अतिवृष्टीने नशीबच वाहून नेले! उद्ध्वस्त शेतकर्‍यांशी राहुल गांधी यांचा संवाद, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षांत झाला नाही, असा पाऊस यंदा झाला. शिवाराची दलदल झाली. सोयाबीन, कापूस, हळद या पिकांबरोबरच आमचे नशीबही पावसाने वाहून नेले! पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी आपली व्यथा मांडत होते. शेतकर्‍यांच्या वेदना ऐकून काँग्रेस नेते राहुल गांधीही क्षणभर सैरभैर झाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली मुक्कामी आहे. कामठा येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डी.के. दुर्गे यांच्या शेतावर जमलेल्या शेतकर्‍यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यंदा पावसाने शिवारच धुऊन नेले. सोयाबीन, कापूस, हळद, भुईमूग हाती लागले नाही. शिवारात नुसती दलदल झाली. पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई सरकार करेल अशी आशा होती. पण, अद्याप छदामही मिळाला नाही. नुसतीच घोषणांची अतिवृष्टी होत आहे. सरकारने मदत केली नाही तर शेकडो शेतकरी कुटुंबे देशोधडीला लागतील. शेतावर जमलेल्या एकेका शेतकर्‍याच्या डोळ्यातून वेदनेचा महापूर लोटला होता आणि राहुल गांधी सुन्न होऊन ऐकत होते.

पीक विम्यासाठी होणारी अडवणूक, शेतमाल हाताशी आल्यानंतर बाजारात कोसळणारे भाव आदी अडचणीही यावेळी शेतकर्‍यांनी मांडल्या. महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण देशभरातील शेतकरी अडचणीत आहेत. शेती, शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊ, असे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना दिले.