
>> नीती मेहेंदळे
कुलदेवतेची एक आस असते आणि श्रद्धाळू मनाला काही ना काही निमित्ताने आपापल्या कुलदेवतेला नवस बोलायची सवय असते. संकल्प सिद्धीस गेले की, मात्र देवतेच्या भेटीची ओढ लागते. त्यातून घरात लग्नकार्य, संततीप्राप्ती वगैरे शुभघटना घडल्या असतील, तर देवीला भेटून यायचा घाट घातला जातो. घाट अशासाठी की, हल्ली कुलदेवता आणि तिथल्या मूळ घराण्यांचे चाकरमानी आता शहरात, परदेशी जाऊ लागले. त्यालाही साठ सत्तर वर्षं झाली असतील. पण घरातला मोठा माणूस कुलदेवतेचं नामस्मरण करणारा आजही असतो. घरातल्या नवपरिणितेच्या मनात तिच्याविषयी कुतूहल असतं. असंच कुतूहल मनी बाळगून मी मुंबईहून तळकोकणात आमच्या गावी कुलदेवतेला जायला निघाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातलं हिंदळे गाव हे आमचं मेहेंदळ्यांचं मूलस्थान, असं वडील माणसं सांगायची. गावात मेहेंदळे आडनावाची काही घरं आहेत. एका घरी आमची कुलदेवता मुसळादेवी स्थानापन्न आहे. गावात कालभैरवाचं मोठं प्राचीन मंदिरही आहे, हे आमचं कुलदैवत. या देवतांच्या दर्शनाने मनात एक ऋण फेडल्याचा भाव का कोण जाणे उमटत असे. आमच्या गावाच्या पंचक्रोशीत फेरफटका मारायचा म्हटला की पर्वणी असे. हिंदळेच्या सगळ्या दिशांना काही ना काही कवतिक आहे. हिंदळ्याच्या पूर्वेस शेजारी लगटून असलेलं नारिंग्र.s हे नारिंग्रे नदीकाठी असलेलं एक छोटंसं रम्य गाव. केशवसुतांची एक खेडे कविता मनःचक्षूंसमोर तंतोतंत उभी राहावी इतकं सुबक, नेटकं वसलेलं. गावात मंदिरांची आणि त्यांच्या स्थापत्यात जशी काही आपसांत चढाओढच लागलेली. जांभ्या दगडातली मंदिरं मी प्रथमच पाहत होते. तो कंदासारखा गुलाबी दगड मनात एकदम ठसला. बुटक्या साताठ दीपमाळा मूळ मंदिरासमोर शोभून दिसत होत्या. तळकोकणात विशेषकरून रामेश्वर, गंगेश्वर, रवळनाथ या नावांच्या शिवाच्या मंदिरांची पुनरावृत्ती होताना दिसते. पुढच्या वारीत तीन रवळनाथांची विशिष्ट मांडणी पण पाहायला मिळाली. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.
नारिंग्रेमधलं रामेश्वर तसं अनेक रामेश्वरांपैकी एक. ऐसपैस बांधलेलं कौलारू छपराचं शिवमंदिर. कोकणात बरीचशी मंदिरं कौलारू छपराची दिसतात. तिथे माणसांची घरं अशीच कौलारू म्हणून यथा देहे तथा देवे या न्यायाने मंदिरांवरही कौलंच दिसतात.
नारिंग्रेचं ग्रामदैवत मात्र गांगेश्वर. तेही तितकंच नेटकं साजिरं बांधून काढलेलं. इथे राणे नावाची माणसं विशेष दिसून येतात. त्यांचं हे मूलगाम. एका राणेंच्या घरी राहायचा योग्य आला होता तेव्हा घरासमोर हे गंगेश्वर दिसलं. गावाच्या काठाशी उत्तरेस फिरत फिरत गेलं तर नारिंग्रे नदी आणि नदीच्या पल्याड दहीबाव गाव दिसत होतं. गावात महाडेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर विस्तीर्ण परिसरात स्थापलेलं आणि भव्य सभामंडपाचं. गावात अजून एक शिवालय आहे. पुन्हा गंगेश्वर. दहीबाव शेजारी बागमळा नावाचं एक अतिलहान गाव आणि गावात अजून एक गांगेश्वर. नारिंग्रेच्या पश्चिमेला मिठबाव गावात पुन्हा रामेश्वर नावाचं मंदिर दिसतं. मंदिराचं एक वैशिष्टय़ असं की गाभाऱयाबाहेर महिषासुरमर्दिनी, विठ्ठल, वीरभद्र, गणपती अशी काही प्राचीन शिल्पं मांडून ठेवलेली दिसतात. नारिंग्रेच्या उत्तरेस तर शिवमंदिराची फौजच ठाकली आहे जशी. सर्वात कुणकेश्वर अतिपरिचयातला, अप्रतिम मंदिर. स्थापत्य आणि सोबत समुद्र किनारा पश्चिमेला. मीठमुंबरीचा मुंबरेश्वर असाच देखणा शेजारी. पूर्वेला भुतेश्वरचे शिवालय खुडी गावचं ठाण मांडून बसलेलं. दक्षिणेत पोयरे, मुणगे गावांमधली जुनी शिवमंदिरं तिथली हळूहळू ग्रामदैवतं झालेली. असे हे चतुःसीमा सांभाळणारे तटरक्षकच जणू नारिंग्रेचे. पहिला प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा पाहिला तो हा असा आणि आजतागायत त्याविषयीचं आकर्षण कमी झालेलं नाही.