>> अस्मिता यंदे
रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. संशोधनानुसार ‘रामायणा’चा रचनाकाळ इ.स.पू. 5022 ते इ.स.पू 5040 यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. ‘रामायणा’वरील अनेक पुस्तके आपण वाचली असतील. प्राचीन कालखंडात संत एकनाथ यांचे ‘भावार्थ रामायण’, रामदासकालीन कवयित्री वेणाबाईंची ‘सीता स्वयंवर’, ‘रामायण’ ग्रंथ, कवी श्रीधर यांचे ‘श्रीरामविजय’, निरंजन माधव लिखित ‘चिद्बोध रामायण’ (श्लोकबद्ध महाकाव्य) इत्यादी ग्रंथांद्वारे रामायणामधील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर ग्रंथ लिहिले गेले.
‘रामायणा’तील महाकाय रावण याने सीतेचे हरण केले आणि राम-रावण युद्ध झाले. रावणाचा पराभव कसा झाला हे आपल्याला माहीत आहे. विजयादशमीला रावणाचा पुतळा जाळला जातो. वाईट गोष्टींचा पराजय होतो, विनाश होतो याचे हे प्रतीक. यापलीकडे जाऊन रावण कसा होता त्याच्याबद्दल जास्तीची माहिती सामान्यांना नाही. रावणावर अनेक लेखकांनी संशोधन करून पुस्तके लिहिली. इंद्रायणी सावकार यांचे ‘रावणायन’ हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले.
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांचे ‘रावणायन’ हे पुस्तक नुकतेच वाचले. रावणासारख्या अप्रिय विषयावर संशोधन करून तितक्याच योग्य पद्धतीने माहिती मांडणे हे काही लेख, कविता लिहिण्यासारखे सोपे नव्हते. त्यासाठी अनेक पुस्तके वाचावी लागतात. संशोधन करून, चर्चा करून संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात . कविता, लेख, ललित हे जितके स्फूर्तीने लिहिले जाते तितके ऐतिहासिक, वैचारिक, धार्मिक लेखन करताना खूप विचाराने, अभ्यासपूर्ण लेखन करावे लागते. लेखिका यामिनी पानगावकर यांनी ‘रावणायन’ कार्यक्रमाचे अनेक प्रयोग सादर केले आहेत. रावणाने सीतेचे हरण केले, तिला बंदिस्त करून ठेवले, रामाशी युद्ध केले. याव्यतिरिक्त रावणाविषयी खोलवर माहिती आमच्या पिढीला माहीत नाही. नेमका रावण कसा होता त्याचा प्रवास लेखिकेने पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
रावणाचा जन्म, त्याचे माता-पिता, भाऊ-बहीण तसेच त्याचे गुरू यांची माहिती खूप बारकाईने दिलेली आहे. रावणाचा स्वभाव, त्याची आपल्या कुटुंबाप्रति असलेली वागणूक, त्याची विचार करण्याची पद्धत या सर्व गोष्टी हळूहळू वाचकांची उत्सुकता वाढवतात. रावण फक्त शरीराने महाकाय नव्हता, तर त्याची बुद्धिमत्ताही तितकीच प्रबळ होती. युद्ध जितके शस्त्राने खेळले जाते, त्यापेक्षा जास्त डोक्याने खेळले जाते. त्यामुळे युद्धकौशल्य आत्मसात करून कोणत्याही युद्ध करण्यामागे किंवा कोणतेही कृत्य करण्यामागे रावणाची किती दूरदृष्टी होती, तो किती विचारपूर्वक योजना आखायचा हे पुस्तक वाचताना जाणवते.
एखाद्या व्यक्तीने कितीही चांगली कामे केली, सगळ्यांशी प्रेमाने वागला, त्याचा स्वभाव कितीही चांगला असला तरीसुद्धा त्याच्या एका चुकीमुळे त्याचे सगळे चांगले कर्म दुर्लक्षित केले जातात. आपल्याला हे माहीत आहेच. जगात कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. माणसाकडे जसे चांगले गुण असतात तसे अवगुणही असतात. आपल्या जवळ असलेल्या गुणकौशल्यांचा कधीही अहंकार होऊ नये यासाठी अवगुणसुद्धा माणसाला दिलेले आहेत.
‘रावणायन’ पुस्तकाची रचना संवादात्मक आहे. पात्रांच्या संवादातून हे पुस्तक उलगडत जाते. रावणाची एक बाजू फक्त आपल्याला माहीत होती, पण लेखिकेने त्याची दुसरी आणि वेगळी बाजू पुस्तकात दाखवली आहे. त्यासाठी यामिनी पानगावकर यांनी अनेक संदर्भ ग्रंथ वाचले, अनेक लेखकांशी चर्चा केल्या, अभिप्राय घेतले आणि या सगळ्यातून ‘रावणायन’ साकारले आहे. लेखिकेने संदर्भ ग्रंथांची नावेसुद्धा पुस्तकात समाविष्ट केली आहेत. नकारात्मक विषयांवर फार कोणी लिहीत नाही, पण नकारात्मक विषयसुद्धा सखोल अभ्यास करून वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणे सोपे नसते, पण लेखिका यामिनी पानगावकर यांनी हा अप्रिय विषयसुद्धा खूप व्यवस्थितपणे हाताळला आहे. विषय एक असला तरी लिहिणारा प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या शैलीत ते शब्दबद्ध करत असतो. त्याप्रमाणे लेखिकेने या विषयावर लेखन करून नवोदित अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिला आहे.
रावणायन
लेखिका – यामिनी पानगावकर
प्रकाशक – शारदा प्रकाशन
मूल्य – रुपये 100/-





























































