भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी 3 जणांना दोषी ठरवले, आरोपींमध्ये केअरटेकरचाही समावेश

भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने 3 जणांना दोषी ठरवलं आहे. या तिघांनाही आज संध्याकाळपर्यंत शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. ज्या तिघांना दोषी ठरवलं आहे त्यामध्ये भय्यू महाराज यांच्या केअरटेकरचाही समावेश आहे. सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक या तिघांना न्यायालयाने भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

विनायक, शरद आणि पलक या तिघांनी भय्यू महाराजांना इतका त्रास दिला की त्यांनी आत्महत्या केली असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्यापुढे भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी झाली. ही सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आरोपी निर्दोष आहेत का दोषी याचा निवाडा केला. विनायक, शरद आणि पलक यांना दोषी ठरवल्यानंतर आता त्यांना शिक्षा काय द्यायची यावर युक्तिवाद होऊन आज संध्याकाळपर्यंत तिघांच्या शिक्षेबाबत आदेश येण्याची शक्यता आहे. तीनही आरोपी हे भय्यू महाराजांच्या जवळचे होते. त्यांना या तिघांवर इतका विश्वास होता की त्यांनी आश्रमाची जबाबदारी या तिघांवर सोपवली होती. याचा गैरफायदा घेत तीनही आरोपींनी भय्यू महाराजांना पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती. या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केली होती. आरोपी विनायक याचे वकील आशिष चौरे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भय्यू महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची सगळी जबाबदारी विनायकला सोपवली होती. यामुळे त्याला खोट्या प्रकरणात गोवलं गेलं असा युक्तिवाद वकील चौरे यांनी केला होता. भय्यू महाराज पुण्याला जात असताना कोणाचा तरी त्यांना सतत फोन येत होता, याचा पोलिसांनी नीट तपास केला नसल्याचा दावाही चौरे यांनी त्यांच्या युक्तिवादात केला होता. आरोपी शरद याची बाजू वकील धर्मेंद्र गुजर यांनी मांडली होती तर पलक हिची बाजू वकील अविनाश शिरपूरकर यांनी मांडली होती.