
>> प्रसाद ताम्हणकर
नकाशे हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पुरातन काळापासून मानव त्यांचा वापर करत आहे. अगदी आजही जगाची रचना समजण्यासाठी, विविध प्रदेशांचे अचूक मार्ग मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ उपग्रहांच्या मदतीने विविध नकाशे बनवत असतात. प्रवासी, गिर्यारोहक, खलाशी अशा अनेकांसाठी नकाशासारखे महत्त्वाचे काही नाही, मात्र गेल्या काही वर्षांपासून मानवी शरीराची मूलभूत संरचना आणि ते कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ नकाशे बनवत आहेत आणि त्याचा अभ्यास करत आहेत. मानवी जनुकांचे कार्य समजून घेण्यासाठी सहा देशांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन‘जिनोम प्रोजेक्ट’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.
अवघ्या दहा वर्षांत त्यांनी मानवी शरीरातील जनुके आणि गुणसूत्रांच्या रचनेचा नकाशा तयार केला. शरीरात जे काही घडते, बदल होतात ते सर्व पेशींच्या संरचनेवर अवलंबून असतात. शास्त्रज्ञांच्या मते पेशी हे जीवनाचे सर्वात लहान असे स्वरूप आहे. या पेशींमध्ये आपला जनुकीय कोड लपलेला असतो. पेशी या जनुकीय कोडाला सक्रिय करून मॉलिक्यूल तयार करण्यास मदत करतात. प्रत्येक पेशीमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे कोड असतात, जे पेशीने काय कार्य करायचे ते ठरवतात.
शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या पेशी असतात. या सर्व पेशी एकत्र मिळून कार्यरत असतात, मात्र आजही शास्त्रज्ञ या पेशी एकमेकांपासून कशा वेगळय़ा आहेत आणि एकूण किती प्रकाराच्या पेशी असतात याची माहिती मिळवू शकलेले नाहीत, त्यांचा अभ्यास सुरूच आहे. या पेशी जेव्हा योग्य प्रकारे कार्यरत असतात तेव्हा आपण निरोगी असतो, मात्र यातील कोड त्यांना चुकीच्या सूचना देऊ लागले तर मग वेगवेगळय़ा आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, सिस्टिक फायब्रोसिस हा आजार होय. हा एक आनुवंशिक आजार असून, त्याच्यामुळे फुप्फुस आणि पचनसंस्थेच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. या आजाराला कारणीभूत असलेल्या जनुकांची ओळख तीस वर्षांपूर्वी झाली होती, पण या जनुकांच्या चुकीच्या सूचनांमुळे कोणत्या पेशी नीट काम करत नाहीत हे तेव्हा शास्त्रज्ञांना कळू शकले नाही. त्यानंतर 2018 मध्ये, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काही शास्त्रज्ञांनी या विशेष सेलचा शोध लावला. या पेशीच्या अयोग्य कार्यामुळे, फुप्फुसात पू जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि रोग पसरत जातो.
आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण प्रत्येक पेशीचा स्वतंत्र असा अभ्यास करू शकतो. शास्त्रज्ञ या सर्व पेशींचा विशेष असा नकाशा बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. या नकाशामुळे मानवी शरीराची रचना, विविध पेशींच्या अकार्यक्षमतेमुळे होणारे आजार यांचा अधिक चांगला अभ्यास करणे शक्य होणार आहे. तसेच विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि औषधे बनवण्यासाठीदेखील त्याचा उपयोग करून घेता येणार आहे. या जनुकीय नकाशाचा अभ्यास कोरोनो काळात अत्यंत उपयोगी पडला होता. या अभ्यासाद्वारे शास्त्रज्ञांनी कोरोनाचा व्हायरस हा आपल्या नाक, डोळे आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतो हे शोधून काढले. त्यानंतर तातडीने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. जगभरात एक विशिष्ट सार्वजनिक आरोग्य धोरण बनवण्यास त्यामुळे मदत मिळाली. जर मानवी शरीरातील सर्व पेशींचा नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले तर त्याचा प्रचंड फायदा मानवजातीला होणार आहे.
हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचा योग्य अभ्यास करणे हे फार मोठे आणि जिकिरीचे काम असून, त्यासाठी जगभरातील प्रमुख देशांच्या शास्त्रज्ञांना यामध्ये सहभागी करून घेणे आणि गरीब देशातील शास्त्रज्ञांसोबत मिळत जाणारी माहिती शेअर करणे हे महत्त्वाचे असणार आहे.





























































