
>> जयश्री संगीतराव
गांधार देशाच्या सुबल राजाची गुणवान, रूपवान कन्या म्हणजे गांधारी. सर्व भावांमध्ये एकुलती एक बहीण. आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं तिनेही रंगवली असतील. तिच्याही डोळ्यांत फुलल्या असतील आपल्या जीवनसाथीबद्दलच्या कल्पना, पण प्रत्यक्ष आयुष्यात घडलं मात्र वेगळंच. पतीच्या बाबतीत अभागी ठरलेली ही पतिव्रता पुत्रांच्या बाबतीतही दुर्दैवीच ठरली. शंभर पुत्र असूनही शेवटी तिची कूस रिकामीच राहिली. पोटी पुत्र असूनही पाठी एकही न उरावा यासारखे दुर्भाग्य ते दुसरे कोणते? खरं तर शिवाने आशीर्वाद आणि वर देण्याइतकी तिची आत्मशक्ती प्रबळ, पण तरीही असं का घडावं? हे सारं तिच्या बाबतीतच का घडावं? असा आक्रोशही तिच्या मनाने केला नसेल का? अशी ही राजकन्या, राजस्नुषा, राजपत्नी म्हणजेच गांधारी, जी खरंच शापित राजकन्या म्हणावी का?
महाभारत रणसंग्राम संपून जवळ जवळ दीड तप उलटलं तरीही काळजाला पडलेल्या जखमा तेवढय़ाच भळभळतात. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या पोटचे, पाठचे, सभोवतालचे एकामागे एक रणांगणी धारातीर्थी पडावेत आणि उघडय़ा डोळ्यांनी ते बघावं लागावं, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? पण या गांधारीने तेही पचवलं! खरं तर माझ्या दुर्दैवाला तेव्हाच सुरुवात झाली, जेव्हा एखाद्या स्त्राrच्या सौख्याची कवाडं उघडतात. तेव्हाच माझ्या आयुष्यात मात्र दुर्दैव चोरपावलाने नाही, तर राजरोसपणे शिरलं, नव्हे मीच त्याला निमंत्रण दिलं. माझे डोळे बांधून असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सुबल राजाची राजकन्या आता कुरुकुलाची ज्येष्ठ स्नुषा व्हायला निघाली या आनंदात असतानाच मी ज्याला वरणार तो राजपुत्र दृष्टीहीन आहे हे कळलं नि जणू वीजच कडाडली. सगळी सुखस्वप्नं जळून काळी ठिक्कर पडली. त्या क्षणी जणू हजारो हत्तींचं बळ एकवटलं आणि माझ्यातल्या पत्नीने आपले नेत्र बांधून कायमचं अंधत्व स्वीकारलं. कुठून आली एवढी शक्ती? पतिव्रतेचे तेज म्हणावं का याला? पतीच्या अंधत्वामुळे राजपद त्याच्यापासून दुरावलं, पण आपण ज्येष्ठ, आपला पहिला पुत्र राजगादीवर बसणार, राणीपद जरी नाही तरी राजमाता आपण नक्कीच बनू ही आशा मनाला दिलासा देत होती. माझ्यामागून कुलात आलेली पुंती ही गर्भवती होती, पण मला पुत्रलाभ आधी होणार होता. इथेही माझा दुर्दैवविलास माझ्या समोर उभा राहिला. दिवस पूर्ण होऊनही माझी प्रसूती होईना. एव्हाना पुंतीला पुत्रलाभ झाला. मी माझ्याच कर्मावर चिडले, क्रोधाने माझ्या उदरावर प्रहार करू लागले. माझ्या कोथळ्याची शकलं शकलं झाली, परंतु शिवकृपेने त्यातून शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. राजमातापद! ते मात्र दुरावलं. दोघींचेही पुत्र दिसामासाने वाढत होते, तसे त्यांच्यातले वैर, धुसफूसही वाढतच होती. छलकपट होऊ लागलं. मानहानी, बेअब्रू…सारं सारं डोळे बांधले असले तरी उघडय़ा डोळ्यांनी बघावं तसं कळत होतं. काय करणार? डोळ्यांबरोबरच जणू कान, तोंड बंद करून मूकबधिरही बनले होते. काwरव-पांडव महासंग्रामाचे रणशिंग वाजलेच. बघता बघता रथी महारथी धारातीर्थी पडू लागले. डोळ्यांदेखत माझी कूस उजाडत होती. वाचवता आलं तर फक्त दुर्योधनालाच येईल. काय करावं? मन धडपडू लागले. आईचे हृदय तुटू लागलं, पण ते कसं शक्य होईल? भीमाने तर प्रतिज्ञा केली, त्याच्या गदेने दुर्योधनाची जांघ पह्डून त्या लहूने द्रौपदीचा केशसंभार माखेन. काय करावं? वाचायलाच हवा दुर्योधन! रणांगणावर जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे नदीवर स्नान करून आशीर्वाद घ्यायला तो येणार. हा नित्यनेम होता त्याचा. मला मिळालेला वर अमलात आणण्याची हीच तर वेळ आहे, असा विचार करून मी त्याला महाली बोलवून घेतलं व त्याच्या कानात माझ्या मनातलं सांगितलं. मी सांगितल्याप्रमाणे तो स्नान करून आशीर्वाद घ्यायला माझ्या कक्षात आला. मी माझ्या नेत्रावरची पट्टी दूर सारली आणि नजरेचा कटाक्ष त्याच्या देहावर टाकला. माझी नजर ज्याच्यावर पडेल तो शरीराचा भाग पोलादासारखा टणक होईल, कशाच्याही प्रहाराचा त्याच्यावर परिणाम होणार नाही असा वर मला मिळाला होता. हा वर मी माझ्या दुर्योधनासाठी वापरणार होते, पण बघते तर काय? त्याने कमरेला झाडांची पाने बांधून जांघेपर्यंतचा भाग झाकला होता. परिणामतः भीमाची प्रतिज्ञा खरी झाली. कारण तेवढा भाग सोडून बाकी शरीरावर कुठेही कशाच्याही प्रहाराचा परिणाम झाला नाही, पण जांघ पह्डून भीमाच्या गदेने त्याचा प्राण घेतलाच.
कृष्णा, तूच करवलंस ना रे हे, तूच त्याला छेडलंस. असा नग्न मातेसमोर जायला तू बाळ का आहेस? तुझं कार्य साध्य झालं, पण मी शंभर पुत्रांची माता असूनही माझी झोळी मात्र रितीच झाली रे. माझा वंश निर्वंश झाला आणि नकळत मी तुझाही वंश असाच रसातळाला जाईल असा शाप देऊन मोकळी झाले, पण चुकलंच माझं. तुझा तरी काय दोष रे केशवा? तू न्यायानेच वागलास. अन्यायाची तर माझी कूस ठरली. म्हणून तर ती उजाड झाली. आयुष्यभर मी दुःख, चिंता, मनस्ताप यांच्या वणव्यात जळत राहिले आणि आता शेवटी महाराज धृतराष्ट्र, पुंती आणि मी वनात जाऊन आपलं उर्वरित आयुष्य शांतपणे घालवावं असं ठरवलं, तसे जगूही लागलो. पण शेवट… तोही वनात लागलेल्या वणव्यात जळून व्हावा. काय म्हणावं या नशिबाला? आयुष्यभराच्या वणव्याचा शेवटही वणव्यानेच झाला. या शापित राजकन्येला, दुर्दैवी राजस्नुषेला, अभागी मातेला चिरशांती मिळाली. एका दुर्दैवी पर्वाची अशी समाप्ती झाली. केशवा, फक्त एकच मागणं आहे, पुन्हा जन्म असेल तर तो डोळस मातेचा, भाग्यवान मातेचा दे… पुंतीसारख्या…!




























































