
>> डॉ. सरिता विनय भावे
एकूणच चित्ताकर्षक रचना आणि बहारदार रंगांमुळे ताम्हण या फुलाला महाराष्ट्राच्या ‘राज्यफुला’चा मान मिळाला असावा. या लावण्यपूर्ण झाडा-फुलाच्या गौरवार्थ हिंदुस्थानी टपाल खात्याने 1993 साली तिकीटही काढले होते.
तरु, वृक्ष, झाड… धरतीकडून मानवाला मिळालेले वरदान… नयनांच्या आणि मनाच्या तलखीला शीतलता प्रदान करणारा एक अक्सीर इलाज… रंगागंधांची उधळण करण्यातच धन्यता मानणारे दातृत्ववान तपस्वी… घनदाट, गर्द हिरव्या कवितेचे कारंजे… त्यामुळे गोविंदाग्रजांच्या ‘महाराष्ट्र गीता’त ‘नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा’ असा उल्लेख आला की झर्रकन विविधरंगी फुले डोळ्यांसमोरून तरळून जातात आणि नजर स्थिरावते ती महाराष्ट्राच्या ‘राज्यपुष्पा’वर! तलम, मुलायम पाकळ्या असलेल्या फुलांच्या तुऱयांचा मुकुट मस्तकी धारण करणारे, मार्च-एप्रिल महिन्यातच बहरणारे हे अतिसुंदर झाड आहे ताम्हण किंवा जारुळ किंवा मोठा बोंडारा. हिंदीत याला ‘जारुल’ म्हणतात तर इंग्रजीत ‘प्राईड ऑफ इंडिया’, ‘क्वीन क्रेप मिर्टल’ अशी नावे आहेत. वनस्पतीशास्त्रात याला Lagerstroemia speciosa या नावाने ओळखले जाते.
आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंड, हिंदुस्थानभर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मुंबई सगळीकडे हे मध्यम उंचीचे, डेरेदार, हिरव्यापंच पर्णसंभाराने आणि आकर्षक पुष्पगुच्छांमुळे कमालीचे शोभिवंत दिसणारे झाड आढळून येते. हा पानगळीचा वृक्ष असून भरपूर पाणी मिळणाऱया ठिकाणी जोमाने वाढतो. खोड मऊ असून पेरूच्या झाडाप्रमाणे याची साल निघते. पाने लंबगोलाकार असून टोकाला अणकुचीदार असतात. भर उन्हाळ्यात साधारण 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचे फुलोरे झाडाच्या शेंडय़ाजवळ येतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जातात. फिकट गुलाबी, गुलाबी किंवा जांभळ्या (लव्हेंडर) फुलांना क्रेपच्या कागदासारख्या वाटणाऱया, झालरीसारख्या चुण्याचुण्या असलेल्या, सहा ते सात नाजुक, आकर्षक पाकळ्या असतात. शीतल, प्रसन्न रंगसंगतीच्या पाकळ्यांच्या विरुद्ध रंगाचे पिवळेजर्द पुंकेसर एकमेकांना उठाव देतात. पुंकेसरांची संख्या बरीच म्हणजे वीसपर्यंत असू शकते. बहर दोन-तीन महिने टिकतो. जमीन, पाणी, हवामान यातील बदलांनुसार फुलांची रंगछटा बदलते. एकूणच चित्ताकर्षक रचना आणि बहारदार रंगांमुळे ताम्हण या फुलाला महाराष्ट्राच्या ‘राज्यफुला’चा मान मिळाला असावा. या लावण्यपूर्ण झाडा-फुलाच्या गौरवार्थ हिंदुस्थानी टपाल खात्याने 1993 साली तिकीटही काढले होते.
या झाडाचे लाकूड सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. समुद्राच्या खाऱया पाण्याचाही याच्यावर परिणाम होत नाही आणि ते लवकर कुजतही नाही. म्हणून बंदरात खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी याचा उपयोग केला जातो. रेल्वे वॅगन, जहाजबांधणी, इमारती आणि पूल यांच्या बांधकामासाठीही याचे लाकूड वापरतात. झाडाचे साल औषधी असून सालीचा काढा तापावर गुणकारी मानला जातो. अशी ही बहुगुणी; घरांच्या अंगणांतून, बागांतून, रस्त्याच्या कडेला शोभेसाठी आणि सावलीसाठी लावलेली झाडे मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात हमखास जाणवणारा रणरणता, रखरखता उन्हाळा आपल्यासाठी शीतलदायी आणि नेत्रसुखद करतात यात यत्किंचितही शंका नाही!





























































