तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धाराशिव

तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अपात्र ठरविले आहे. नगराध्यक्षा गंगणे या एक कोटी ६१ लाख रुपयांच्या तुळजाभवानी यात्रा अनुदान घोटाळ्यासह घरकुल घोटाळ्यात मुख्य आरोपी होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर होत्या. या कारणाने त्यांचे पद जिल्हाधिकारी गमे यांनी रद्द केले. याप्रकरणी राजाभाऊ माने यांनी घोटाळा उघड करीत पद रद्द करण्याची तक्रार दिली होती.

तुळजाभवानी यात्रा अनुदान व घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी अर्चना विनोद गंगणे यांचे नगराध्यक्ष पद व घोटाळ्यातील संबंधित आरोपी नगरसेवकांची नगरसेवक पदे रद्द करून नगरपरिषद बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक करण्याची तक्रार तुळजापूर येथील समाजसेवक राजाभाऊ दिगंबर माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १६ जून २०१७ रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यावर याप्रकरणी तब्बल एक वर्ष सुनावणी झाल्यानंतर अखेर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्याने नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. जिल्हाधिकारी गमे यांच्या या आदेशामुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे.