लेख : स्नेहबंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

आज मकरसंक्रांत आपल्या सणांमधला एकमेव सौर सण. बाकीचे सारे सण चांद्रभ्रमणावर अवलंबून असतात. आपला मराठी महिनासुद्धा चैत्राच्या शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो. पौर्णिमा, अमावस्येला आपले अनेक सण साजरे होतात. आपल्या देशात थोड्याफार फरकाने चांद्रमासावर आधारितच कॅलेंडर (पंचांग) वापरलं जातं. त्यात एक सण मात्र सूर्याच्या मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसण्याशी निगडित असतो. 14 किंवा 15 जानेवारीलाच मकरसंक्रांत येते. कारण पृथ्वीने सूर्याभोवती फिरण्याचा काळ तेवढाच असतो.

वसंत-संपात बिंदूचं चलन म्हणजे तो तर बहात्तर वर्षांनी एक अंश मागे जात असल्याने एकेकाळी सूर्याचं उत्तरायण आणि मकर संक्रमण यांची असलेली सांगड आता बदलली आहे. आता उत्तरायण म्हणजे सूर्याचं पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे येण्याचा भासमान प्रवास. पृथ्वीच्या कलत्या अक्षाने घडवलेली ही किमया. संक्रांतीला दिवस ‘मोठा’ होऊ लागतो ही कल्पना खरी आहे, परंतु दिवसाचा काळ (डे-टाइम) वाढण्याची सुरुवात 22 डिसेंबरपासूनच होते. सप्टेंबरनंतर सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात अधिक वेळ प्रकाश देऊ लागला की, तिथे उन्हाळा आणि आपल्याकडे नोव्हेंबरपासून थंडी पडायला लागते. डिसेंबरात थंडीचा उच्चांक यंदा महाराष्ट्रानेही अनुभवला. आता सूर्यप्रकाशाचा काळ वाढायला लागल्याने ऊबदार सुखद थंडी आणखी काही काळ राहणारच आहे, परंतु सायंकाळी सवासहाच्या सुमारास होणारा अंधार आता हळूहळू साडेसहा, पावणेसात असा उशिरा होऊ लागल्याचं लक्षात येईलच. ही झाली या दिवसाची वैज्ञानिक माहिती.

परंतु संक्रांतीचं सांस्कृतिक महत्त्वही तितकंच आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा तिळगुळाचा सण. ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ यामध्ये तिळगुळाचा संबंध थंडीमधल्या आरोग्यदायी खाण्याशी येतो, पण त्याला जोडून ‘गोड बोला’ असा संदेश आपली संस्कृती दर्शवितो. स्नेहवर्धनाची आठवण करून देताना जुना स्नेह वृद्धिंगत व्हावा असे स्नेहबंध जुळावेत आणि काही नात्यांत काही कारणांनी दुरावा आला असेल तर तो दूर व्हावा अशी यामागची भावना.

‘मैत्री’सारखं दुसरं नातं नसतं. कोणातही कोणत्याही वयात मैत्री होऊ शकते. समवयस्क व्यक्तींमध्ये मैत्रीचं नातं असतंच. हल्ली तर मोबाईल, ऍपच्या माध्यमातून अगदी शाळकरी वयातले मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी भेटतात. एकाकडून दुसऱ्याचा पत्ता मिळवून पुन्हा एकदा शाळेतील, कॉलेजातील किंवा गावाकडच्या त्या काळातल्या मित्रांचा नव्याने ठावठिकाणा लागल्याचा आनंद काही आगळाच. ही मंडळी एकमेकांच्या प्रकृतीची, सध्या कोण काय करतंय याची आस्थेने चौकशी करतात. दूरच्या गावात किंवा दूरदेशी राहणारेही पुन्हा एका वर्गात किंवा पारावरच्या गप्पा करण्यासाठी जमावेत तसे जवळ येतात. त्यातून एकत्र भेटण्याचं ठरतं. सर्वांच्या सोयीने वेळ आणि जागा ठरते नि 20-25 वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ परस्परांना न भेटलेली मंडळी एकत्र येतात. काळाच्या ओघात चेहऱ्यात, राहणीमानात बदल झालेला असतो. प्रत्येकाची सुखं-दुःखं निराळी असतात. मात्र स्नेहरज्जूची पुन्हा गुंफण झाल्यावर या सर्व भावभावना सर्वांनाच आपल्या वाटू लागतात.

माणसांच्या दुनियेचं हेच तर वैशिष्टय़ आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. आपण समूहाविना राहू शकत नाही आणि समूहात वावरताना आपल्याला परस्परांच्या सहकार्याची नितांत गरज भासते. प्रत्येक क्षणी आपण कोणा ना कोणावर अवलंबून असतो. जन्मापासून आयुष्यभर आपल्याला माणसांच्या प्रवाहात जगायचं असतं. त्यातूनच नाती निर्माण होतात. त्यातली मोजकी नाती रक्ताची असतात, बाकीची स्नेह-मैत्रीची, परिचयातून निर्माण झालेली असतात.

कोणाशीही मैत्रीचं नातं जुळलं की, त्या व्यक्तीला आपण समजून घेण्याची जशी जबाबदारी येते तसंच ती व्यक्ती आपल्याला समजून घेते या समाधानाचं कवचही लाभतं. संत ज्ञानेश्वरांनी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असं मागणं ईश्वराकडे मागितलंय. सर्वच प्राणिमात्रांत परस्परस्नेहाची भूमिका असावी यापेक्षा उदात्त सदिच्छा काय असणार!

तिळगूळ देऊन-घेऊन ‘गोड बोलण्या’चा संकल्प करण्याआधी नाती दृढ करणं, नव्या मैत्रीचा आरंभ करून आपलं जग आणि आपल्या अनुभूतीचं क्षितिज विस्तारणं हे एक प्रकारचं वैचारिक संक्रमणच. सूर्य मकर राशीत (भासमान) प्रवेश करणारं प्रतीकात्मक स्नेहाचं संक्रमण प्रत्यक्ष जीवनात अवतरलं तर आपलंच जीवन सुखी होईल. जगात आज तुटकपणा, विसंवाद इथपासून ते विद्वेषापर्यंतच्या विकारांनी मानवी समूहाला चटके बसत असलेले आपण रोज वाचत-बघत असतो. उद्याचा काळ सर्वांसाठीच सुखाचा व्हावा आणि एकूणच सौहार्दाचं वातावरण वाढावं यासाठी काळजी असलीच तर कटुता विसरून आज ‘गोड बोलण्या’चा संकल्प करूया. मनातले विकल्प दूर करूया.

[email protected]