नाद-मराठी – सुनिधीचा सुरेल स्वर!

>> अरुण जोशी

वयाच्या  अकराव्या वर्षी दिल्लीहून मुंबईला आलेली एक गोड गळय़ाची मुलगी. दूरदर्शनवर ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ सादर करणाऱ्या तबस्सुम यांच्या सांगण्यावरून तिच्या परिवाराने मुलीच्या सांगीतिक उत्कर्षासाठी मुंबई या देशातल्या उत्कर्षनगरीचा मार्ग धरलेला. त्याच सुमारास तिला दूरदर्शनवरच्या ‘मेरी आवाज सुनो’ या नवोदित गायक-गायिकांच्या स्पर्धेत गाण्याची संधी मिळते. त्या स्पर्धेत तिला पहिलं पारितोषिकही मिळतं आणि ज्यांना मनोमन गुरू मानून, ज्यांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका, सीडी ऐकून एकलव्यासारखी संगीत साधना केलेली असते, त्या जगप्रसिद्ध स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याच हस्ते तिचा सन्मान होतो तेव्हा तिचे डोळे भरून येतात. लतादीदी तिचं कौतुक करतात आणि तिला जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं.

जिच्या गानकारकीर्दीचा आरंभच अशा सुरेल अनुभूतीने होतो ती आजची आघाडीची पार्श्वगायिका म्हणजे सुनिधी चौहान. दिल्लीत बालपण गेलेली, दुष्यंतकुमार चौहान यांच्यासारख्या नाटय़ अभिनेत्याची ही सुरेल कन्या मुंबईला जाणार म्हटल्यावर सारं कुटुंबच तिला साथ द्यायला सज्ज होतं. लतादीदींच्या हस्ते लेकीला पहिलं पारितोषिक मिळतं तेव्हा तिच्या आई-वडिलांना आपला निर्णय योग्य असल्याचं पटतं. त्यातच दीदींनी तिला सांगितलेलं असतं, ‘‘छान गातेस, काही मदत लागली तर सांग!’’ मग आणखी काय हवं, पण तिचा गळाच कमालीचा गोड असतो आणि दीदींचं ‘तू चंदा मैं चांदनी, तू तरुवर मैं शाख रे’ हे अप्रतिम गीत अंतिम स्पर्धेत गाणाऱ्या सुनिधीला ‘बॉलीवूड’चे दरवाजे उघडतात. तसं तिने पूर्वीही ‘लडकी दिवानी देखो, लडका दिवाना’ हे गाणं ‘शस्त्र’ या सिनेमासाठी गायिलेलं असलं तरी आदेश श्रीवास्तव यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या गाण्यातला आपला स्वर लहान मुलीच्या आवाजासारखा वाटतो हे सुनिधी नंतर एका मुलाखतीत स्वतःच सांगते. ते गाणं ऐकलं तर आपल्यालाही तिचं म्हणणं पटेल.

उत्तम गायक-गायिका होण्यासाठी योग्य गुरूचं मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरतं असं सुनिधीला मान्य असलं तरी तिला तशी संधी बालपणी मिळाली नाही. लता मंगेशकरांची गाणी ऐकत ऐकत तिचा गळा तयार झाला. असं एखाद्या गायिकेच्या  बाबतीत घडणं हे दुर्मीळच. ‘शस्त्र्ा’ मधलं तिचं पहिलं गाणं 1996 मधलं. तेव्हा ती अवघी तेरा वर्षांची होती. त्याच वर्षी तिला ‘मेरी आवाज सुनो’ स्पर्धेत अपूर्व यश मिळालं आणि त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळ आजतागायत आलेली नाही. लता मंगेशकर म्हणजे ‘स्वरमंदिर’ आहेत या श्रद्धेने ती दीदींविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि तिच्या प्रत्येक कार्यक्रमात ‘बाहों में चले आओ, हम से सनम क्या परदा’ हे लतादीदींचं गाणं म्हणतेच.

सुनिधीची हिंदी गाण्यांची कारकीर्द लवकरच बहरली. उदित नारायण, कुमार शानू यांच्यासारख्या ज्येष्ठ गायकांपासून ते समवयस्क सोनू निगम, शान यांच्यासह तिची कितीतरी गाणी रसिकप्रिय झाली. तिची ‘सोलो’ गाणी तर एकेक काळ गाजवून गेली. कतरिनावर चित्रित झालेलं ‘माय नेम इज शीला, शीला की जवानी’ हे गाणं आठवून पहा. ‘पा’मधल्या ‘हिचकी हिचकी’ अथवा ‘मिशन कश्मीर’मधलं ‘बूमरो बूमरो, श्यामरंग बूमरो’ यांसारख्या गाण्यांनी धुमाकूळ घातला.

स्वच्छ, पल्लेदार स्वर आणि गाण्याच्या ‘मूड’ला साजेशी स्वरांची अदाकारी याची उत्तम जाण असल्याने ‘चमेली’मधलं ‘बहता है मन कहीं, कहा जानते नहीं’ हे तिचं स्वतःचं आवडतं गाणं. याशिवाय ‘धूम मचा ले’, ‘महेबूब मेरे’, ‘आजा नचले’, ‘उडी’ इत्यादी गाणी खूप गाजली. ‘ओमकार’ चित्रपटातल्या ‘बिडी’ या गाण्याला सुनिधीला ‘फिल्मफेअर ऍवॉर्ड’ मिळालं. ‘फोर्ब्ज’ मासिकाच्या शंभर प्रसिद्ध हिंदुस्थानींच्या यादीत तिचा 2012 ते 15 या काळात चारवेळा समावेश झाला तेसुद्धा कौतुकास्पद.

अशा या गुणी गायिकेने मराठीतही काही गाणी गायली आहेत. ‘एकदा काय झाल…’ या चित्रपटात. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं सुनिधीचं ‘बाळाला झोप का येत नाही’ हे गाणं गाजलं. तसंच अवधूत गुप्तेंनी संगीत दिलेलं ‘कांदे-पो़ SS हे’ हे गाणंही लोकप्रिय झालं (त्यात अनेक सहगायकांबरोबर सुनिधी आहे) ‘विटीदांडू’मधलं ‘अहो कारभारी आले दारी’ ही लावणी किंवा ‘बबन’ चित्रपटातलं ‘मोहराच्या दारावरी कैऱ्या मागनं’ हे शाल्मली खोलगडेसह गायिलेलं गीत अशा अनेक मराठी गीतांमधून सुनिधीचा सुरेल स्वर कानी पडतो.

भावी पिढय़ांमधल्या गायिकांविषयी बोलताना लतादीदींनी सुनिधीचा उल्लेख केला तेव्हा ती साहजिकच आनंदून गेली. कमी वयातच प्रचंड यश गानक्षेत्रात तिला लाभलं ते तिच्या विनम्र स्वभावामुळे आणि अथक परिश्रमातून. आता अनेक चित्रपटांसाठी, अनेक भाषांमध्ये गाणारी हिंदुस्थानी संगीताबरोबरच वेस्टर्न म्युझिकमध्ये चमक दाखवणारी, देशविदेशात ‘स्टेज शो’ करून वाहवा मिळवणारी आणि घरच्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवणारी सुनिधी आणखी अनेक वर्षे गानकारकीर्द गाजवू शकते. एकेकाळी तिला ‘न्यू म्युझिक टॅलेन्ट’साठीचं संगीतकार ‘आर.डी. बर्मन ऍवॉर्ड मिळालं होतं. पाश्चात्त्य संगीताविषयी ती म्हणते, ‘‘जगभरच्या कोणत्याही संगीतात ‘सूर’ तेच असतात. फक्त गानशैली निराळी असते.’’ याचं पूर्ण भान आणि ज्ञान असलेली सुनिधी ‘खाकी’ चित्रपटात गायिलेल्या तिच्याच ‘ऐसा जादू डाला रे’सारखी कारकीर्द गाजवतेय. तिला आणखी मराठी गाणी मिळत गेली तर उत्तमच. कारण अभिनयाबाबत विचारणा झाली त्या वेळी तिचा मनोमन निश्चय होता, आधी गाणंच!