आभाळमाया – गगनातील आनंद!

>> वैश्विक

बऱ्याच वर्षांनी मन तृप्त करणारं रात्रीचं निरभ्र आकाश पाहायला मिळालं. कालच अमावास्या झाली. त्यामुळे त्याआधीच्या शनिवारी चंद्रप्रकाशाचाही अडथळा नव्हता. अर्थात 1985 मध्ये वांगणी स्टेशनवर उतरल्या उतरल्या डोक्यावरचं चमचमणारं आकाश खुणवायचं पिंवा काही वेळाने आकाशगंगेचा धूसर, दुधाळ पट्टा स्पष्ट दिसायचा. ही गोष्ट आता मुंबईजवळच्या खेड्यांमधूनही शक्य नाही. त्यासाठी खास एखादं प्रकाश-प्रदूषणविरहीत ‘अॅस्ट्रॉनॉमी टाऊन (खगोल ग्राम) सरकारनेच ठरवलं तर होईल. न्यूझीलण्डमध्ये ‘टेकापो’ नावाचं ‘खगोल अभ्यास’ गाव आहे. जगात आणखीही पाच-सात ठिकाणं तशी असली तरी एकूणच पृथ्वीभर रात्र नष्टच व्हायच्या बेतात आली आहे. तरीही गेल्या चार दशकांत सर्वसामान्य खगोलप्रेमींमध्ये आपल्या विराट विश्वाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. त्यात आमच्याही ‘खगोल मंडळा’चा खारीचा वाटा आहे. ‘खूप आनंद’ म्हणजे गगनात न मावणारा असा वाप्रचार आपल्याकडे आहे. आमची ही आनंदयात्रा गगनातच सुरू होते. 1987 मध्ये दूरदर्शनवर ‘क्षितिजापलीकडले’ या सदरात एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा आमचा अभ्यास क्षितिजापलीकडचाच असल्याचं सांगितलं होतं. त्या काळात ‘हे आकाश पाहून काय होणार?’ असे वैचारिक अपरिपक्वता दाखविणारे प्रश्न विचारले जायचे. त्याला आम्ही उत्तरं देण्यात वेळ घालवला नाही. सातत्याने प्रयत्न करत राहिलो. त्यातून स्फूर्ती घेऊन पुढे अनेकांनी डॉक्टरेट मिळवली ती स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि चिकाटीने. आज ते कार्यकर्ते जगातल्या अनेक मोठ्या खगोल प्रकल्पांशी निगडित आहेत हे सांगायला अभिमान वाटतो.

आता अवकाश अभ्यासाचं महत्त्व सर्वांच्या लक्षात येऊ लागलं आहे. परवाच ‘इस्रो’ने एक ‘व्यावसायिक’ उपग्रह सोडला. म्हणजे विज्ञानातून संपत्ती आणि संपत्तीतून प्रगती याकडे जाता येईल. मात्र त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील मूलभूत संशोधनावर भर द्यायला हवा. त्यातूनच नवे शोध लागतात. तेराव्या-चौदाव्या शतकापासून युरोपात याचा सर्वंकष विचार सुरू झाला म्हणून पाश्चात देशांचं जगात वर्चस्व निर्माण झालं हे लक्षात घ्यायला हवं. प्राचीन हिंदुस्थानलाही समृद्ध वैज्ञानिक वारसा आहे पण त्याला आता आधुनिकतेची जोड द्यायला हवी. भास्कराचार्य, आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडलेले सिद्धांत विस्मयकारी आहेत. आजही ते संशोधक स्फूर्ती देतात. नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपण आणखी पुढे जायला हवं. हे करणारा तरुण वर्ग तेव्हाच निर्माण होईल जेव्हा समाजातही वैज्ञानिक कुतूहल आणि आस्था वाढेल. हे सर्व सांगण्याचा हेतू असा की, ‘आभाळमाया’मधून आपण जे ग्रह, तारे, अवकाशयानं वगैरेंविषयी जाणून घेतो. त्यामागे कुणाचं तरी निश्चित संशोधन आणि अभ्यास असतो हे लक्षात यावं. यासाठीच आमचे खगोलशास्त्र्ाापुरते आकाशदर्शनाचे कार्यक्रम असतात. गेल्या शनिवारी (19 नोव्हेंबरला) उंबरोली येथे खूप दिवसांनी आकाशदर्शनाचा रात्रभराचा छान कार्यक्रम झाला. कोविड काळाची दोन-अडीच ‘हरवलेली’ वर्षे आणि गतवर्षी अवकाळी पावसाची लहर यामुळे हे कार्यक्रम थबकले होते. गेल्या कार्यक्रमाला मात्र शे-दीडशे लोकांनी विश्वदर्शनाचा आनंद घेतला.

‘सध्या पृथ्वीच्या जवळ आलेला गुरू त्याच्या चंद्रांसह दुर्बिणीतून न्याहाळणे, शनीच्या सुंदर रिंग्ज (कडी) पाहणे, आपल्या आकाशगंगा दीर्घिकेची (गॅलॅक्सीची) शेजारी असलेली देवयानी दीर्घिका (अॅण्ड्रोमीडा) छान दिसणे तसंच विराट विश्वातली मृग नक्षत्रासारखी सुंदर नैसर्गिक मांडणी आणि दूरस्थ तेजोमेघ, तारकापुंज (क्लस्टर) पाहून त्यांची ‘लेझर टॉर्च’द्वारे माहिती घेणे या साऱ्याचा पुन्हा अनुभव आला, असं ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि गेली 37 वर्षे सातत्याने ‘आकाशदर्शन’ घडविणाऱ्या प्रदीप नायक सरांनी सांगितलं. हाच तो गगनातील आनंद, गगनातच सामावलेला.

[email protected]