भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन! पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यासह देशभरातील लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत.  गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचार घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा या कार्यक्रमासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांकडून 1 जानेवारीला तब्बल पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. त्याचबरोबर राखीव पोलीस दलाच्या 12 टीम, 1200 होमगार्ड आणि 2000 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 500 सीसीटीव्ही, 11 ड्रोन आणि 110 व्हिडीओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सर्व परिसरावर पोलीस नजर ठेवणार आहेत. दरम्यान, 1 जानेवारीला जिह्यात ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे.

भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरक्षिक विश्वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. नांगरे-पाटील म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या घटनेमुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण झाले होते, मात्र जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक नागरिक, विविध संस्था, संघटनांना विश्वासात घेऊन यंदा अभिवादन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे.

पोलीस बंदोबस्त
5000 पोलीस, 2000 स्वयंसेवक, 1200 होमगार्ड, 12 सीआरपीएफ टीम, 7 घातपातविरोधी पथके, 8 अप्पर पोलीस अधीक्षक, 31 पोलीस उपअधीक्षक, 126 पोलीस निरीक्षक,  360 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक.

25 रुग्णवाहिका, 5 कार्डियाक रुग्णवाहिका, परिसरातील रुग्णालयांमध्ये 10 टक्के खाटा राखीव, 20 किमी लांबीचे बॅरिकेडस्, 200 पाण्याचे टँकर, 170 फायर प्रोटेस्ट बलून, 300 स्वच्छतागृहे, अग्निशमन दलाचे 23 बंब, 16 क्रेन, 14 ठिकाणी नवीन लाइटस्, 150 पीएमपीएलच्या बसेस, 200 खासगी वाहने, 50 दुर्बिण.