>> अरुणा सरनाईक
लहानपणी ऐकलेल्या कथांमध्ये नेहमी चांगलं आणि वाईट अशा दोन मनाच्या गोष्ट सांगितल्या जायच्या. तेव्हा वाटायचं, आयुष्यातल्या चांगल्या घटना निवडून जीवनाची साखळी गुंफू, पण मोठेपणी आपण मन म्हणजे नेमकं काय? ते कसं असतं? ते असं का असतं? या प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो.
कसं असतं मनाचं! त्याचं ऐकावं तर ते आपल्याला दाद देत नाही. बरं, खुशही राहात नाही. सारखं वाटतं की, हे करावं, ते करावं… संत सांगतात, आपल्या मनाला आवरा, त्याला सावरा. ते आपल्यावर हावी होऊ देऊ नका. मनाला आवरण्याचे नाना प्रकार त्यांनी सामान्यांना सांगितलेले आहेत, पण मन फार चलाख! त्याच्या पाठीवर राजा विक्रमादित्याचा वेताळ स्वार आहे. वेताळ जसं सांगेल त्यानुसार ते वागतं. आपल्यालाही नाचवतं. आयुष्यभर हवं तसं फिरवत राहतं. आपल्याला समजतं, पण स्वतःला आवरू शकत नाही.
कसं असतं मन? पावसाच्या धारेसारखं की दाटून आलेल्या मेघासारखं. प्रखर सूर्यप्रकाशासारखं लख्ख झळझळीत, तेजस्वी. आतबाहेर काहीही नसल्यासारखं पारदर्शी, आरस्पानी. आपल्याच चुका आपल्यालाच स्वच्छपणाने दाखवणारं. मला वाटतं, मन एखाद्या गावासारखं असावं. किंबहुना राज्यासारखं आणि आपण त्या राज्याचे राजे असतो. खरं सांगू, आपलं मनच तर राजा असतं. आपण आणि आपलं मन काही दोन वेगळ्या गोष्टी थोडी आहेत. म्हणताना आपण ‘तन-मन’ असा जोडीने शब्दप्रयोग करतो. तरी पण शरीर आणि मन काही वेळा एकमेकांच्या विरोधात उभं राहतं.
आता तुम्ही म्हणाल, हा जीव कुठून आला? तर ते मनाचं वेगळं नाव आहे. मनाला नावं तरी किती आहेत? वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या भावनेत त्याची नावं बदलतात. आश्चर्य वाटतं ते संताच्या मनाचं. त्यांची मनं नाही का नाठाळत? वेडय़ासारखं वागत? कसं ते आपल्या मनाला जेरबंद करतात? कसं आपल्या कह्यात ठेवतात? खूप विचार केला की, आपण शेवटी देवावर सोडतो. नाही आपलं मन आवरत तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारून गप्प बसते. मनाच्या भरवशावर मला मी सोडून देते. कधी ते चांगलं वागतं तर कधी नको इतकं वाईट वागतं. आपल्याला लाज आणतं.
लहानपणीच्या कथांमध्ये नेहमी दोन मनाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. एक असतं चांगलं मन, एक असतं वाईट मन. त्याला नावंही दिली जायची. कथा आपल्याला हवी तशी रचली जायची. तेव्हा वाटायचं आयुष्यसुद्धा असंच आपण रचू. निवडून चांगल्या घटनांनी जीवनाची साखळी गुंफू. यासाठी कथेतल्या चांगल्या मनाची खूप खूप मदत घेऊ. आपलं मन जरूर मदत करेल आपल्याला, पण पाठीवरच्या वेताळाच्या मनात काही वेगळंच असतं आणि नकळत्या क्षणी तो जास्त प्रभावी ठरतो. साऱया आयुष्याचा लेखाजोखा पार बदलून टाकतो. आता शोधू म्हटलं चांगलं मन, तर चांगले विचार सापडत नाहीत. वाईट विचार मनातून जात नाहीत. आपली दिवसाची सुरुवात मनाच्या सोबतीनेच होते किंवा मनाचा कौल पाहून आपण दिवसाची सुरुवात करतो. दिवस पालटतात, ऋतू बदलत जातात. मनाचं वेडेपण प्रत्येक ऋतूनुसार वाढत जातं. आता तर पाऊस सुरू झाला की, वेडं मन अधिकच वेडं होईल. त्याला त्याच्या लहरीवर सोडायचं ठरवून गप्प बसायचं ठरवतेय तोच पुन्हा पाऊस पडायला सुरुवात होते.
कडुलिंबाच्या काळ्याभोर खोडाला फुटलेली नवी पोपटी पालवी पावसाळी रात्रीच्या पांढऱया प्रकाशात डोळ्यात भरू लागली. करवंदाच्या दाट जाळीतल्या प्रत्येक पानावर पावसाच्या पाण्याचे थांबलेले थेंब रस्त्यावरील सोडियमच्या पिवळ्या प्रकाशात आरस्पानी काचमण्यांसारखे चमकू लागले. पावलांनी लांबवलेला झोका उंच जात परत माघारी येऊ लागला आणि मला माझ्यासकट माझ्याच मनाजवळ रेंगाळू देत राहिला. “ये ना हाताला धरून” मी त्याला म्हटलं. “सांग ना जरा, तू कसा आहेस ते? मलाच नाही, तर सगळ्या जगाला प्रश्न पडला आहे तुझ्या अस्तित्वाचा.”
हाताची घडी घालून ते माझ्याकडे बघून हसलं. “तूच शोध ना मला. तुमच्याजवळ तर राहतो मी,” मलाच कोडं घालीत ते म्हणालं. “बायकांना फार सवय असते ना मला वेठीला धरायची. जरा काही झालं की, माझं कोणीच ऐकत नाही, मनासारख काही होतंच नाही…” माझी म्हणजे आपल्या सर्वांचीच ते नक्कल करत होतं.
मी म्हणाले, “खरं सांगू, तू म्हणतोस ते खरंच आहे बघ. मीच नाही, तर गेल्या अनेक पिढय़ांमधील स्त्रियांचं हेच दुःख आहे. मन मारून संसार करतात. “माझं माझं” म्हणत जीव रेटतात आणि कधीतरी जाणीव होते, “अरे खरंच, आपल्या मनासारखं आतापर्यंत काय बरं घडलं?” उत्तर नकारार्थीच असतं किंवा उत्तर शोधावं अशी निकडच आतापावेतो मिळालेली नसते. दिवस थोडे राहिलेले असतात. मग सुरू होते मनाची शोधाशोध. पण ते बिचारं सापडतच नाही.
आमची एक काकू म्हणायची, “लग्न होऊन घरात आले त्याच्या दुसऱया दिवशी माझ्या मनाला मी समोर असणाऱया पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलं आणि संसार केला,” पण तिच्याकडे पाहून असं वाटायचं, मन जवळ नसताना इतका नेटका संसार हिने केलाच कसा? मनापासून जर संसारात रमली असती तर…! ती गेली तेव्हा खरंच एक अनोळखी पक्षी त्या पिंपळाच्या ढोलीतून उडताना मी पाहिला होता. ते तिचं मन होतं का? मी स्वतःशीच बोलत होते. मलाच प्रश्न विचारत होते. माझी विमनस्कता मला जाणवत होती. हाताची घडी घालून उभं असलेलं मन तसंच हसत होतं. माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता. झोका थांबला होता. क्षणात मला उमगलं, अरे, हा तर केवळ आभास आहे. मन आपल्यापासून वेगळं नाही. मनाला काही आकार नाही, रूप नाही. ते आपणच आपले असतो. आपल्यातून बाहेर पडायचं आणि स्वतःला निरखायचं, की ते सापडतं. एरवी ते आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग असतं.