लेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी

115

>> स्पायडरमॅन

आधुनिक तंत्रज्ञान जगभरातील वेगवेगळी क्षेत्रं काबीज करत असतानाच संगीताचे क्षेत्रं तरी कसे मागे राहील? तसे पूर्वीपासूनच संगीतात यंत्रांचा वापर होत आला आहेच. वेगवेगळ्या चाली बनवण्यासाठी संगीतकारांना मदत म्हणून यंत्रे होतीच. वेगवेगळे आवाज एकत्र करणे, वेगवेगळ्या ट्रकवर रेकॉर्डिंग करणे अशी कामे यंत्रांच्या मदतीने होत आहेतच. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर या क्षेत्रात वेगाने वाढत चालला आहे.

गाण्यांच्या चाली बनवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असून लवकरच हे तंत्रज्ञान स्वतःच गाणी लिहून त्यांना चालीदेखील लावायला सुरुवात करण्याची चिन्हे आहेत. तसे बघायला गेलो तर 1957 साली संगणकाच्या मदतीने पहिली चाल चाल रचण्यात आली होती. ‘इलियाक स्वीट’ असे नाव असलेल्या या संगीताच्या चालीला अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ‘इलियाक वन’ संगणकाच्या मदतीने रचले होते. आयबीएमचे वॉटसन हे आर्टिफिशल इंटेलिजन्स मशीनदेखील या कामात तरबेज मानले जाते. संगीतकार एलेक्स डा किड्सचे गाणे ‘नॉट ईझी’ वॉटसनच्याच मदतीने तयार करण्यात आले आहे. या गाण्याला 2016 सालच्या टॉप गाण्यांमध्ये 40 वे स्थान मिळाले होते. वॉटसन एआय हे संगीताच्या जोडीलाच वर्तमानपत्रे आणि मासिकातले लेख वाचण्यासाठीदेखील सक्षम आहे, तसेच सोशल मीडियाच्या युजर्सच्या टाइमलाइन वाचून तो युजर्सचा मूड कसा आहे हेदेखील सांगू शकतो. याच तंत्राच्या मदतीने तो लोकांच्या आवडीच्या चाली तयार करण्यासाठी विविध बदल सुचवू शकतो.

यूटय़ूबवरदेखील सध्या अनेक गायक आणि संगीतकार आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने स्वतःची गाणी तयार करून अपलोड करत आहेत आणि त्याला लोकांची चांगली पसंतीदेखील मिळते आहे. स्वीडनच्या केटीएच रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीने मिळून एक लोकगीत मशीन तयार केली आहे. या मशीनच्या मदतीने केवळ 14 तासांत एक लाख लोकगीतांच्या रचना तयार करण्यात यश आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या