भव्य बॅसिलिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> द्वारकानाथ संझगिरी
बार्सिलोनात जाऊन बॅसिलिका ऑफ सॅग्रेडा, फॅमिलिया न पाहणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल टाळण्यासारखं आहे. स्पेनचा ऑण्टोनिया गाऊदी या बॅसिलिकाच्या निमित्ताने पुन्हा भेटतो. नुसता भेटत नाही तर कडकडून भेटतो. त्याने डिझाईन केलेली ही सर्वोत्कृष्ट वास्तू. त्याने आयुष्याचा उत्तरार्ध या चर्चसाठी वाहिला. किंबहुना त्याच्या अपघाती मृत्यूनंतर याच चर्चमध्ये तो चिरनिद्रा घेत आहे.
हे बॅसिलिका खासगी देणग्या आणि बॅसिलिका पाहण्यासाठी येणाऱया पर्यटकांकडून मिळणाऱया पैशावर उभारलं जातंय. पंधरा युरो म्हणजे साधारण तेराशे रुपये ही प्रवेश फी आहे. रोज तिथे प्रचंड गर्दी असते. त्यामुळे त्यांना बक्कळ पैसा मिळतो. तिथले रोमन कॅथॉलिक सरकारपुढे हात पसरत नाहीत आणि सरकारही आपली तिजोरी अशा धार्मिक कार्यासाठी उघडत नाही. धर्म आणि सरकार हे दोन वेगळय़ा रुळांवरून धावत असतात. सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन करताना महात्मा गांधींनी हीच मागणी वल्लभभाई पटेलांकडे केली होती.
हे बॅसिलिका का उभं राहिलं? माणूस काही तरी कुठे जाऊन पाहतो आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जोसेफ बोकॅबेला नावाचा स्पॅनिश पुस्तक विक्रेता एकदा इटलीत व्हॅटिकनला गेला आणि बार्सिलोनात आल्यावर त्याने ठरवलं चर्च बांधायचं. सेंट पीटर्स कॅथेड्रलसारखं कॅथेड्रल उभारणं हे शिवधनुष्य होतं. त्याने शिवधनुष्य नाही तरी एक आकर्षक धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. त्याने देणग्या जमवल्या आणि त्या बॅसिलिकाचा पाया घातला. या बॅसिलिकाचं डिझाईन त्याने पॉला डेल व्हिगर या आर्किटेक्टकडे सोपवलं. पुढे ते ऍण्टोनिया गाऊदीकडे सोपवलं गेलं आणि गाऊदीने ते प्रोजेक्ट हातात घेतलं आणि गाऊदी 1925 साली गेला, पण त्याच्या कारकीर्दीत ते स्वप्न तो पुरं करू शकला नाही आणि अजूनही 2018 मध्ये काम सुरूच आहे. 2026 साली ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे काम किती लांबलं ते कळेल आणि आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असूनही वेळ लागतो. कारण कलाकुसर इतकी भन्नाट आहे की त्यापुढे यंत्रही थिटी पडतात. गाऊदीला कुणी तरी विचारलं होते, ‘प्रोजेक्टला इतका वेळ का?’ तो म्हणाला, ‘माझा क्लायंट कुठे घाईत आहे?’ पण त्यानंतरही कुणीच घाईत दिसत नाहीय.
पण गाऊदी गेल्यावरही अनेक अडथळे आले. स्पेनमध्ये 1936 साली लोकयुद्ध झालं. डावे रिपब्लिकन आणि फॅसिस्ट राष्ट्रवादी भिडले. त्यावेळी गाऊदीने तयार केलेली मॉडेल्स तोडली गेली. काही प्लॅन्स जळले. 1940 नंतर आर्किटेक्ट बदलले. आधुनिक कॉम्प्युटर डिझाईन तयार झाले, पण तरीही गाऊदीचा स्पर्श तो गेल्यावरही जाणवतो. तो जाईपर्यंत पंचवीस टक्के काम झालं होतं. त्यामुळे दिशा ठरली होती. तरीही त्या वास्तूवरचे सर्व अलंकार पूर्ण व्हायला 2032 वगैरे साल उजाडेल.
जेव्हा एखाद्या वास्तूचं बांधकाम दीर्घकाळ चालतं तेव्हा अडीअडचणी वाढतात. 2013 साली अत्यंत वेगवान ट्रेनचं प्रोजेक्ट बार्सिलोनात हातात घेण्यात आले. त्या ट्रेनचा ट्रक या चर्चच्या खालून जात होता. तिथे स्टेशनही होतं. जे आपल्याकडे होतं ते तिथेही झालं. त्यांच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने सांगितलं की, चर्चला इजा पोहोचणार नाही. चर्चचे इंजिनीयर्स म्हणाले, ‘नाही, चर्चला भेगा पडू शकतात.’ त्यामुळे तिथल्या रेल्वे ट्रकच्या विरोधात जनमत जागृत करण्यात आलं. वादविवाद झाले. पण सरकार बधलं नाही. 2010 साली आधुनिक टनेल बोअरिंग मशीन चर्चच्या पायथ्याखाली पोहोचले. 2013 साली खालून पहिली रेल्वे धावली, पण चर्चला काहीएक झालं नाही. कारण एडिलॉन सेड्रा या रिसर्चरने रूळ अशा इलॅस्टिन मटेरियलमध्ये बंदिस्त करून टाकले आहेत की, त्यामुळे वेगवान ट्रेन धावतात. जो कंप जाणवतो तो अत्यल्प जाणवेल. त्यामुळे आजतागायत चर्चच्या केसालाही धक्का लागलेला नाही आणि सातत्याने टेन तोफांच्या गोळय़ांप्रमाणे धडधडत जातात.
हे चर्च फक्त बॅसिलिका असलं तरी ते बांधलंय कॅथेड्रेलचं स्वप्न पाहून. त्यामुळे सौंदर्य, भव्यता याबाबतीत ते कॅथेड्रेलपेक्षा एक इंचही उणं नाही. एक व्हॅटिकन सोडा, पण इतर कॅथेड्रेल्सना कॉम्प्लेक्स जाणवेल इतकं ते डोळय़ांची पारणं फेडणारं आहे. ते पाहताना आपण चर्चमधला एक डिझायनर्स आयटेम पाहतोय असं वाटतं. स्पेनच्या उत्तरार्धातील गॉथिक, कॅटॅलॅन आइण आधुनिक आर्किटेक्चर या शैलीवर ते उभारलं गेलंय. गाऊदीच्या ड्रॉइंगप्रमाणे त्याने 18 स्पायर्सची आखणी केली. त्यातील 12 स्पायर्स कॅथलिक ऋषींसाठी (ऍपोस्टेल्स). उरलेल्या सहापैकी चार संतांसाठी, एक क्वीन मेरीसाठी आणि एक सर्वात मोठा येशू ख्रिस्तासाठी. 2010 साली फक्त आठ तयार झाले. इतरांचं अर्धवट बांधकाम आता आपल्याला पाहायला मिळतं. सर्व स्पायर्स तयार झाल्यावर हे जगातलं सर्वात उंच चर्च असेल. या चर्चचं अंतरंग व्हॅटिकनच्या सेंटपीटर्सप्रमाणे नेत्रदीपक होणार हे आताच जाणवतं. रंगीत काचा, त्याचे तयार झालेले आकृतीबंध, दिवे यामुळे चर्चचं अंतरंग प्रचंड आकर्षक वाटतं. तिथे जाल तेव्हा त्यांचा तो प्रचंड ‘ऑर्गन’ पाहायला विसरू नका. त्याला 1492 पाइप आहेत. तो किती संवेदनशील असेल याची तुम्हाला कल्पना येईल. चर्चचा प्लॅन असा आहे आणि भव्यता अशी आहे की इतका महाकाय ऑर्गन त्यांना पुरणार नाही. त्यामुळे इतर ऑर्गनच्या जागा ठरवल्या जाताहेत.
बार्सिलोनाला गेलात तर हे बॅसिलिका पाहायला विसरू नका. मी ताजमहाल बांधताना पाहू शकलो नाही, पण हे बॅसिलिका बांधताना पाहू शकलो. हे मी सुदैव मानतो आणि एक सिव्हिल इंजिनीयर म्हणून गाऊदीला सलाम ठोकतो.