Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; आता पुढे काय होणार?

लोकसभा निवडणूक सुरू असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. देशभरातील 102 जागांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 8 जागांचाही समावेश होता. या 8 जागांवर जवळपास 61 टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का घसरल्याने सत्ताधारी पक्षाला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच भारतीय जनता पक्षासाठी शनिवारी आणखी एक वाईट बातमी आली. भाजपचे माजी खासदार आणि मोरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह (वय – 72) यांचे निधन झाले.

Kunwar Sarvesh Singh हे मोरादाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढत होते. शुक्रवारी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर तब्येत बिघडल्याने कुंवर सर्वेश सिंह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बऱ्याच काळापासून कुंवर सर्वेश सिंह हे गंभीर आजाराचा सामना करत होते. त्यांना घशासंबंधी समस्या होती आणि त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शुक्रवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. मात्र तब्येत बिघडल्याने त्यांना तिथेच दाखल करून घेण्यात आले. उपचारांदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी दिली. कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

कुंवर सर्वेश सिंह हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. मोरादाबाद आणि आसपासच्या भागामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. ठाकूरद्वारा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदारही झाले होते. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकूनही आले. मात्र 2019 ला झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या एसटी हसन यांनी त्यांचा पराभव केला. आता ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आता पुढे काय होणार?

दरम्यान, कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाची माहिती मोरादाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाचा निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. नियोजित दिवशी (4 जून) मतमोजणी पार पडेल. यात कुंवर सर्वेश सिंह विजयी झाले तर येथे पोटनिवडणूक घेण्यात येईल आणि पराभव झाला तर तशी वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.