह, दुर्बलता, ईर्ष्या, आर्थिक सामाजिक परिस्थिती हीच खऱया अर्थाने एका मनुष्यास भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते. यासाठी खोलवर विचारमंथन करण्याची गरज आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यक्रमाला जनतेने साथ देणे अत्यंत गरजेचे आहे. 1947 साली लाचलुचपत विरोध कायदा संमत झाला व लाच देणेघेणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, त्यास कडक शासन होऊ शकते, हेच या उपक्रमाद्वारे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. ते त्यांचे काम करीत असताना या कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद जनतेकडून मिळणे हादेखील फार महत्त्वाचा भाग आहे. कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. भ्रष्टाचाराविषयी प्रत्येकाच्या मनात चीड असते. ‘‘पण मला काय करायचे आहे? मी का मांजराच्या गळय़ात घंटा बांधायला जावं?’’ या भावनेने व विचाराने लोकांच्या मनात लागलेली आग एका क्षणात विझून जाते. हा वणवा तिथेच शिथील होतो. म्हणूनच की काय, लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी जनतेचे सहकार्य मिळाल्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपले कार्य नेटाने पुढे नेऊ शकत नाही. कारण भ्रष्टाचार करणारा नेमका वेचून देणे हे केवळ भ्रष्टाचाराला बळी पडणाऱया जनतेच्या हातात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अखत्यारीत कोणते विभाग येतात हे समजून घेणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्र, नोकरशाही, जमीन मालमत्ता व्यवहार, महसूल विभाग, शिक्षण क्षेत्र व सेवा क्षेत्रे, वैद्यकीय क्षेत्र, धर्मादाय क्षेत्र इत्यादी खाती व विभाग हे भ्रष्टाचार कायद्याच्या चौकटीत नसतात. नैतिकता बाजूला सारून होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी जीवनमूल्यांचं शिक्षण समजणे गरजेचे आहे. त्यासाठी लहानपणापासून प्रामाणिकपणा सत्शीलता, विवेक इत्यादी गुण अंगी बाणवणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान हे कोणा एका व्यक्तीचे कार्य नसून ती एकत्रितपणे राबवण्याची चळवळ असावी असे मला वाटते.

प्रत्यक्ष लाच घेणाऱया कर्मचाऱयास पकडण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासून सापळा रचलेला असतो, परंतु कधीही या सापळय़ाची गुप्तता भंग होत नाही. प्रत्यक्ष पैसे घेताना रंगेहाथ पकडणे म्हणजे नक्की काय असते हे आपल्याला ठाऊक नसते. त्यासाठी पडद्यामागे अनेक अधिकारी एकाच प्रकरणात कार्यरत असतात. कधी कधी काही महत्त्वाच्या सापळय़ात त्यांच्यातील अधिकाऱयांनाही आपल्यासोबत आणखी कोण कोण काम करत आहे हे ठाऊक नसते. योग्य वेळ आल्यावर सगळे बहिर्जी नाईक एकमेकांसमोर येतात. तोपर्यंत कुणालाच थांगपत्ता लागत नाही. या अधिकाऱयांच्या या प्रामाणिकपणाला सलाम करावासा वाटतो. पोलीस दलातील लाचलुचपत प्रतिबंधक खाते हे कोणालाही न जुमानता स्वायत्तपणे काम करते. याकरिता या खात्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक जनतेने पुढे येऊन तक्रारी करणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचार करणारा जितका दोषी, तितकाच लाच देणाराही दोषी असतो हे आता 26 जुलै 2018 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेत अगदी स्पष्टपणे व ठासून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हा एकांगी अपराध नाही तर तो दोन्ही पक्षांकडून होतो हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फक्त शासकीय नोकर, लोकसेवक किंवा मंत्रीसंत्री हे या कायद्याप्रमाणे दोषी नाहीत, तर जे लाच देऊन त्यांची खरीखोटी काम करून घेण्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे शासकीय यंत्रणा राबवून घेण्याचा प्रयत्न करीत त्यासदेखील या नवीन सुधारित कायद्याप्रमाणे शासन होईल याची कृपया आपण देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून जाण ठेवणे आवश्यक आहे हे लक्षात असू द्या.

आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱयातून फक्त 1064 या फोन नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकतो. त्यासाठी कोणतेही दूरध्वनी शुल्क आकारले जात नाही. ही सेवा पूर्णपणे ‘टोल फ्री’ आहे. या प्रभावी माध्यमाचा वापर करून आपल्या भ्रष्ट यंत्रणा व ती राबवणारे भ्रष्ट अधिकारी/अंमलदार यांचा पर्दाफाश करण्यासाठी उपयोग करायला हवा. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेने लाचलुचपत प्रतिबंधक खात्यास खारीच्या वाटय़ाने मदत करावी.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे

संपर्क क्रमांक संग्रही ठेवावेत.

  1. टोल फ्री दूरध्वनी…1064
  2. दूरध्वनी…022-24921212
  3. फॅक्स क्रमांक…022 – 24922618
  4. संकेतस्थळ…www.acbmaharashtra.gov.in
  5. ई-मेल…[email protected]

[email protected]

  1. फेसबुक…www.facebook.com-maharashtraACB
  2. मोबाईल ऍप…www.acbmaharashtra.net
  3. ट्विटर…ACB_Maharashtra
  4. व्हॉट्स ऍप क्रमांक…9930997700
  5. कार्यालयीन पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, प्लॉट क्र. 91, सर पोचखानवाला रोड, वरळी पोलीस कॅम्प, वरळी, मुंबई-400030.