
>> धनश्री देसाई
आली आली दिवाळी आली
मुलांची धमाल करण्याची खरी वेळ झाली
सणांची खरी मजा बच्चा कंपनीनं लुटायची असते, दसरा ते दिवाळीत लागणाऱया सुट्टय़ा जरी कमी झाल्या असल्या तरी आमची बच्चे कंपनी जेवढे मिळेल त्यातही आनंद मानतात.
दिवाळीच्या सुट्टय़ा लागताच लगबग सुरू होते किल्ले बांधकामाची…. मग इवले इवले हात लगेच मावळे होतात आणि आपल्या मातीत साकारू लागतात आपले किल्ले.
समोर आदर्श उभे असतात प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचे, त्यांच्या मूर्तीसमोर साकारणे सुरू होतात इवलेसे, पण जीवनात भक्कम विश्वास देणारे किल्ले….
दरवर्षी आमचे लहान मावळे आपले किल्ले साकारून आपले खरे आदर्श, मातृभक्त, देशभक्त, प्रामाणिक असे आपल्या जाणत्या राजाला मनाचा मुजरा करतात.
कसं पेरलं जातं संस्काराचं बीज!!! हीच खरी वेळ असते आपल्या चिमुकल्यांना शिवरायांचे चरित्र, त्यांचे जीवन आणि त्यांचे कर्तव्य, परिश्रम दाखवून देण्याची. ‘ऐसा राजा होणे नाही’ जरी असलं तरी कुठे तरी शिवरायांचे चरित्र आत्मसात करणारे पोरं तर तयार होतील आणि मग घरोघरी किल्ले साकारताना शिवरायांचे चरित्र गायले जाईल.
आमच्या लहानपणी मुलींसाठी मातीचं घरकुल आणि मुलांसाठी किल्ले असायचे, स्त्रियांनी घरची धुरा सांभाळली तरच शिवबा बाहेर लढू शकतात असे काही मते असतील त्यांच्या मागे, म्हणून लहानपणापासून हे सर्व संस्कार रुळावे म्हणून हे किल्ले आणि घरकुल परंपरा सुरू झाल्या.
मीही दरवर्षी माझ्या मुलांसाठी किल्ले आणि घरकुल बांधते. मुलगा त्याचे केशरी ध्वज बनवणे ,मावळे जमवणे आणि दिवसभर किल्ल्याच्या अवतीभोवती शत्रूला परास्त करण्याचे खेळ खेळत असतो तर लहानगी आपल्या घरकुलात मायेनं आपल्या बाहुल्यांशी खेळून त्यांचं संगोपन करत असते. मातीच्या, पितळी भातुकलीत इवल्या इवल्या हाताने स्वयंपाकाचे धडे गिरवीत असते… हे सर्व खूप सुखावणारं असतं आणि प्रत्येक पालकांनी मुलांना हे नक्की करू द्यावं. आपल्या संस्कारात परंपरेत नक्कीच खूप मोठे गूढ आहे, शिकवण आहे म्हणूनच आपण आपल्या परंपरा आपल्या रीतिभाती नक्की जोपासाव्या आणि मुलांनाही त्यांचं सुंदर विश्व जवळून बघू द्यावं हेच खरे सण साजरे करण्याची पद्धत.
नाहीतर सणावाराला आपण घरातून निघून सुट्टय़ा साजऱया करतो, पण घरात हे सर्व मुलांसोबत करताना सणाचा, सुट्टय़ांचा खरा आनंद मिळतो. एकदा नक्की करून पाहा.
सणवारंच संस्कारांचा पाया घालत असतात तेव्हा सण जगा आणि आनंदाने साजरे करा.
शुभ दीपावली!





























































