
>>ऋता कळमणकर
जमिनीवरील सगळ्यात वेगवान प्राणी असा चित्त्याचा उल्लेख होतो. सडपातळ लवचिक शरीर, त्यावर साधारण 2000 एवढे भरीव काळे ठिपके, अतिशय सुंदर डोळे, अतिशय प्रमाणबद्ध खांदे, मजबूत पाठ, चेहऱयावर डोळ्यांपासून तोंडापर्यंत जाडसर काळी भरीव रेषा, अत्यंत वेगवान म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता म्हणजे वेग हे समीकरणच आपल्या मनात येते. चित्ता हिंदुस्थानात पूर्वी दिसत होता, परंतु 1951 मध्ये हा आंध्र प्रदेशात शेवटचा पाहिला गेला. दुर्दैवाने हिंदुस्थानातून हा देखणा प्राणी नामशेष झाला आहे. आता आशियाई चित्ता इराणमधील काही भागांत दिसतो, परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे.
आफ्रिकेतील दक्षिण, उत्तर व पूर्व भागात हा दिसतो. आफ्रिकन चित्ता हा येथील उंच गवतात सहज लपून जातो. पटकन दिसत नाही. हा शक्यतो उघडय़ा गवताळ कुरणात शिकार करतो. इतर मार्जार कुलातील प्राण्यांप्रमाणे हा रात्री शिकार करीत नाही. हा दिवसा शिकार करतो. लपून बसून शिकार टप्प्यात आली की, हा झेप घेतो. दोन ते तीन सेकंदांत 60 किलोमीटर वेग पकडू शकतो. 110 किलोमीटर वेगाने पळतो, पण हा वेग तो फार थोडय़ा काळासाठी वाढवतो. एकदा का शिकार पकडली की, हा भक्ष्याचा गळाच पकडून प्रथम स्वतःचे प्रचंड वेगाने वाढलेले शरीराचे तापमान कमी करतो. मग शिकार खातो. वेग तर असा की, डोळ्याची पापणी लवते न् लवते तोपर्यंत याने सावजावर झडप घातलेली असते. असा हा वेगवान सस्तन प्राणी आहे.
सिंह, बिबटय़ांसाखे प्राणी यांच्याशी हा शक्यतो आमना सामना करीत नाही. ते समोर आले तर निघून जातो. त्याचप्रमाणे चित्त्याला सिंहाप्रमाणे डरकाळी फोडता येत नाही व बिबटय़ाप्रमाणे गुरगुरताही येत नाही. हा ‘क्यव, क्यव’ असा आवाज करतो. इतर मार्जार कुळातील प्राणी त्यांची नखे पूर्णपणे आत घेऊ शकतात, परंतु चित्ता नखे पूर्णपणे आत घेऊ शकत नाही. त्याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे हा बरेचदा बिबटय़ा समजला जातो, परंतु बिबटय़ाच्या अंगावरील ठिपके पोकळ असतात व तो आकाराने मोठा असतो.
चित्ता हा साधारण 16 ते 20 वर्षांपर्यंत जगतो. 40 ते 55 किलोपर्यंत वजन असते. सकाळी व सायंकाळी तो जास्त ऍक्टिव्ह असतो. दुपारी शक्यतो विश्रांती घेतो. चित्ता या प्राण्याला साधारण 3 ते 5 किलोमीटर अंतरावर सावज सहज दिसते. हा प्राणी दोन-तीन दिवसांत एकदाच पाणी पिऊन घेतो.
मार्जार कुलातील सर्वच प्राणी हे त्याचे अधिवास नष्ट होण्यामुळे व चोरटय़ा शिकारीमुळे संकटग्रस्त आहेत.
Ruta Kalmankar





























































