’बेस्ट’ समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे प्रवीण शिंदे, ’सुधार’साठी सदानंद परब!

पालिकेच्या ’बेस्ट’ समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे आणि सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी गुरुवारी पालिका चिटणीसांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही समित्यांसाठी विरोधी पक्ष आणि भाजपकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ’बेस्ट’ समिती अध्यक्षपदासाठी विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे रवी राजा यांनी अर्ज सादर केला.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱया निवडणुका यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे रखडल्या होत्या. मात्र राज्य सरकारने व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे या निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे 30 सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेवक प्रवीण शिंदे यांनी पहिल्यांदाच ’बेस्ट’ समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. तर सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी सलग दुसऱया वेळी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ’बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, दत्ता नरवणकर आदी उपस्थित होते. ’बेस्ट’साठी भाजपकडून प्रकाश गंगाधरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी तर भाजपकडून विनोद मिश्रा यांनी अर्ज सादर केला.

शिवसेनेचा विजय निश्चित, 6 ऑक्टोबरला शिक्कामोर्तब

‘बेस्ट’ समितीमध्ये शिवसेना 8, भाजप 6, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. तर सुधार समितीत शिवसेना 12, बीजेपी 10, काँग्रेस 2, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक आहे. यातच विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी-’सपा’ आणि भाजप यांच्याकडून स्वत:चा उमेदवार दिल्याने दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित मनाला जात आहे. ’बेस्ट’ आणि सुधार समितीची निवडणूक 6 ऑक्टोबरला होणार असून यावेळी शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल.

आपली प्रतिक्रिया द्या