भाजपने मिंध्यांना फोडला घाम; पालघरचे ठरेना, ठाण्यात उमेदवार मिळेना!

उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानादेखील मिंध्यांना ठाणे, पालघरमध्ये आपले उमेदवार जाहीर करता आले नाहीत. राजेंद्र गावित यांना भाजपने यापूर्वीच कमळ चिन्हावर लढवण्यास इच्छुक असल्याची पुडी सोडायला लावली, तर माजी खासदार संजीव नाईक यांना प्रचारास उतरवून भाजपने या दोन्ही मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे पालघरचे ठरेना.. आणि ठाण्यात उमेदवार मिळेना.. अशी गोची मिंध्यांची झाली असून सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्थाही झाली आहे.

खोक्यांसाठी गद्दारी केलेल्या मिंधे गटाने लोकसभा निवडणुकीत 24-25 जागा लढू अशा वल्गना केल्या होत्या. प्रत्यक्षात पदरात केवळ दहा ते अकरा जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचीदेखील जागा त्यांना जाहीर करता आलेली नाही. पालघरमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा होती, परंतु विजयाची खात्री नसल्याने त्यांनीच आपण कमळ चिन्हावर लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. मात्र यामागे कमळाबाईचा डाव असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मिंधे गटाचे बोलघेवडे नेते ठाणे आमचेच असे सांगत असले तरी भाजपने या मतदारसंघावर दावा सांगत महिनाभरापूर्वीच संजीव नाईक यांना प्रचाराला उतरवले आहे. ते स्वतः ठाण्यातून आपल्याला संधी मिळेल असे सांगत आहेत. त्यामुळे पालघरच्या जागेसाठी एकीकडे वाटाघाटी सुरू असताना ठाण्यातही भाजपने कोंडी केल्याने मिंध्यांची बोलती बंद झाली आहे.

भाजपकडून अर्जाची खरेदी
ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला नसताना मंगळवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मिंधे गटाला अंधारात ठेवले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भाजपच्या या धक्कातंत्रामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आशावादी असल्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

भाजपचा अल्टीमेटम
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराला ठाण्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मिंधे गटातून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या ‘बोलघेवडे’ नेत्यांना संधी दिल्यास मतदार त्यांना झिडकारतील अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. हा धोका टाळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून ठाणे आम्हाला द्या.. पालघर तुम्हाला घ्या असा अल्टीमेटम दिला आहे.

उमेदवार चालणार नाहीत.. जागा हातची जाईल
मिंधे गटातून माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांनी यूट्यूब चॅनलवाल्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावाच्या ‘घोषणा’ केल्या आहेत. मात्र मिंधे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक यांना गळ घातली जात आहे, परंतु सरनाईक फारसे इच्छुक नसल्याने मिंध्यांची गोची झाली आहे. त्यामुळे ठाण्यात तळ ठोकलेल्या भाजपच्या एका बड्या नेत्याने हे उमेदवार चालणार नाहीत.. जागा हातची जाईल असे सांगत मिंध्यांचे टेन्शन वाढवले आहे.