मुद्रा – दूर दूर हे सूर वाहती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे नुकतेच निधन झाले. 50 वर्षांहून अधिक प्रदीर्घ व गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी 19 भाषांतील दहा हजारांहून अधिक गाण्यांना आपल्या स्वरांनी साज चढविला. ‘हमको मन की शक्ती देना’ या प्रार्थनागीताने त्यांची ओळख घराघरांत पोहोचली आणि सोबतच मराठी भावगीतांच्या विश्वातही त्यांचे नाव कायमचे गोंदले गेले. भारतीय चित्रपट आणि ललित संगीताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अबाधित राहील.

या वर्षीच्या पद्म पुरस्कारांत प्रख्यात दाक्षिणात्य पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे नाव झळकले आणि जगभरातील त्यांचे चाहते आनंदित झाले. चेन्नईतील घरी त्याही चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारत होत्या, पण अचानक ही सुरेल वाणी चिरंतनाच्या प्रवासाला निघून गेली. पद्म पुरस्काराचा आनंद फार काळ टिकलाच नाही, नियतीला हे मान्य नसावे. वाणी जयराम यांच्या मृत्यूने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. 70 च्या दशकात ‘गुड्डी’हा चित्रपट आला होता, त्यातील वाणींच्या स्वरातील ‘बोले रे पपीहरा’ हे गाणं आठवून बघा किंवा ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकातील कुमार गंधर्वांसोबत गायलेले ‘ऋणानुबंधाच्या तिथून पडल्या गाठी’ हे आठवून बघा. आजही या दोन अजरामर गाण्यांसोबत मराठी भाषेत गायलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तामीळनाडूतील वेल्लोर येथे 30 नोव्हेंबर 1945 साली जन्मलेल्या वाणी यांचा सुरेल प्रवास 4 फेब्रुवारी 2023 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी अचानक संपला.

वाणी जयराम म्हणजेच कलैवाणी जयराम. घरी वडील दोरायस्वामी अय्यंगर, आई पद्मावती या दोघांनीही शास्त्राrय शिक्षणाचे धडे रंगा रामानुज अय्यंगर यांच्याकडे गिरवले. आई-वडील जर एवढे संगीत शिक्षण घेतलेले असतील तर तो वारसा मुलांमध्ये येणे कठीण नव्हते. वाणी यांना हेच संगीताचे बाळकडू आई-वडिलांकडून मिळत गेले. घरातील पाच भावंडांत वाणी सर्वात लहान. आई-वडिलांनी वाणी यांना कर्नाटक संगीत शिक्षणाची बाराखडी गिरविण्यासाठी कडलोर श्रीनिवास अय्यंगर, टी.आर. बालसुब्रह्मण्यम, आर.एस. मणी यांच्याकडे सोपवले. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवायला सुरुवात केली. पहिला जाहीर कार्यक्रम मिळाला तो ‘ऑल इंडिया मद्रास’चा. तीच पुढे दीर्घकालीन सुरेल प्रवासाची नांदी ठरली. मद्रास येथील क्वीन्स मेरीज महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. मद्रास येथील स्टेट बँकेत नोकरीला लागल्या. त्यानंतर त्यांची बदली हैदराबाद येथे बँकेत झाली. बँकेतील काम करीत असताना, हिशेब जुळवत असताना, आकडेमोड करीत असतानाच त्यांच्या मनात गाण्याचे चिंतनही चालू असायचे. 1969 च्या सुमारास त्या जयराम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कलैवाणीच्या वाणी जयराम झाल्या. विशेष म्हणजे त्यांचे सासरही संगीत शिक्षणाचा वारसा लाभलेले संपन्न असे घराणे होते. पती तर संगीतप्रेमी होतेच, शिवाय सासू पद्मा स्वामीनाथन कर्नाटक संगीत शिकलेल्या गायिका होत्या. वाणी यांची बदली मुंबईला झाल्याने जयराम कुटुंबीय मुंबईकर झाले. आपल्या पत्नीचे संगीतप्रेम त्यांनी जाणले. एवढेच नव्हे तर त्यांनी वाणी यांना हिंदुस्थानी संगीत शिक्षण आग्रहाने शिकायला लावले. पतियाळा घराण्याचे उस्ताद अब्दुल रहेमान खान यांच्याकडे वाणी यांनी संगीत शिक्षणाचे धडे गिरवले. त्यांच्या गळय़ात तर कर्नाटक संगीत होतेच, त्याला हिंदुस्थानी शास्त्राrय शिक्षणाची जोड मिळाली. त्या दक्षिणेच्या एक प्रतिभाशाली गायिका होत. त्यांनी तामीळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम, हिंदी आणि मराठी गाणी गायिली. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीनवेळा सन्मानित केले गेले. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी 1971 मध्ये ‘गुड्डी’ चित्रपटासाठी तीन गाणी गाऊन घेतली तेव्हा. वाणी जयराम यांनी गायलेल्या ‘बोले रे पपीहरा’ या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्यासाठी त्यांना तानसेन सन्मान मिळाला. 1980 साली ‘मीरा’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

‘संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगीतिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली, अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे बाळ कोल्हटकरांनी लिहिलेले एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भावगीते आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, ‘प्रियतम दर्शन देई, तुजवीण करमत नाही’, ‘पाहिलं का कुणी पाहिलं का, देवाचं घर कुणी पाहिलं का?’, ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’, ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळीभाबडी’ चित्रपटातील गीत. त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते. वाणी जयराम यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. संगीत क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि योगदानाचा झालेला सन्मान, त्यात पद्मभूषण या नागरी सन्मानाची पडलेली भर अधोरेखित करावी अशीच आहे.