
सामना प्रतिनिधी । बीड
बीड लोकसभा निवडणुकीसाठी 59 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी या उमेदवारांची छाननी होती. त्या दरम्यान अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले. या आक्षेपावर दुपारी चार वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीत प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवरील आक्षेप अखेर फेटाळण्यात आले. तोपर्यंत मात्र बीड जिल्ह्यातील संपूर्ण भाजपचे लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी चार मुद्द्यावर आक्षेप घेतले होते. निवडणुक अधिकाऱ्यांनी घेतलेले आक्षेप स्वीकारत या आक्षेपावरील सुनावणी चार वाजता ठेवली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर डॉ.प्रीतम मुंडे यांच्यावरील चारही आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोबा गर्दी झाली होती. अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी दोन लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदविलेले आहे. एक मुंबई दक्षिण मतदारसंघात आणि दुसरे बीड लोकसभा मतदारसंघात. प्रीतम गोपीनाथराव मुंडे या जाणिवपूर्वक बीड जिल्ह्यातील मतदारांना भावनिक करण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे नाव स्वत:च्या नावापुढे लावत आहेत. त्यांचे सर्व आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार प्रीतम गौरव खाडे या नावाने सुरू आहेत. पॅन कार्ड, व्यावसायिक डीन नंबर प्रीतम गौरव खाडे या नावानेच आहे. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांचा प्रीतम गौरव खाडे या नावाने काढण्यात आलेल्या उद्योग नोंदणीचा वार्षिक हिशोब वेळेवर सादर करण्यात आलेला नाही, असे आक्षेप घेण्यात आले होते. हे सर्व आक्षेप फेटाळण्यात आले.































































