खाऊगल्ली – तन-मन व्हावं गारेगार!

>> संजीव साबडे

आइसक्रीम कुल्फी खायचे दिवस यंदा लवकर म्हणजे होळीपूर्वीच सुरू झाले आहेत. रंगापासून ते चवीपर्यंत असंख्य व्हरायटीच्या आइसक्रीमचे चाहते आपलं आवडतं ठिकाण वा आइसक्रीम पार्लर सहसा विसरत नाहीत.

हानपणी आइसक्रीमचे दोनच ब्रँड माहीत होते. सर्वात जुनं आइसक्रीम म्हणजे क्वालिटी आणि दुसरं होतं जॉय कंपनीचं. वर्षातून कधीतरी आई-वडील घेऊन द्यायचे. जॉयचा आइसक्रीम बॉल नव्याने आला तेव्हा सहा महिने रडारड केल्यावर तो मिळाला होता. बाकी आइसकँडीच्या गाड्या घरासमोरून फिरायच्या वा शाळेबाहेर उभ्या असायच्या. ती कँडी, बर्फाचा रंगीबेरंगी गोळा पाच व दहा पैशांना असायचा.

पुढे पेप्सीकोला कँडी नावाचा एक प्रकार आला. प्लास्टिकच्या लांबड्या पिशवीत आंबटगोड विविध स्वादांचा बर्फ असायचा तो. मुलांमध्ये फारच प्रिय. त्याची किंमतही पाच-दहा पैसे असायची, पण हे सगळे प्रकार वाचवून ठेवलेल्या पैशांतून गुपचूप, लपूनछपून खावे लागत. ते कुठे व कोणत्या पाण्यात बनतात, स्वादांचे रंग काय दर्जाचे असतात, हा विचारही मनात यायचा नाही. आता पाच-दहा पैशांची नाणीही चलनात नाहीत. पण कँडी, कुल्फी, पेप्सीकोला हे आजही मिळतं. बर्फाचा रंगीत गोळा विकणाऱ्या गाड्या कमी झाल्या असल्या तरी चौपाटी व काही दुकानांत तो मिळतो. हे आठवण्याचं कारण म्हणजे हल्लीच काडीवाली कुल्फी व आइसकँडी एकट्याने गुपचूप खाल्ली.  खाताना मनात म्हटलं, आइसक्रीम व कुल्फी खायचे दिवस यंदा लवकर म्हणजे होळीपूर्वीच सुरू झाले. घरासमोरच्या दुकानातून आइसक्रीम घेणाऱ्या पोरापोरींची संख्याही वाढू लागली आहे.

आइसक्रीम म्हणताच आठवतो ठाण्यातला प्रसिद्ध टेम्पटेशन हा आइसक्रीमचा ब्रॅंड. नौपाड्याला राममंदिर रस्त्यावर टेम्पटेशन दुकान एकदम पॉप्युलर. वेगवेगळे असंख्य फ्लेवर्स असले तरी आलं-लिंबू, पेरू, गुलकंद, आंबा आइसक्रीम खाल्ल्याशिवाय आणि मसाला पान, वरियाली (बडीशेप) या फ्लेवर्सचा आस्वाद घेतल्याशिवाय या पार्लरमधून बाहेर पडावंसं वाटतच नाही. मुंबई व ठाण्यातल्या प्रत्येक गावात आइसक्रीमचे नवनवे व वेगळे ब्रँड व पार्लर आले आहेत. घंटाळी भागात सॉफ्ट स्टोन पार्लर आहे. तिथे आंबा, चॉकलेट, क़ॉफी, स्ट्रॉबेरीबरोबरच पुरणपोळी, ताडगोळा, सीताफळ या स्वादाचं आइसक्रीम मिळतं. ताडगोळा व पुरणपोळी हे अतिशय नावीन्यपूर्ण. ठाण्यातच आणखी एक क्रीम चिल्स नावाचा ब्रँड लोकप्रिय झाला आहे. तिथे बेल्जियम चॉकलेट, सिझलिंग हेजलनट, चॉकलेट फज ब्राऊनी, रेनबो, सो फार जार, दिलखुश डेथ असे आणखी वेगळे प्रकार जोरात चालतात. अंधेरी, वरळीपासून अनेक ठिकाणी मिळणारं अप्सरा आइसक्रीमही ठाण्यात आहेच. त्यांचं पेरू, जांभूळ तसंच बिनसाखरेचं आइसक्रीम प्रसिद्ध असलं तरी ठाण्यात मिळणारं पाणीपुरी व शेवपुरी आइसक्रीम वेगळंच म्हणता येईल.

मुलुंडमधील अचिज रेस्टॉरंटजवळील गियानी आइसक्रीमही लोकप्रिय असून तिथंही अनेक प्रकार आहेत, पण तेथील चॉकलेट, ब्राऊनी, चोको-नट यांना अधिक मागणी असते. क्रीम चिल्स आणि अप्सरा यांचीही पार्लर मुलुंडमध्ये जोरात चालतात. घाटकोपर पूर्वेकडील स्कूप गॅलेटरिया हा इटालियन आइसक्रीम ब्रँड तरुणांना अधिक भावला आहे. पूर्वेच्या पंतनगर व पश्चिमेच्या भटवाडी भागातील ए-वन आइसक्रीम पार्लरमध्ये इतक्या व्हरायटी आहेत की, विचारायची सोय नाही. तेथील राजभोग व मेलो जेलो आइसक्रीम खासच. शीव म्हणजे सायनची नूतन कुल्फी चांगली असल्याचं ऐकलं आहे. तेथील रेल्वे कॉलनीतील बॉम्बे पॉप्सिकल नावाचा आइसकँडी प्रकार मस्त आणि स्वस्त.

आता थेट जाऊया शिवाजी पार्क परिसरातील नॅचरलमध्ये. इथल्या तसंच जुहू व अंधेरीच्या लोखंडवालामधील पार्लरमध्ये अनेकदा संध्याकाळी उभं राहायलाही जागा नसते. यांच्याकडील टेंडर कोकोनट (शहाळे) आणि वॉटरमेलन (कलिंगड) आइसक्रीम प्रसिद्ध असली तरी त्यांच्याकडचे सारे पेवर्स लोकप्रिय आहेत. वांद्र्याच्या पश्चिम भागात कॉपेटो आर्टिसन गॅलेटोमधील बरेच फ्लेवर्स माहीत नसलेले आहेत. लिंबू, पेरू व रासबेरी या चवी नेहमीच्या ओळखीच्या असल्या तरी सॉरबे, स्ट्रॉसियाटेला, सिसिलियन पिस्ता यांचे स्कूप खाल्ल्यावरच चव कळते. इटालियन आइसक्रीम एरवीही आपल्यासाठी अनोळखीच. आता तर तुर्की आइसक्रीमही आलं आहे. बास्किन रॉबिन्स आइसक्रीम बहुतेकांना ओळखीचं झालं असेल, इतकी त्यांची मुंबईभर पार्लर आहेत. कॉटन कँडी, बेसबॉल नट, बनाना, डबल टॉफी चॉकलेट, ब्लू रास्पबेरी, सायट्रस ट्विस्ट, कॅरमल प्रलाइन चीज केक हे विशेष तरुणांना आवडते फ्लेवर्स आहेत.

अर्थात नेचरल, अप्सरा, अमूल किंवा बास्किन रॉबिन्स आदी शहरांत कुठेही मिळणाऱ्या आणि ती खाऊन माहीत झालेच्या चवीच्या आइसक्रीमपेक्षा छोटे, पण वेगळे ब्रॅण्ड मस्तच. त्यांच्याकडील आइसक्रीममध्ये अधिक वैविध्य असतं, प्रयोग असतात. मुंबईतील असाच एक अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय ब्रँड म्हणजे के. रुस्तम. ब्रेबार्न स्टेडियमच्या बाहेर 1953 सालपासूनचे हे इराणी मालकाचं पार्लर व आइसक्रीम अतिशय लोकप्रिय आहे. आइसक्रीम सँडविच खावं तर इथलं. तुम्ही भलेही डोंबिवली वा पालघरला राहत असाल, पण चर्चगेटला याल तेव्हा के. रुस्तमला अवश्य भेट द्या. असंच एक जुनं, 94 वर्षांपूर्वीचे ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटीसमोर असलेलं बॅचलर. तिथे स्नॅक्स मिळत असले तरी लोक जातात तेथील आइसक्रीम व फालुद्यासाठी.

महंमदअली रोडच्या बोहरी मोहल्ल्यातील ताज आइसक्रीमचा इतिहास 1887 साली सुरू होतो. वालीजी जलाजी नावाचे एक गृहस्थ कच्छहून आले आणि त्यांनी फळं व दूध एकत्र करून (फ्रूट सलादसारखं काहीतरी) विकायला सुरुवात केली. मग पुढे फ्रूट ाढाrम करता करता आइसक्रीम सुरू केलं. त्यांची सहावी पिढी आज तो व्यवसाय चालवत आहे. ताज्या फळांचं आइसक्रीम तिथे मिळतं. ते खायला वालीजीभाईंचा ताजुद्दिन नावाचा मित्र खास गुजरातहून यायचा. त्याच्यामुळे ते ताज आइसक्रीम झालं आणि त्या कुटुंबाचं आडनाव आइसक्रीमवाला झालं आहे. मधुबाला, आय. एस. जोहर, आताचे अब्बास-मस्तान, फारुख अब्दुल्ला हे या आइसक्रीमचे शौकीन. काही वर्षांपूर्वी इराणचा शहा मुंबई भेटीवर आला होता. त्याने ताज महाल हॉटेलात या ताजचं आइसक्रीम मागवलं होतं. ब्रिटिशांच्या रेडिओ क्लबमधील पार्ट्यांसाठी ताज आइसक्रीम जायचं. हे आइसक्रीम खाण्यासाठी प्रसंगी, पण अवश्य वाट वाकडी करून जा. आणखी अनेक मस्त आइसक्रीम प्रकार आहेत मुंबईत. शिवाय कुल्फीला चांगलीच प्रतिष्ठा, चव आणि लोकप्रियताही मिळाली आहे. उन्हाळा अधिक कडक होणार असल्याने ती ठिकाणं पुढच्या वेळी पाहू.

 [email protected]