सिनेमास्कोप – शो मॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या चित्रपटांचा विचार केला तर लक्षात येतं, एक परिपूर्ण मसालापट आणि मेलोड्रामा यात त्यांचा हातखंडा आहे. याव्यतिरिक्त या काही गोष्टी त्यांच्या चित्रपटात हमखास असायच्या. त्यांच्या एकंदरीत सर्व चित्रपटांचा विचार केला तर सर्वप्रथम एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे, त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण स्थळ हे नेहमी डोंगराळ आणि पहाडी भागात असतं. ही परंपरा कालिचरण, क्रोधी, गौतम-गोविंदा, विश्वात्मा, हीरो, राम लखन, कर्मा, सौदागर, खलनायक, किसना, परदेस, ताल, यादे, युवराज, कर्ज, कांची… या सर्व चित्रपटांत आपल्याला डोंगरदऱया असलेली लोकेशन्स आणि तिथलं सौंदर्य पाहायला मिळालं. परदेस, यादे आणि तालपासून त्यांनी शहरी कथानकं असणारे चित्रपट करण्यास सुरुवात केली. तरी त्यातसुद्धा खेडेगाव आणि डोंगर आहेतच.

त्यांच्या चित्रपटाचं संगीत नेहमी उत्तम असं राहिलं आहे. कारण त्यांना संगीताची खूप चांगली समज आहे. त्यामुळे ते नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत. त्यांच्या चित्रपटाची गाणी कायम लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली आहेत. ‘ताल’ हा उत्तराखंडमध्ये चित्रित केला गेला. त्यामुळे त्याच्या संगीतावर तिथल्या लोकसंगीताचा प्रभाव आहे. 1995 नंतर बदलत्या काळाचा, प्रेक्षकांचा विचार करून ‘परदेस’चे संगीत त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं होतं आणि तेही लोकप्रिय झालं होते. त्यांच्या सगळ्या नायिका डोक्यावर पदर किंवा स्कार्फ घेतलेल्या आणि अर्धवट घेतलेल्या पदरामुळे त्या नायिकेचा चेहरा अर्धा दाखवला जाई. त्यातून तिचे सौंदर्य अधिक खुलून येई. ‘राम लखन’ आणि ‘खलनायक’मधली माधुरी दीक्षित आणि ‘कर्ज’मधल्या टीना मुनीमचे निरागस रूप आठवा.

दिलीप कुमार आणि राजकुमार या दोन मोठय़ा अभिनेत्यांना एकत्र आणायचं अग्निदिव्य घईंनी यशस्वीपणे पेललं. त्यांचे बहुतांश चित्रपट हे मल्टीस्टारर चित्रपट होते. ज्यात त्यांनी वेगवेगळे विषय हाताळून यश मिळवत राहिले. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांच्या चित्रपटात ते एका सीनमध्ये स्वत: हमखास दिसायचे. कारण त्यांना अभिनेता व्हायचं होतं. पण त्यात त्यांना यश मिळालं नव्हतं. म्हणून ते त्यांची मनातली अपूर्ण इच्छा अशा रीतीने पूर्ण करत असावेत. हळूहळू काळ बदलत गेला. चित्रपटाचे आशय-विषय बदलत गेले आणि ‘ताल’ या चित्रपटानंतर त्यांच्या कोणत्याही चित्रपटाला हवं तसं यश मिळालं नाही. म्हणून त्यांनी नंतर निर्मितीकडे लक्ष पुरवलं.

चित्रपटाची शैली त्यांनी बदलली नाही. फक्त प्रेक्षकांची अभिरुची बदलली याची जाणीव ठेवून त्यांनी येणाऱया नवीन पिढीतील दिग्दर्शकांना त्यांच्याकडे संधी दिली आणि अनेक चित्रपटांची निर्मिती केली. आता लवकरच ते ‘सलाखे’ नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांच्या पठडीतील अस्सल मसालापट पाहायला मिळेल अशी आशा बाळगूया.

[email protected]