प्राण प्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाची छायाचित्रे प्रसारित झाल्यामुळे शिल्पकार अरुण योगीराज दु:खी

अयोध्या येथे 22 जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदीर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रामलल्लांच्या मुर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. पण प्राण प्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाची छायाचित्रे प्रसारित झाल्यामुळे मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज दु:खी झाले आहेत. योगीराज यांची पत्नी विजेता अरुण यांनी ही माहिती दिली आहे.

रामलल्लाची छायाचित्रे सर्वत्र वेगाने प्रसारीत झाली आहेत. रामलल्लाची मुर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज मात्र यामुळे दु:खी झाले आहेत. कारण रामलल्लाचे पुर्ण चित्र अद्याप समोर आले नाही. मात्र रामलल्लाच्या मुर्तीला लोकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहून आनंद झाल्याची भावना अरूण योगीराज यांच्या पत्नी विजेता अरूण यांनी व्यक्त केली.

रामलल्लाची मुर्ती बनवण्यासाठी काळ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्याबद्दल बोलताना विजेता अरुणा म्हणाल्या की, या दगडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दगडावर दुधाचा अभिषेक केल्याने दगडावर कोणताही परिणाम होत नाही. या दगडाला कोणत्याही प्रकराच्या आम्ल किंवा इतर पदार्थांमुळे इजा होणार नाही आणि हजारो वर्षे मुर्ती आहे तशीच राहीलं.

अरुण योगीराज हे कर्नाटकचे रहीवासी आहेत. शिल्पकलेचा वारसा त्यांना त्यांचे वडील योगीराज यांच्याकडून मिळाला. योगीराज हे देखील कुशल शिल्पकरा आहेत. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वाधिक मागणी असलेले शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांच्या आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजाने संरक्षण दिले होते. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतूक केले आहे.