
>> डॉ. महेश गायकवाड
पुणे जिह्यातील मुढाळे या गावात पक्ष्यांच्या थव्यांचे नयनरम्य दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. दररोज सायंकाळी लाखो भोरडय़ा पक्षी एकत्र येत मनोहारी कवायती करत नृत्याचे सादरीकरण करतात. मुढाळेच्या माळरानावरील हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी इथे गर्दी करत आहेत.
अन्नासाठी दाहीदिशा आम्हां फिरविसी जगदीशा’ या उक्तीप्रमाणे पक्षी स्थलांतर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर याविषयी आजही जगातील बहुतांश लोकांमध्ये अनेक समज, गैरसमज आहेत. याविषयी अनेक जण काम करीत असून अरिस्टॉटल हे पहिले शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी स्थलांतराविषयी जगाला शास्त्राrय माहिती दिली. पक्षी स्थलांतर करताना हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील कडाक्याची थंडी सहन करू शकत नाहीत. या काळात बर्फवृष्टीमुळे अनेक पाणवठे गोठतात. जीवघेणी थंडी व अन्नाचा तुटवडा या प्रमुख बाबी स्थलांतर करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि मग सुरू होते जगण्यासाठी हजारो किलोमीटरची सफर. यात भोरडय़ा किंवा गुलाबी मैना यांची सफर तर 8 ते 12 हजार किलोमीटरची असते. रोझी स्टार्ंलग हे इंग्रजी नाव असणारा भोरडय़ा पक्षी मूळचा पूर्व युरोप, रशिया, उत्तर आशियाच्या भागातील आहे. पावसाळ्याचा शेवट आणि थंडीच्या सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानात हे पक्षी दाखल होतात.
गेल्या काही महिन्यांपासून भिगवण, बारामती या भागात नेहमीच्या पक्षी निरीक्षणाबरोबरच भोरडय़ा पक्ष्याचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. आजच्या फेसबुक, व्हॉटस् ऍप व इतर माध्यमांनी या भोरडय़ा पक्ष्यांना आपल्या गावापासून ते हिंदुस्थानबाहेर पोचविण्याचे काम केले आहे. साधारणपणे 2015 पासून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी बारामतीत येऊन भोरडय़ा नृत्य पाहिले आणि तेव्हापासून याचा जास्त प्रसार झाला. भोरडय़ा नृत्याचे अनेक व्हिडीओ मी यूटय़ूबवर प्रसिद्ध केले आहेत.
भोरडय़ा नृत्याच्या या कवायती आपल्याला वेगवेगळ्रा आकारात पाहायला मिळतात. यात सापाचा, माशांचा, मगरीचा, मोठय़ा फुग्याचा, ढगांचा आकार असे नानाविध आकार पाहायला मिळतात. याचा आनंद घ्यायचा असेल तर भोरडय़ाच्या निवासापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांबूनच हे भोरडय़ा नृत्य पाहिले पाहिजे. मुरमुरेशन अर्थात स्वतःच्या संरक्षणार्थ केलेला सामूहिक कवायतीचा प्रकार. याला नृत्य प्रकार म्हणा अन्यथा गावठी भाषेत नाच. अर्थात आजीबाई म्हणायच्या, ‘‘काय भोरडीसारखी नाचतीया गिरकी घेत’’ किंवा ‘‘भोरडीसारखी भांडण करतेस!’’
दख्खनच्या माळरानात दरवर्षी सर्वात जास्त भोरडय़ा येत असतात याचे कारण महत्त्वाचे आहे. पावसाळा संपला की, इथे गवताला असंख्य बिया आलेल्या असतात. या गवतात असंख्य कीटक, नाकतोडे, गवती किडे यांचे प्रमाण खूप वाढलेले असते. शिवाय कीटकांची अंडी, अळ्या यांचे प्रमाणही जास्त असते. भोरडय़ा त्यावर तुटून पडतात. या भागातील कीड नियंत्रण करण्यासाठी भोरडय़ा मोठय़ा प्रमाणात काम करीत असतात. तसेच उन्हाळ्याची चाहूल लागताच काटेसावर, पळस, पांगाऱयासह अनेक झाडे फुलांनी गच्च बहरतात. भोरडय़ा त्यावरही ताव मारताना दिसून येतात. म्हणून या भोरडय़ांना विविध नावे आहेत. जसे कोकणात साळ भोरडी. कारण भातपिकावरील कीड खाऊन शेतकऱयांना खूप मोठी मदत करत असते. विदर्भात पळस, पांगारा, काटेसावर झाडांवर मधुरस पीत असते म्हणून पळस भोरडी किंवा मधुसारिका, तर माळरानात ज्वारीवर भरडल्यासारखा ताव मारते म्हणून भोरडी अशी विविध नावे स्थानिकांनी दिली आहेत. या भागात भोरडय़ाची शिकार केली जात नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे 2015 च्या गारपिटीत जवळपास एक लाखापेक्षा जास्त भोरडय़ा मेल्याची नोंद बीएनएचएस, निसर्ग जागर प्रतिष्ठान संस्था अशा विविध संस्थांनी केली आहे.
हा पक्षी दिसायला मैना अर्थात साळुंकीपेक्षा थोडा लहान असून वजन साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम एवढे असते. गुलाबी रंगाचे पोट व पाठ, ते पण भारतात आल्यानंतर होते. डोक्यावर काळा तुरा, काळे पंख असलेली मादी मात्र नरापेक्षा फिकट रंगाची असते. नर मात्र खूप गुलाबी असतात. मादीपेक्षा नर दिसायला सुरेख असतात. तसेच नरापेक्षा मादींचे प्रमाण जास्तच असते. या भोरडय़ांचा दिनक्रम खूप छान असतो. त्यात सकाळी सूर्यनारायण येण्याआधी म्हणजे अगदी झुंजूमुंजू झालं की, लगेच एकत्रितपणे हवेत हजारो बाण एकत्रित सोडावेत तशा भोरडय़ा आकाशात उडू लागतात. अगदी एक ते दोन मिनिटे हवेत विविध आकार घेत समुद्राची लाट बनावी तशी लाट बनवत नजरेआड होतात. साधारणपणे 40 किमी अंतरापर्यंत पहिली झेप घेतात आणि मग अगदी 10 मिनिटांच्या आत विविध ठिकाणी दहा ते शंभरच्या संख्येने झाडावर, गवतावर उतरून भराभर कीटकासह, गवताच्या बियांसह वड, उंबर पिंपळ यांच्या बियांवर अक्षरशः तुटून पडतात. पुन्हा सायंकाळी 4 नंतर पुन्हा ऊन कमी झाले की,सूर्यास्ताच्या अगोदर अर्धा तास भोरडय़ाचा थवा एकत्रित येतो. 10 ते 100 ते 1000 असे नानविध थवे एकत्रित असतात. अशा काही हजार ते लाखापेक्षा जास्त भोरडय़ा एकत्रित येऊन कवायती करतात. याला इंग्रजीत मुरमुरेशन असं म्हणतात. अगदी मराठीत याला शक्तिप्रदर्शन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे करीत असताना सर्व भोरडय़ा एका सुरात विविध आवाज करीत असतात. शिवाय हा संवाद म्हणजेच प्रत्येक भोरडीला दिला जाणारा संदेश असतो. यावर विविध शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. मात्र आतापर्यंत सर्वजण एक अंदाज मान्य करतात, ज्यामध्ये सर्व भोरडय़ा आवाजाच्या साह्याने अवकाशातील सर्व नृत्य प्रकार करताना एकमेकींना धडकत नाहीत. शिवाय हे करताना त्यांच्या शत्रुपक्ष्यांना – घार, ससाणे, गरुड, कावळे – भीती दाखविण्यासाठीसुद्धा या कवायतींचा वापर होत असतो. कुठल्याही शिकारी पक्ष्याला हा समूह मधोमध घेतो. शिकारी पक्ष्याला काही कळायचा आतच वेगाने त्याच्या आजूबाजूला सापासारखी नागमोडी वळणे घेत सर्व भोरडय़ा हल्ला करतात. हे मुरमुरेशन संध्याकाळी 15 ते 20 मिनिटे चालते, तर सकाळी फक्त 1 ते 3 मिनिटे चालते. हे पाहताना त्यांच्या बसण्याच्या युरोप व रशियातून येताना आपला मार्ग शोधताना दिशादर्शक म्हणून भोरडय़ांसह अनेक पक्षी दिवसा सूर्य व रात्री चांदण्याचा आधार घेतात. शिवाय त्यांना उत्तर चुंबकीय क्षेत्राची जाणीव जास्त असते. शरीरात संप्रेरके तयार होऊन स्थलांतर करणे सोपे जाते. याव्यतिरिक्त जमिनीवरील पाण्याची ठिकाणे, वाऱयाची दिशा, डोंगररांगांवरून आपला मार्ग शोधतात.
भोरडय़ा पाहताना लोकांना खूप आनंद व समाधान मिळत असल्याचे सर्वजण बोलून दाखवीत आहेत. आपल्या परिसरातील भोरडय़ांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम आपल्या सर्वांचे आहे. यात त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक वृक्ष लागवड करणे, शिवाय जुनी काटेरी झाडे वाचविणे असे नानविध उपाय करणे नितांत गरजेचे आहे. आपल्याला त्यांचे नृत्य प्रकार पाहायचे असतील तर शिस्तबद्धता अंगीकारणे गरजचे आहे. पक्षी निरीक्षणातून आपल्याला जगातील सर्वोच्च आनंद आणि समाधान मिळत असते हे विसरून चालणार नाही. हा सुखद अनुभव पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर आपल्याला निसर्ग रक्षण आणि निसर्ग वाचन करायला शिकले पाहिजे. पहाटेच्या थंडीत भोरडय़ा मुरमुरेशन पाहतानाचा आनंद अवर्णनीय असतो. हा आनंद कायम अनुभवता यावा यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
(लेखक पर्यावरण तज्ञ व निसर्ग जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.)
[email protected]





























































