आगळं वेगळं – प्राण्यांबद्दलचे माहितीपट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

‘बिनाका गीतमाला’ म्हटलं की, जसा अमीन सयानींचा आवाज मनात जागा होतो तसाच प्राणी माहितीपट म्हटलं की, ऍटनबरोंचा आवाज ऐकू यायला सुरुवात होते. सर्वसाधारणपणे अगदी लहानपणीच या आवाजाशी ओळख होते. प्राण्यांशी ओळख करून देता देता या गृहस्थांचा आवाज त्या माहितीपटांतून ओळखीचा होतो. नंतर तर त्यांच्या आवाजाची जोड नसेल तर तो माहितीपट ठीक वाटत नाही, खरा वाटत नाही. 1926 मध्ये जन्म झालेल्या डेव्हिड यांनी बीबीसीबरोबर नऊ ‘नॅचरल हिस्टरी’ माहितीपट बनवले. त्यांचा सर्वात छान माहितीपट आहे ‘ब्लू प्लॅनेट’. सगळ्या प्रकारातील ‘बाफ्ता’ची बक्षिसं मिळवलेली ही एकमेव व्यक्ती आहे. सुरुवातीचं त्यांचं काम निसर्गातील चमत्कारांवर असलं तरी नंतर त्यांनी पर्यावरणाला पाठिंबा द्यायचंही काम केलं.

जगातील जवळ जवळ सर्व देश त्यांनी माहितीपट बनवण्यासाठी पादाक्रांत केले. शिवाय त्यांच्या माहितीपटांचं लिखाण ते स्वतः करतात. काम करता करता यशाचं असं मोठं शिखर त्यांनी गाठलं आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तरी आता 95व्या वर्षीदेखील ते एका फिल्मची निर्मिती करत आहेत. ‘द ग्रीन प्लॅनेट’मध्ये त्यांचं वनस्पतींबद्दलचं बारीक ज्ञान दिसतं. लवकरच ते ‘डायनॉसॉर्स- द फायनल डे’ यात दिसतील. येत्या वसंत ऋतूत ते ‘डायनास्टीज-2’ याला आपला आवाज देतील, ज्यात प्राण्यांची कुटुंबं जगण्यासाठी धडपडताना दिसतील. शिवाय 2022 मध्ये ते हवामान बदलावर काम करणार आहेत.

हे सगळं फक्त 95 वर्षीय व्यक्तीलाच नव्हे, तर कोणाही व्यक्तीला खूप व्यस्त ठेवू शकेल. यामुळेच तर सर डेव्हिड ऍटनबरो त्यांच्या देशातील सर्वात व्यस्त व्यक्ती आहेत, एक फक्त ब्रिटनची राणी सोडल्यास. कामाची बांधीलकी आणि त्याबद्दलची अतिशय आवड हेच तर ऍटनबरो यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे, असं आरोग्य विशेषज्ञांचं मत आहे. मानसशस्त्र्ाज्ञ लिंडा ब्लेअर यांच्या मते, ऍटनबरो यांना लक्ष केंद्रित करणे आणि उत्सुकता महत्त्वाचे वाटतात, ज्यामुळे त्यांचं मन नेहमी बाकी गोष्टींपासून साफ राहतं. उत्सुकता म्हणजे नवीन संकल्पना अंगीकारणं आणि कशालाही न घाबरणं …आणि लक्ष केंद्रित नसणं याचाच अर्थ काम पूर्ण करण्याची ताकद गमावणे, ज्यामुळे कशालाच काही अर्थ राहत नाही.

ऍटनबरो अजूनही आपल्यातील अनेक जण जे पाहायचा वा करायचा विचारही करू शकत नाहीत त्या वयातही काम करत आहेत आणि पुढे आणखी काम करण्याचा विचारही करत आहेत. भल्याभल्यांना जमणार नाही एवढं काम ते सध्या करत आहेत. ‘द ग्रीन प्लॅनेट’मध्ये दिसलेल्या वनस्पतींच्या त्यांच्या क्लिष्ट ज्ञानामुळे साऱया देशाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे. 2019 मध्ये तयार झालेल्या मालिकेच्या निमित्ताने ते आपल्या कामात किती आनंद घेतात ते दिसलं. चिळकांडी उडवणाऱया काकडीच्या वनस्पतीच्या बियांना भोसकून ते त्यातून उडणाऱया चिळकांडय़ांचा आनंद घेत मोठमोठय़ाने हसत होते. दुसऱया एका दृश्यात ते चोला निवडुंगावर जाणूनबुजून हात ठेवत ती वनस्पती स्वसंरक्षणासाठी कशी दुष्टासारखी वागते ते दाखवत होते आणि त्यात त्यांना मजा वाटत होती, ते कळत होतं.
या मालिकेचे निर्माते रुपर्ट बॅरिंग्टन म्हणाले, आम्हाला वाटत होतं की, डेव्हिड आमच्या यूएसच्या चित्रीकरणाच्या नियोजनाचे बारा वाजवणार. कारण आमच्याकडे त्यासाठीच्या नियोजित जागांची लांब यादी होती आणि डेव्हिडकडे फक्त 10 दिवस होते. त्यामुळे फक्त मोटरमधे प्रवास करा, शूटिंग करा, झोपा, उठा, प्रवास करा, अशीच ट्रिप शक्य होती. ऍटनबरो त्याला अगदी सहज तयार झाले. खरं तर त्यांच्यासाठी ती कठीण होती.

ऍटनबरो यांनी कितीतरी माहितीपट बनविण्यात सहभाग घेतला आहे. त्यांनी 40 च्यावर माहितीपट आणि त्यांच्या मालिका बनवल्या आहेत…आणि त्या सगळ्या उत्तम आहेत. लॉकडाऊन मध्येदेखील त्यांनी काम थांबवलं नाही. त्या काळात त्यांनी बीबीसीसाठी भूगोलाच्या धडय़ांसाठी आपला आवाज दिला आणि शिवाय लोकांना शांत वाटण्यासाठी त्यांनी निसर्गातून ध्वनी जमा केले.

या वयातही एवढं काम करणं त्यांना शक्य आहे. कारण त्यांची आनुवंशिक जनुकं आणि कान करण्याची दुर्दम्य इच्छा आणि मनाची उभारी. ‘‘काम न करत असण्याची मला भीती वाटते’’ हा त्यांचा विचार त्यांची वृत्ती प्रदर्शक आहे.

– [email protected]