विम्याचे मोजमापन

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

पावसात तीन जणांचे एक कुटुंब एका छत्रीत मावायचे असेल तर छत्री मोठीच असायला हवी, नाहीतर लहान छत्रीत सर्वच भिजून जातील. त्याचप्रमाणे कुटुंबाची गरज लक्षात घेता विम्याची छत्री विकत घेणे आवश्यक आहे अन्यथा कुटुंब आर्थिक अडचणीत सापडेल.

हल्ली एका विमा कंपनीची जाहिरात पाहिली. एक मुलगी दुसऱया मुलीला सांगते, मला एक कोटीचा विमा हवाय. दुसरी मुलगी तिला सांगते दोन कोटींचा विमा एक कोटीच्या विम्यापेक्षा स्वस्त येतो. मग ती सांगते तुझ्या उत्पनाच्या 200 पट विमा तुला घ्यायला हवा म्हणजे तुझे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित राहील.

या जाहिरातीमध्ये खरे तर उत्पनाच्या 200 पट विमा हवा ही गोष्ट प्रथम अधोरेखित करायला हवी. कारण आजचे उत्पन्न आपल्यानंतर जर सुरक्षित करायचे असेल तर एवढा विमा हवाच. तो कुठल्या विमा कंपनीकडून घ्यायचा हा प्रश्न नंतरचा आहे.

तुम्ही म्हणाल 200 पट का? त्यासाठी एक उदाहरण पाहता येईल. एका व्यक्तीचे उत्पन्न एक लाख रुपये आहे. त्याचा मृत्यू झाल्यास हे एक लाख घरी जाणार नाहीत. जर त्याचा उत्पन्नाच्या 200 पट विमा असेल तर त्याच्या पश्चात कुटुंबाला दोन कोटी मिळतील. महिन्याला अर्धा टक्का व्याजाचा दर पकडला तर दर महिन्याला एक लाख म्हणजेच पगाराएवढी रक्कम मिळेल. म्हणजे कुटुंबाला आर्थिक समस्या भोवणार नाही.

अजूनही दोन प्रकारे आपल्या विम्याचे मोजमापन करू शकतो.

त्यातली एक पद्धत म्हणजे माणसाच्या जीवनाची किंमत म्हणजेच (ह्युमन लाइफ वॅल्यू) आजपासून निवृत्तीपर्यंत आपण साधारण किती उत्पन्न कमविणार आहोत ते गणित मांडून त्याचे वर्तमान मूल्य (प्रेझेंट व्हॅल्यू) काढायचे. हे मूल्य म्हणजे त्या माणसाच्या जीवनाची किंमत. या रकमेचा विमा काढला म्हणजे पुढे वाढणाऱया उत्पन्नाचेही संरक्षण झाले व कुटुंब खऱया अर्थाने सुरक्षित झाले.

विमा किती असावा हे मोजण्याचा अगदी व्यावहारिक प्रकार म्हणजे भांडवलातील रोकडेच्या गरजेचे विश्लेषण म्हणजेच (Capital Liquidity Need Analysis ) आपल्या गरजा किती आहेत याचे गणित मांडायचे.

 कुटुंब आपल्यावर अवलंबून असलेल्या कालावधीसाठी घरातील मूलभूत गरजांसाठी लागणारी रक्कम.  कुटुंबाच्या जीवनशैलीसाठी लागणारा एकूण खर्च.  मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा एकूण खर्च.  मुलांच्या उच्च शिक्षणाचा आजचा खर्च.  मुलांच्या लग्नाचा खर्च.  आपल्यावर असलेली एकूण कर्ज.  जर आपली पत्नी घर सांभाळत असेल तर तिच्या निवृत्तीचा निधी.

अशा सर्व रकमेचे आजचे मूल्य म्हणजे भांडवलातील रोकडेच्या गरजेचे विश्लेषण. (CLNA) आपल्या कुटुंबाला त्यांचा उदरनिर्वाह करायला, त्यांची स्वप्ने पूर्ण करायला तसेच कुटुंबावरील सर्व कर्ज फेडायला नेमका किती निधी लागणार याचे विश्लेषण. या रकमेइतका विमा काढला की, कुटुंब त्यांच्या गरजा भागविण्याइतपत पूर्ण सुरक्षित झाले.

माणसाच्या जीवनाच्या मूल्याप्रमाणे विमा केला तर कदाचित गरजेपेक्षा जास्त पैसे कुटुंबाला मिळतील. पण ती रक्कम खूप मोठी वाटत असेल तर भांडवलातील रोकडेच्या गरजेचे विश्लेषण, CLNA या पद्धतीनुसार तरी विमा करणे अत्यंत आवश्यक आहे.

[email protected]