पालिकेच्या सागरी सुरक्षेचे ‘गोवा मॉडेल’100 टक्के यशस्वी

देवेंद्र भगत, मुंबई

मुंबई महापालिकेने चौपाटय़ांच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘गोवा मॉडेल’ 100 टक्के यशस्वी ठरले आहे. डिसेंबर 2018 अखेरपासून ही सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत समुद्रात बुडून एकही बळी गेला नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. या काळात घडलेल्या अनेक दुर्घटनांमध्ये लाइफगार्डनी आठ ते दहा जणांचा जीवही वाचवला आहे. मुंबईच्या सातही चौपाट्यांवर सध्या ही सेवा तैनात आहे.

मुंबईच्या चौपाट्यांवर दररोज देशविदेशातील हजारो पर्यटक येत असतात. यामध्ये काही वेळा पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे आणि दुर्घटनांमुळे जीवितहानी होण्याचे प्रकार घडतात. शिवाय काही वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो. या पार्श्वभूमीवर गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सात प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या चौपाटय़ांच्या सुरक्षेसाठी पालिकेने गोवा राज्याच्या धर्तीवर ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’ सुविधा सुरू केली आहे.

यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी तंत्रकुशल लाइफगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी केलेल्या भरतीत समुद्री जीवनाची माहिती असणाऱ्या कोळी बांधवांना प्राधान्य देण्यात आले असून याचे प्रमाण 80 टक्के असल्याची माहिती ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’चे मॅनेजर विक्रम शेलार यांनी दिली. या लाइफगार्डची सेवा सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तैनात असल्याचेही त्यांनी सांगितले.

असे आहे गोवा मॉडेल
गोव्याच्या किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीच्या माध्यमातून तंत्रकुशल लाइफगार्ड तैनात ठेवल्यामुळे जीवितहानी टळली आहे. या लाइफगार्डना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मान्यता असणाऱ्या ‘स्पेशल रस्क्यू ऍकॅडमी’कडून तांत्रिक कौशल्य शिकवण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबईचे किनारे सुरक्षित करण्यात आले आहेत.

चौपाट्यांवर अशी सुरक्षा
गिरगाव – 12
दादर – 12
जुहू – 12
वर्सोवा – 12
अक्सा – 14
गोराई – 16

नव्या सुरक्षेमुळे पालिकेकडे उपलब्ध असणाऱया लाइफगार्डची संख्या 39 वरून 94 झाली असून नवे तंत्रज्ञानही आले आहे. त्यामुळे साहजिकच मनुष्यबळ वाढल्याने दुर्घटनेत जीवितहानी होणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे आता नियुक्त करण्यात आलेले लाइफगार्ड हे तंत्रकुशल असल्याने दुर्घटनांमध्ये बचावकार्य वेगाने करता येत आहे.
– डॉ. प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलप्रमुख