निमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा

>> हेमचंद्र फडके

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचे साताऱयात शूटिंग सुरू असताना त्यांच्यासह 27 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ निवेदिता सराफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वास्तविक, अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान राज्य सरकारने 60 वर्षांपुढील कलाकारांना चित्रीकरणास मनाई केली होती; परंतु न्यायालयाने ही मनाई हटवली होती. आशालतांच्या जाण्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता तरी चित्रीकरणस्थळी योग्य ती खबरदारी घेतली गेली पाहिजे. अन्यथा, काही मालिकांनी ज्येष्ठ कलाकारांना सामावून न घेता कथानकांमध्ये तद्नुसार बदल घडवून आणले आहेत तसे बदल सर्वच मालिकांमध्ये करण्याचा पर्यायही आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या महासंकटाने संपूर्ण जगाची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. लॉक डाऊन करावे तर अर्थचक्र थांबते आणि अनलॉक केल्यास रुग्णसंख्या-मृत्युसंख्या वाढते. अशा या दुहेरी संकटातून मार्गक्रमण करताना जगभरातील बुद्धिवंतांना, धुरिणांना अपयश येताना दिसत आहे. याचे कारण कोरोनावर आजघडीला कोणतेही प्रभावी औषध नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीबाबत सदैव दक्ष राहणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.

हा धोका लक्षात घेऊनच केंद्र आणि राज्य सरकारांनी  मनोरंजनविश्वातील चित्रपट आणि मालिकांच्या सेटवरही 60 वर्षांपुढील वयाच्या कलाकारांना येता येणार नाही असे आदेश राज्य सरकारने दिले होते. तथापि, सरकारच्या या निर्णयाबाबत अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. अभिनेते प्रमोद पांडे यांनी तर न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’नेही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ तंदुरुस्त नागरिक बाहेर प्रवास करू शकतो; मग तो सेटवर का नाही जाऊ शकत, याचा खुलासा करण्याचे निर्देश दिले होते.

राज्य सरकारने खुलासा करताना असे म्हटले होते की, कोविड -19 बाबतीत आतापर्यंत प्रत्येक सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचे निर्देश दिले असून अत्यंत आवश्यक काम असेल तर किंवा तब्येत ठीक नसेल तरच घराबाहेर पडावे, असेही सुरक्षेच्या हेतूने सांगितले आहे. कोणालाही वगळावे किंवा भेदभाव निर्माण करावा हा निर्णयामागील हेतू नाही. ज्येष्ठांना घरी राहून व्हिडीओ शूट किंवा मोबाईल व्हिडीओ ऍपमार्फत काम करण्याची परवानगी आहे. ते शक्य नसेल तर किमान सध्याच्या साथीच्या दिवसांत पर्यायी व्यवस्था करायला हवी असे राज्य सरकारने म्हटले होते, परंतु  मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ कलाकारांना निर्बंध घालणारा निर्णय रद्द केला. ज्येष्ठांना सर्व प्रकारची काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी द्यावी, चित्रीकरणाच्या सेटवर आरोग्यासंदर्भात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि काम करणाऱया ज्येष्ठांची सातत्याने आरोग्य तपासणी व्हावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांचे अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर येणार असून मानसिकदृष्टय़ाही त्यांना अधिक बळ मिळेल असा विश्वास कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला होता.  निकालांनंतर मालिकांच्या चित्रीकरणस्थळी ज्येष्ठ कलाकार रुजूही होऊ लागले, पण कोरोनाचा धोका टळलेला नव्हता किंवा नाही. उलट कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  कारण जसजशी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली तसतसा नागरिकांचा परस्परांशी संपर्क वाढला. सोशल डिस्टन्सिंग केवळ कागदावरील नियमांपुरतेच उरले. स्वच्छतेच्या उपाययोजनांचेही कळत-नकळत उल्लंघन होतच आहे. पर्यायाने दिवसागणिक बाधित आणि मृतांचे आकडे वाढत गेले. त्यातही ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाने वयोवृद्ध नागरिकांसाठी कोरोना किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

आशालता वाबगावकर यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले. ‘अपने पराये’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे पहिले नाटक होते. पुढील काळात ‘गुंतता हृदय हे’, ‘वाऱयावरची वरात’, ‘चिना’, ‘महानंदा’ यांसारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले.  जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱयाला’, ‘वहिनीची माया’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचे साताऱयात शूटिंग सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात 16 कलाकार आणि इतर क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

आशालतांच्या निधनानंतर आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ कलाकारांना काम करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने त्यांना अडविता येणार नाही, पण कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यांनी शूटिंग आणि बाहेर पडणे टाळावे. थोडी अडचण होईल, पण त्याला पर्याय नाही. किमान महिनाभर काळजी  घ्यावी लागणार आहे. सरकारने कमाल 50 कलाकार, तंत्रज्ञांना खबरदारी घेऊन शूटिंगसाठी परवानगी दिली आहे. कोरोनासंबंधी नियमांची अंमलबजावणी होते की नाही, कलाकार, तंत्रज्ञ यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का, त्यांची भोजनाची व्यवस्था आणि अन्य गरजेच्या चांगल्या सुविधा त्यांना दिल्या जात आहेत का हे तपासण्यासाठी महामंडळ भरारी पथके स्थापन करणार आहे. त्याद्वारे चित्रीकरणाच्या ठिकाणी अचानक जाऊन पाहणी केली जाईल. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत नाही याची खातरजमा केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ‘ज्येष्ठांना मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण अशा दुर्घटना घडत असतील तर शूटिंगवर पुन्हा बंदी आली तर सगळय़ांचाच प्रश्न निर्माण होईल. दुर्दैवाने तसे झाले तर काहीच करता येणार नाही,’ असा इशाराही राजेभोसले यांनी दिला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनीदेखील आशालतांच्या निधनानंतर चित्रीकरण थांबवण्यात यावे अशी विनंती महामंडळाकडे केली आहे.

जगणे महत्त्वाचे की जगण्याची व्यवस्था, असा प्रश्न कोरोनाने उभा केला आहे. याचे उत्तर ‘जगण्याची व्यवस्था’ असे अनेक तज्ञांनी दिले आहे, परंतु एखादा मृत्यू होतो तेव्हा हे उत्तर समर्पक ठरत नाही. त्यामुळेच यावर उपाय एकच आहे तो म्हणजे नियमांचे तंतोतंत पालन. पण नेमके तेच होत नाही! आशालतांच्या निधनानंतर तरी चित्रीकरणस्थळी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा करूया. अन्यथा, काही मालिकांनी आज ज्येष्ठ कलाकारांना सामावून न घेता कथानकांमध्ये तद्नुसार बदल घडवून आणले आहेत तसे बदल सर्वच मालिकांमध्ये करण्याचा पर्यायही आहे. कोणत्याही परिस्थितीत जिवाशी खेळ करून चित्रीकरणाचा हट्ट धरणे उचित ठरणारे नाही. मग ते कलाकार असोत वा निर्माते!

aditya.adityafeatures2020 @gmail.com

आपली प्रतिक्रिया द्या