
आज दिवाळी पहाटेचा आनंद हा लेख हाती येईपर्यंत सर्वांनी घेतला असेल. पहाट गाण्यांचे कार्यक्रमही अनेक ठिकाणी होतात. ‘ग्रंथाली’ आणि ऍडफीझतर्फे आम्हीही ‘अमराठींची मराठी गाणी’ याच आपल्या ‘नाद-मराठी’मधल्या आशयावर आधारित कार्यक्रम करतोय. पण आजच्या लेखात केवळ अमराठीच नव्हे तर आपल्या मराठी मातब्बर गायक-गायिकांनी गायिलेल्या पहाटेच्या गाण्यांचा आढावा या ‘दिवाळी-विशेष’ लेखात घेऊया.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरातील आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं रामानंद कवीचं पारंपरिक गीत आहे. ‘उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरा गजमुख, रिद्धीसिद्धीचा नायक सुखदायक सर्वांसी’ ही भूप-देसकार रागावर आधारित रचना प्रसन्न करते. असंच गिरीधर कवीचं दुसरं पारंपरिक गाणं आशाताईंनी गायिलंय. वसंत प्रभू यांचं संगीत असलेल्या या गीताचे बोल आहेत, ‘उठा उठा सकल जन वाचे स्मरा गजानन गौरीहराचा नंदन गजवदन गणपती.’ पहाटेची गाणी अर्थातच त्या वेळच्या स्वररागांवर आधारित असतात. यात मुख्यत्वे भूप, देसकार, भटियार, तोडी, केदार असे राग येतात. ‘भैरवी’सुद्धा सकाळचाच राग. त्यात एका दिवाळीचं गाणं असं-
लाख दिवे लखलखती, तारा जणू नभी हसती
दीपावली येई आज आनंदा ये भरती…
गाण्याचं संगीत कुणाचं ते नाही समजलं, पण गीत सिद्धहस्त कवयित्री शांता शेळके यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा. गाणं ऐकताना तुम्हाला ‘तू गंगा की मौज मै जमना की धारा’ हे गीत नक्की आठवेल. ‘तोडी’ रागातलं दशरथ पुजारी यांनी संगीत देऊन गायिलेलं मधुकर जोशी यांचे पहाटगीत आहे ‘रात्र पश्चिमेला सरली भल्या या पहाटे, योगिनी मीरा कृष्णाची, राग तोडी गाते.’
मधुकर जोशी याचंच आणखी एक प्रभातगीत सुमन कल्याणपूर यांनी गायिलंय. संगीत आहे गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले यांचं. ‘उठ मुकुंदा सरली रात, सोनपाऊली आली पहाट’ जनकवी पी. सावळाराम यांचे शब्द, दशरथ पुजारी यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा स्वर असलेलं पहाटगाणं ‘अरुण उगवला अनुरागाचा, उजळत आभाळी; उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगळ भाळी’ ग. दि. माडगूळकर यांचं ‘अन्नपूर्णा’ चित्रपटातली स्नेहल भाटकर यांचं संगीत असलेली प्रसिद्ध भूपाळी म्हणजे ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशी उजळती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती.’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचं एक हृद्य पहाटगीत म्हणजे ‘अजून नाही जागी राधा, अजूनि नाही जागे गोकुळ; अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे का पावा मंजुळ.’ खरं तर पहाटपूर्व गीत कृष्णभक्तीत विलीन झालेल्या कुब्जेचं आहे! गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीत दशरथ पुजारी यांचं. ‘प्रेम आंधळं असतं’ या चित्रपटासाठी ग. दि. माडगूळकर यांनी एक भूपाळी लिहिली – ‘जाग रे यादवा कृष्ण गोपालकर, फिटल्या तारा रात्र सरली.’ या गाण्याचं संगीत राम कदम यांचं आणि स्वर सुमनताईंचाच.
नाटककार विद्याधर गोखले यांचं कान्होपात्रा किणीकर यांनी गायिलेलं प्रभातगीत म्हणजे ‘उजळीत जग मंगलमय अरुणबिंब आले, सोनेरी किरणांनी भूमंडल न्हाले’ याचं संगीत आहे ज्येष्ठ गायक छोटा गंधर्व यांचं. त्याचप्रमाणे ‘जयोस्तुस्ते, उषा देवते’ हेसुद्धा गोखले यांचं पं. राम मराठे यांनी गायिलेलं प्रभात नाटय़गीत ‘मंदारमाला’ या नाटकातलं. संगीत पं. राम मराठे यांचंच आहे.
कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकरांचं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं सुमधुर पहाटगाणं म्हणजे ‘राम प्रहरी राम गाथा रंगते ओठावरी.’
वाणी जयराम यांनी मराठीत मोजकीच गाणी गायिली. ‘सून माझी सावित्री’ या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं आणि राम कदम यांनी संगीत दिलेलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं ‘उठा उठा हो सूर्यनारायणा, थांबली सुवासिनी पूजना’ हे एक पहाटगाणं, शांताबाई शेळके यांचे ‘स्वप्न तेच लोचनी’ या चित्रपटातली भूपाळी म्हणजे ‘एक एक विरते तारा, असमंत ये आकारा; उभा देवराया क्षितिजावरती, उठी श्रीधरा रे सरली राती’ या गाण्याचं संगीत अदिल अहमद यांचं आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा आहे.
पहाट गाण्यांनी खूप गाजलेल्या दोन भूपाळय़ा आहेत. चतुरस्र संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या त्यापैकी बाळ कोल्हटकर यांच्या ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकातलं त्यांचंच गीत पं. कुमार गंधर्वांनी गायिलंय ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला, स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाला.’ आणि त्यापूर्वी मनामनात गुंतलेली वसंत देसाईंच्या संगीतातली ‘अमर भूपाळी’ होनाजी बाळा यांची. ‘घनःशाम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला.’ अशा या गीतांनी, स्वरांनी आणि उत्तम संगीताने आपली पहाट अनेक वर्षे सात्त्विक, संपन्न, प्रसन्न केली आहे. शांता शेळके म्हणतात त्याप्रमाणे दिवाळीचा ‘मंगलदिन, मंगल क्षण देई जगा संजीवन’ असंच घडो आणि ‘दुरितांचे तिमीर’ जाऊन सर्वांना सुखाची पहाट अनुभवायला मिळो हीच सदिच्छा!
>> अरुण जोशी




























































