रंगभूमी – हा खेळ बाहुल्यांचा

>> अभिराम भडकमकर

आपल्याकडे लोकनाटय़ आणि लोककला हा एक वेगळाच विभाग मानला जातो. त्यालाही आदर आहे, सन्मान आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर, विशेषत बिहार आणि बंगालमध्ये जाणवतं की, लोककला आणि नाटक यांचा एक सुरेख असा संगम तिथे दिसून येतो.

तुम्ही जसजसे आपला प्रदेश सोडून बाहेर जाता, तसतशा अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या शक्यता तुम्हाला आढळू लागतात. सध्या मी पश्चिम बंगालच्या दौऱयावर आहे. मागच्या लेखात बिहारच्या नाटय़ महोत्सवांचा अनुभव मी मांडला होता. आता मी पश्चिम बंगालमधल्या वेगवेगळ्या नाटय़ महोत्सवांमध्ये हजेरी लावतो आहे. तिथे नाटय़ लेखनाच्या कार्यशाळाही घेतो आहे. आपल्याकडे नाटक म्हटलं की, दिवाणखाना किंवा समीप रंगमंचावर, मोकळ्या रंगमंचावर काही लेवल्स, काही मोडे, घरांच्या चौकटी आणि सूचक नेपथ्य, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी वापरून उभं केलेलं नाटक आपल्याला दिसतं.

मी इथे लोककला गृहीत धरलेल्या नाहीत. कारण आपल्याकडे लोकनाटय़ आणि लोककला हा एक वेगळाच विभाग मानला जातो. त्यालाही आदर आहे, सन्मान आहे, परंतु मला महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर, विशेषत बिहार आणि बंगालमध्ये जाणवलं की, लोककला आणि नाटक यांचा एक सुरेख असा संगम तिथे होताना दिसतो. त्यावर सविस्तर असं नंतर मी लिहिणार आहेच. आज बोलणार आहे ते एका छान नाटकाबद्दल. ‘बेहुला लोखिंदर’ पालाबद्दल. ‘बेहुला लोखिंदर’ हे नाव आणि पाला म्हणजे नाटक.

मला असं सांगण्यात आलं की, हा एक प्रकारचा पपेट शो आहे. आपल्याकडे पाध्ये कुटुंब पपेट शो म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं, पण महाराष्ट्राबाहेर खूप ठिकाणी पपेट्स खेळवल्या जातात. बाहुल्या खेळवणारे नाटकाचे ग्रुप्स आहेत, ते शिकवणाऱया शाळा आहेत. कार्यशाळा घेतल्या जातात. एकूणच बाहुल्यांचा रंगमंच हा मोठय़ा प्रमाणावर बाहेर आढळतो. मला खूपच उत्सुकता होती. कारण कळसूत्र म्हणजे सूत्र, दोऱयांनी खेळवलेल्या बाहुल्या, शेडो पपेट असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, पण या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे या नाटकामध्ये पपेट्स म्हणजे बाहुल्या या बाहुल्या नव्हत्या, तर माणसांनीच बाहुल्यांची कामं केली होती. म्हणजे शरीर माणसाचं, नटाचं. पात्र खेळायचं ते बाहुलीचं आणि ती बाहुली जे सादर करते आहे ते पात्र परत माणसाचं. किती गमतीदार आहे ना? म्हणजे माणसांनी बाहुल्यांसारखा हावभाव करायचा, बाहुल्यांसारखे वागायचं. जणू काही आपल्या हातांना दोऱया बांधलेल्या आहेत आणि त्या दोऱया कुणीतरी हलवता आहे आणि त्यानुसार आपण अभिनय करतो आहोत असं दाखवायचं. प्रत्यक्षात मात्र मनुष्य बाहुली होऊन समोर येतो आणि बाहुली मनुष्याची कहाणी आपल्याला सांगते. मला ही पद्धतच फार गमतीदार वाटली.

नाटक एका पौराणिक कथेवर होतं. म्हणजे मनसा नावाची एक देवी जिला लोकांमध्ये मानसन्मान नसतो. ती एका व्यापाऱयाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विघ्नं आणते आणि अखेर तो व्यापारी तिला वचन देतो की, मी तुझा मान राखेन. मात्र त्याचाही एक वेगळाच अहंकार आहे. त्या अहंकारापोटी तो तिला सांगतो, मी तुझी पूजा करेन, पण तुझ्याकडे पाठ करून. आणि डाव्या हाताने. अशी एकूण मनसा देवीची कहाणी या बाहुल्यांनी म्हणजे बाहुल्या झालेल्या माणसांनी सादर केली.

हे पाहताना एक गोष्ट जाणवली की, आपलं शरीर बाहुलीचं करायचं आणि आपल्या शरीराचे नियंत्रण कुठल्या तरी दोरीच्या हातामध्ये आहे आणि ती दोरी आपल्याला हलवते आहे अशा पद्धतीची एक योजना असल्याचे भासवत आपली देहबोली त्या प्रकाराने वापरायची. बरं, संवाद हे रेकॉर्ड केलेले होते. कारण बाहुल्यांच्या खेळांमध्ये बाहुल्या थोडी संवाद म्हणतात! आणि मग आपण ते संवाद कुणीतरी पाठीमागून आपलं तोंड हलवून म्हटले जात आहेत अशा पद्धतीने सादर करायचे आणि मग त्याच्यामध्ये नृत्य होतं, मारामारी होते, तलवारबाजी होते. साप माणसाला चावणं वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी होतात आणि अत्यंत मनोरंजक अशा पद्धतीने ही बाहुल्यांची – नव्हे, बाहुल्यांनी सादर केलेली माणसांची – नव्हे, माणसांनी बाहुल्या होऊन सादर केलेली माणसांची आणि देवांची गोष्ट आपल्यासमोर सादर होते.

कलकत्त्यापासून लांब लाभपूर नावाच्या छोटय़ाशा खेडय़ामध्ये ‘वीरभूम संस्कृती वाहिनी’ ही संस्था उज्ज्वल मुखोपाध्याय नावाचे एक रंगकर्मी चालवतात. ‘कल्चर आणि कल्टिवेशन’ हा त्यांच्या नाटय़ संस्थेचा नारा आहे. ते आपल्या सर्व सहकाऱयांसोबत शेती करतात आणि त्याच सोबत या सर्व सहकाऱयांसोबत नाटकही करतात. या नाटकाचे लेखनही त्यांचं होतं आणि दिग्दर्शनसुद्धा. पौराणिक कहाणी असल्यामुळे त्यात अद्भुत रस जरी असला तरी हास्यरस, करूण रस यांचाही समावेश त्यांनी त्यात केला होता आणि एक छान मनोरंजक आणि छोटासा विचार देऊन जाणारं हे नाटक सादर केलं होतं. मला माणसांनी बाहुल्या होणं हे खूप रंजक वाटलं. त्यांची वेशभूषा आणि रंगभूषा ही बाहुल्यांसारखी अधिक मेकअपचा वापर केलेली, पण त्यामुळेच त्या बाहुल्या दिसत होत्या. ‘पेट पपेट’ असा एक शब्द त्यांनी वापरला होता. म्हणजे या बाहुलीच्या- अभिनेत्याच्या पोटावर चेहरा रंगवलेला होता. म्हणजे त्याचं पोट हा त्याचा चेहरा आणि हात वर मुडपलेले. त्यामुळे ही खूप गमतीदार दिसणारी एक बाहुली खूप रंगत आणत होती.

छोटंसं खेडं, आजूबाजूचे रहिवासी हाच प्रेक्षक वर्ग, पण मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं की, छोटय़ा छोटय़ा खेडय़ांमध्ये अशा प्रकारचे रंगमंच उभे केले आहेत. आपल्याकडे प्रभाकर पणशीकरांनी छोटय़ा छोटय़ा खेडय़ांमध्ये अशा पद्धतीच्या नाटकांच्या जागा निर्माण केल्या होत्या आणि काही दिवसांनी त्या रंगमंच म्हणून लोकांनी स्वीकारल्या. मराठी नाटक खेडय़ापाडय़ांमध्ये पुन्हा एकदा पोहोचू लागलं. तसंच काहीसं बंगालच्या अगदी टोकाच्या खेडय़ामध्ये अशा पद्धतीचे नाटक आणि तेही असा बाहुल्यांचा प्रयोग पाहणं मला खूप छान वाटलं. यातले सर्व कलावंत शेती करतात आणि उत्तम अभिनय करतात, विविध वाद्ये वाजवतात आणि सुरेल गातात, तालबद्ध लयबद्ध थिरकतात.

बाहुल्या झालेल्या या माणसांनी माणसांच्या आयुष्यामध्ये खूप छान रंगत आणली एवढं मात्र खरं. अशा पद्धतीचे नाटक आपल्या पुण्या -मुंबईकडे फारसं पाहायला मिळत नाही. व्यक्ततेची ही एक शक्यता मला जाणवली आणि लक्षात आलं…सर्जनाला नसतो किनारा!

(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)