चित्र अन् शब्द…   

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

एखाद्या मुद्दय़ाला जेव्हा आपल्याला समर्पक पद्धतीने अगदी साध्या, सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगायचे असते, तेव्हा आपल्याला शब्दांचा जितका उपयोग होतो त्याहूनही जास्त चित्रांचा उपयोग होतो.

एक चित्र हे शंभर शब्दांचे काम करत असते आणि म्हणूनच जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे वक्त्याने जर पावर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा एलईडीचा वापर केला तर त्याचे म्हणणे लोकांपर्यंत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत पोहोचू शकते.

हे करण्यासाठी त्या वक्त्याला विषयाला अनुसरून असणाऱ्या चित्रांचा संग्रह करावा लागतो. स्लाईडवरचे चित्र समजावत असताना ते चित्र स्पष्ट स्वच्छ आणि विषयाला अनुसरून असेल याची काळजी घ्यायला हवी. त्यासोबत त्या चित्रावर जास्त शब्द न ठेवता जो मुद्दा आहे तो आपल्या बोलण्यातून लोकांना समजवायला हवा. चित्र दाखवल्याने लोकांचा ऐकण्यातला रस वाढतो. कारण त्यांना दृकश्राव्य पद्धतीने विषयाला जाणून घेता येते. एखादी क्लिष्ट संकल्पना, एखादा तांत्रिक विषय समजावून सांगण्यासाठी चित्र अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. चित्र वापरत असताना तुम्हाला जे चित्र वापरले आहे त्या चित्रकाराची किंवा छायाचित्रकाराची परवानगी घेणेदेखील आवश्यक आहे. एखाद्या मोठय़ा मंचावर जेव्हा आपण अशा चित्रांचा वापर करून आपण भाषण किंवा संवाद देत असतो त्यावेळेस त्या त्या चित्राचे कॉपीराइट्स आणि इतर अधिकार या गोष्टींची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

चित्राने एखादी गोष्ट समजावल्याने ती रंजक होत असते. म्हणूनच आपले म्हणणे योग्य पद्धतीने जर मांडायचे असेल तर विषयाला योग्य चित्रांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवता येऊ शकते. ही चित्रे वापरत असताना अंतिम सादरीकरण करताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या उपकरणावर ते सादर करताय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रोजेक्टरवरचा रेशियो आणि एलईडी स्क्रीनवरचा रेशियो हा वेगवेगळा असल्यामुळे तो उभा आहे की आडवा आहे, त्याची स्पष्टता किती आहे, मंचाच्या आजूबाजूची प्रकाशयोजना काय आहे याविषयीची माहिती वक्त्याला असायला हवी. चित्र हे शब्दांचे सामूहिक स्वरूप असते आणि जितकी जास्त चित्रे तितके सादरीकरण रंजक होत जाते. परंतु अति चित्रांचा वापर करून स्लाईडचा भडिमार श्रोत्यांवर करू नये, जेणेकरून त्यांना त्या विषयाची संपूर्ण माहिती मिळत असताना संभ्रम निर्माण होईल.

लक्षात असू द्या, कमीत कमी वेळात आपला विषय जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर शब्दांसोबत चित्रांचा वापर हा वक्त्याला खूप उपयोगी ठरू शकतो. तेव्हा चित्र आपल्या वक्तव्यात जरूर वापरा. कारण चित्रं बोलतात.