
कानपूरमधील पहिल्या कसोटी लढतीसाठी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघाचे क्रिकेटपटू कानपूरमध्ये पोचले आहेत. पहिल्या कसोटीला काही दिवस उरलेले असताना एका वेगळ्याच गोष्टीवरून मोठा वाद पेटला आहे. ‘बीसीसीआय प्रमोटस् हलाल’ या ट्विटरवरील ट्रेण्डने हिंदुस्थानी क्रिकेटशौकीन हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) प्रचंड संतापले आहेत. टीम इंडियात बहुसंख्य हिंदू खेळाडू असताना बीसीसीआयने जेवणाच्या मेनूत हलाल पद्धतीचे मांस ठेवण्याची गरजच काय, असा संतप्त सवाल सोशल साइटस्वर करीत क्रिकेटशौकिनांनी बीसीसीआयला चांगलेच धारेवर धरले आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघाचे क्रिकेटपटू कानपूरच्या हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये बायोबबलमध्ये राहणार आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचा मेनू बीसीसीआयने प्रसिद्ध केला आहे. या मेनूत हलालपद्धतीने कापल्या जाणाऱ्या जनावरांचे मटण सामील आहे असे समजताच क्रिकेटशौकिनांच्या संतापाचा पारा चढला आहे. सुमारे 21 हजारांहून अधिक चाहत्यांनी बीसीसीआयला हलाल मांस जेवणात वाढण्याची गरज का भासलीय, असा संतप्त सवाल केला आहे. हिंदू धर्माचे नागरिक झटकापद्धतीने कापलेल्या प्राण्याचे मांस खातात. मग टीम इंडियाच्या जेवणाच्या मेनूत ‘हलाल मीट’ समाविष्ट करण्याची शेखी क्रिकेट बोर्डाने मिरवायला नको, असे या चाहत्यांचे म्हणणे आहे.
बोर्डाच्या मेनूतील मांसाहारात ‘हलाल मीट’
बीसीसीआयने टीम इंडिया क्रिकेटपटूंच्या रोजच्या जेवणाचा आणि नाश्त्याचा मेनू जाहीर केला आहे. कसोटी लढतीदरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर पूर्ण दिवस खानपान सेवा सुरू राहणार आहे. त्यात मिनी ब्रेक फास्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे डीनर समाविष्ट आहे. या जेवणाच्या मेनूतून पोर्क (डुकराचे मांस) आणि बीफ वगळण्यात आले आहे. मात्र त्यात मांसाहारी पदार्थांत हलालपद्धतीने कापलेल्या जनावरांचे मांस सामील आहे, असे कळताच हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांचा संताप उसळला आहे.
टीम इंडियाचे बहुतांश क्रिकेटपटू हिंदू आहेत. त्यांच्या धर्मानुसार हलालपद्धतीचे मांस खाणे वर्ज्य आहे. मग बीसीसीआय त्यांच्यावर तशी बळजबरी कशी करतेय?
हिंदुस्थानी क्रिकेट शौकीन
‘प्रमोटस् हलाल’ हा कुणीतरी रिकामटेकडय़ांनी सोशल साइटस्वर चालवलेला फालतू ट्रेंड असून तसे काही नाहीय. बीसीसीआयला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे.
अहमद अली खान, अपेक्स कमिटी सदस्य, यूपीसीए




























































