वीरत्वाच्या खुणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> > मलिका अमरशेख

वीरता तुमची लढण्यामध्ये नसते. जगण्यामध्ये पण असते. प्रत्येक वेळी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. काही कटू, कठोर पण त्याच वेळी आपलं अस्तित्व पणाला लागतं, बुद्धीचा कस लागतो. वीरत्वाच्या वेगवेगळ्या खुणा पण हिंसा म्हणजे वीरता नव्हे. निश्चितच नाही. जपान हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणारी गिधाडं होती. क्षेपणास्त्र निर्माण करणारे वीर नसतात, तर दुष्टांचे रक्षण आणि स्वतःचा बचाव किंवा देशाचा बचाव करण्यासाठी प्रतिकार करणारे वीर असतात!

पृथ्वीतलावरल्या सर्वांनाच अभूतपूर्व आकर्षण वाटावे असा नवरसातला महत्त्वाचा रस म्हणजे वीररस. वीररस म्हणजे फक्त क्षत्रिय वा पुरुषांशीच संबंध नाही. हिंदुस्थानी विरांगनांनीही इतिहासात आपल्या शौर्यानं रक्ताची सही केलीय! झाशीची राणी लक्ष्मीबाई, चेनम्मा, अहिल्याबाई, पुराणात तर खलनायिका ठरलेली कैकेयी हीसुद्धा दशरथाबरोबर युद्धात इतक्या वीरत्वाने लढली म्हणूनच तर दशरथाने दोन वर मागून घे असे सांगितले. पण धूर्त कैकेयीने त्वरित न सांगता दोन वर राखून ठेवले!
अर्थात न लढता पण मरणाला न घाबरता मरणाला स्वखुशीने कवटाळणाऱ्यामध्ये राणी पद्ममिनी व तिच्याबरोबर जोहार करणाऱया पण वीरांगनाच की!

फक्त युद्धभूमीवरच का? आयुष्य हीसुद्धा रणभूमीच असते. धाडशी निर्णय घेत एकटीने जगण्याशी दोन हात करणाऱया स्त्र्ाया व पुरुष हे पण वीरच म्हणायचे! रोज गर्दीत घुसून 9-25ची बस पकडणारे, तुटपुंज्या पगारात महिना काढणारे, नोकरी नसताना पण मुलाचे हट्ट पुरवणारे, कर्जदार, सावकारांना सामोरं जाताना नटसम्राट झक मारेल अशी ऑक्टिंग करणारे, आई-वडिलांची सेवा करणारे… दुसऱ्या राज्यात जाऊन वाट्टेल ते काम करून जीव जगवताना कोरोना काळात हजारो लोक पायी चालताना मरणारे – नोटाबंदीच्या काळात स्वतःच्या कुटुंबाला पैसा पाहिजे म्हणून तासन् तास रांगेत उभे राहून मरणारे… भयानक महामारीत चोवीस तास या भयानक प्लॅस्टिक पेटीत स्वतःला गाडून घामाघूम होत पण मरणोन्मुखाची सेवा करणारे डॉक्टर्स – नर्सेस – वॉर्डबॉय सगळेच वीरपुरुष!

आयुष्यात जगताना सगळ्यांनाच विविध अनुभव येतात. काही चांगले काही वाईट, काही भयंकर… आपण या सर्वांना कसे सामोरे जातो यावर आपले व्यक्तिमत्त्व ठरते असे नाही तर त्यामुळे आपल्या आवतीभवतीच्या, कुटुंबातल्या, समाजाच्या पण घटकांवर परिणाम घडवत असतो. वीरता तुमची लढण्यामध्ये नसते. जगण्यामध्ये पण असते. प्रत्येक वेळी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. काही कटू, कठोर पण त्याच वेळी आपलं अस्तित्व पणाला लागतं, बुद्धीचा कस लागतो. संकटाच्या वेळी बहुतेक जण देवाचा धावा करतात. तंत्रमंत्राच्या आहारी जातात… पण त्या संकटात पण एकटय़ानं ताठ मानेन कणखर कण्यानं सामोरे जाऊन तावून सुलाखून येणारी माणसं हे खरे वीरसैनिक. कृष्ण हा पुराणकथेतला स्थितप्रत बुद्धिमान धोरणी वीरपुरुष. त्यानं युद्धा वेळी ‘न धरी शरच करी; मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असं सांगूनही खरंच हाती शस्त्र न घेता पांडवांना विजय मिळवून दिला. ‘हा सूर्य हा जयंद्रथ’ याही वेळेला त्यानं मुत्सद्दीपणा दाखवला. जरासंधाचा वध असो, दुर्योधनाच्या अंगावर फुलांची माळा पांघरण्याचा सल्ला असो व दुर्योधन-भीमाचं युद्ध होताना मांडीवर हलकेच थाप मारून दुर्योधनाची मांडी पह्डण्याचा संकेत ही सगळी त्या कृष्णलिलेची करामत!

आयुष्यात जागोजागी षडरिपू दडून बसलेले असतात. मोह, माया, वासना, मदांधता यांना दूर ठेवणारे संत असतात आणि ते क्वचितच येतात! क्षत्रियाइतपंच संतपद हे तलवारीच्या टोकावर चालच असतं. शिवाजी महाराज म्हणूनच तर संत रामदास व संत तुकारामाच्या पायाची धूळ स्पर्शताना, आशीर्वाद घेताना दिसतात. एक वीर दुसऱ्या वीराचं श्रेष्ठत्व मान्य करतो हेही मोठेपणच की! सिकंदराने जग जिंकलं तलवारीच्या जोरावर, पण लक्षात राहायला तो बुद्धच! येशूच! एवढंच काय, जगज्जेत्या सिकंदराला पण बाणेदारपणे ‘मला राजासारखंच वागव’ असं उत्तर देणारा पौरस राजा हा हरून पण विजयीच होता!

तरुणपणात अंगात रग – जोश सगळंच असतं… ‘लाथ मारीन तिथं पाणी काढेन’ अशी वृत्ती असते, पण जेव्हा तरुणपण सामर्थ्य रग संपून प्रौढत्व सुरू होताच आयुष्याचं उत्तरपर्व सुरू होतं तेव्हा वीरत्व काय कामाचं असा विचार उपयोगाचा नाहीच. कारण आजारपण – मृत्यू छाया हे वैरी दबा धरून असतात. त्या वेळी अनुभव न मनाच्या कणखरपणाची ढाल तलवार कामी येते. आधी सर्वांनाच असं वाटत असतं, आपण कायम असेच राहणार! पण ते तसं राहत नाही. प्रत्येक माणूस, जगरहाटी वैरी वाटू लागते. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असा काळ आला तरी काही माणसं संध्याकाळच्या सूर्यासारखीच दिप्तीमान तेजस्वी असतात. काही जण मशाल होतात, तर काही निरांजनासारखी आयुष्यभर मंदपणे शांतपणे तेवत प्रकाश देत राहतात.

वीरत्वाच्या वेगवेगळ्या खुणा पण हिंसा म्हणजे वीरता नव्हे. निश्चितच नाही. जपान हिरोशिमा, नागासकीवर अणुबॉम्ब टाकणारी गिधाडं होती. क्षेपणास्त्र निर्माण करणारे वीर नसतात. तर दुबळ्यांचे रक्षण आणि स्वतःचा बचाव पिंवा देशाचा बचाव करण्यासाठी प्रतिकार करणारे वीर असतात! दोन हजार लोकांना कंठस्नान घालणारा सम्राट अशोक वीरपुरुष मी तरी म्हणणार नाही. हजारो स्त्रिया विधवा झाल्या, हजारो मुलं अनाथ झाली, नंतर त्याला पश्चात्ताप होऊन त्याने बौद्धधर्म स्वीकाराला, पण त्यानं केलेलं कृत्य कसं कमी होणार?

माझ्याच एका कथेत ‘‘नैनंछिदन्ति शस्त्राणि’’मध्ये राजा उग्रसेन म्हणतो, ‘‘सम्राट अशोकानं कलिंग राज्यात जी हिंसा केली तिला तोड नाही; नृशंस हिंसा… शेकडो घरं उद्ध्वस्त झाली…. लाखो लोक मृत्यू पावले… आणि त्यानंतर त्यानं बौद्धधर्म न् अहिंसा स्वीकारली. म्हणजे फार महान कृत्य आहे का? इतकी हिंसा करून तो जर देवांचा प्रिय न त्याला ही हिंसा क्षम्य होऊ शकते तर मी का नाही? मी ही मगध न् चेटकच काय – संपूर्ण आर्याव्रर्त हिंसेनं जिंकून नंतर बौद्ध धर्म स्वीकारून महान होऊ शकतो! पोटभर सिसारी येण्याइतकी हिंसा करून नंतर अहिंसेचा प्रचार करत, शिलालेख, स्तंभ उभारण्याइतकी अहिंसेची कुचेष्टा दुसरी कुठलीच नाही.’’

कुठलाही धर्म न् एकाच प्रकारचे ज्ञान घेण्याचा अट्टाहास तुम्हाला आयुष्यात कधीतरी गोंधळवून टाकतो… तुम्ही त्याच दृष्टीनं सगळीकडे पाहू लागला; आयुष्यातल्या हजारो प्रश्नांना पाठ केलेली, आधीच ऐकलेली उत्तरं देता असं नसतं. कित्येक प्रश्नांची उत्तरं वेगळीच असतात, ती ज्याची त्यानं शोधून काढायची असतात! कधीतरी त्याची किंमत आपण चुकवतो… कधी ती दुसऱ्याला चुकवावी लागतात! ही अशीपण एक लढाई!

शिरिषताईंची खूप अप्रतिम जीवघेणी कवितेची ओळ आहे!
“अशी असते एक लढाई – जिचा शेवट असतो फक्त पराभव! वाया जाण्यासाठीच असतात असे काही अनुभव!”

 [email protected]