रोबोट निघाले शाळेला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपल्या गरजा आणि त्या गरजांवरचे उपाय असे सगळेच बदलत चालले आहे. आपण यंत्र आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात गुरफटत चाललो आहोत अशी भीतीदेखील अनेकदा शास्त्रज्ञ, समाजसुधारक व्यक्त करत असतात. अर्थात प्रत्येक तंत्रज्ञान हे आपल्यासाठी घातक आहे किंवा नुकसानदायक आहे असेदेखील नाही. शेवटी एखाद्या तंत्रज्ञानाचा आपण कसा वापर करतो हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे असते. आता उदाहरणच घ्यायचे झाले तर रोबोटिक तंत्रज्ञानाचे घेऊया. कथा, कादंबऱ्यांपेक्षादेखील चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारे रोबोट आपल्याला अधिक भावले आणि पटले. हे कल्पनेतले रोबोट्स आपल्या खऱ्या आयुष्यात अलगद अवतरले आणि आपल्या जगाला त्यांनी कधी आपलेसे केले हे आपल्यालादेखील कळले नाही.

मनोरंजनापासून ते उत्पादन क्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून ते ऑपरेशन करणाऱ्या निष्णात यंत्रापर्यंतच्या अनेक भूमिकांमध्ये हे रोबोट्स आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. घरातला कचरा अचूक शोधून कानाकोपऱ्यातला कचरादेखील आपला आपण साफ करणारा आणि काम झाल्यावर स्वतःच्या जागेवर जाऊन आराम करणारा रोबोट ‘स्मार्ट व्हॅक्युम क्लीनर’च्या रूपात आपल्या अनेकांच्या घरात सध्या वावरत आहेच. आता तर मुलांना शिकवण्याचे, त्यांचा विविध विषयांचा अभ्यास करून घेण्याचे, त्यांच्याशी गप्पा मारण्याचे, लोकांच्या विविध शंकांची उत्तरे देण्याचे, विविध वस्तूंच्या उत्पादनात मदत करण्याचे, नवनव्या रोगांवरचे उपचार शोधण्यास मदत करण्याचे ते अगदी एखाद्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांना मदत करण्याचे कामदेखील रोबोट्स करू लागले आहेत.

असे हे रोबोटिक तंत्रज्ञान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे त्याचे कारण आहे जर्मनीचा नवा रोबोट ‘अवतार’. ‘जोशुआ’ नामक एका आजारी मुलाच्या जागी हा ‘अवतार’ शाळेत जातो. ‘अवतार’ नुसता शाळेत जात नाही, तर होमवर्क करतो, शिक्षकांशी आणि जोशुआच्या मित्रांशी संवाददेखील साधतो. ‘जोशुआ’ हा सात वर्षांचा मुलगा एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. या गंभीर आजारामुळे जोशुआच्या मानेत एक नळी बसवण्यात आली आहे. या गंभीर आजाराने त्रस्त असलेला ‘जोशुआ’ शाळेत जाऊ शकत नाही, त्यावर उपाय म्हणून बर्लिनच्या स्थानिक प्रशासनाने ‘जोशुआ’साठी ‘अवतार’ या रोबोटची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे ‘अवतार’चा सर्व खर्चदेखील येथील स्थानिक प्रशासनातर्फेच केला जातो. ‘अवतार’ची उपयोगिता बघता अजून काही रोबोट्स खरेदी करण्याचा विचारदेखील हे प्रशासन करते आहे.

‘अवतार’मध्ये लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने ‘जोशुआ’ वर्गात चाललेले सर्व काही बघू शकतो, या रोबोटला तो टच क्रीन टॅबच्या मदतीने ‘ऑपरेट’देखील करू शकतो. ‘अवतार’मध्ये बसवण्यात आलेल्या स्पीकरच्या मदतीने ‘जोशुआ’ शिक्षकांशी आणि मित्रांशी मनमोकळा संवाददेखील साधू शकतो. जेव्हा ‘जोशुआ’ला काही संवाद साधायचा असतो, तेव्हा ‘अवतार’च्या डोळ्यांची उघडझाप सुरू होते आणि त्याला काही बोलायचे आहे हे समोरच्याला समजते. विशेष म्हणजे, ‘अवतार’ ‘जोशुआ’ ज्या डेस्कवर बसायचा त्याच डेस्कवर बसून शिक्षण घेतो.

स्थानिक प्रशासनाने ‘कोरोना लॉक डाऊन’च्या काळात ‘अवतार’सारखा एक छोटा उपक्रम राबवून पाहिला होता. ‘कोरोना’च्या धास्तीने शाळा बंद ठेवायला लागत होत्या. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अनोखा प्रयोग म्हणून ‘मुलांच्या जागी रोबोट्स’ हा उपक्रम राबवून बघण्यात आला होता, ज्याचा अतिशय चांगला असा उपयोग तेव्हा झाला होता. आतादेखील ‘जोशुआ’ला ‘अवतार’मुळे होत असलेला उत्तम फायदा बघता असे अजून काही ‘अवतार’ गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीला योजण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत.

[email protected]