दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात सुटका, आरोपपत्राची दखल घेतल्याशिवाय अनिश्चित काळाची कोठडी अवैध; हायकोर्टाचा ईडीला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंतवणूकदरांची तब्बल दोनशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींची सुटका करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने ईडीला चांगलाच दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतल्याशिवाय संशयित आरोपीला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सुधीर कोटाडियासह अन्य एका आरोपीला ईडीने मार्च महिन्यात अटक केली. 135 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा या दोघांवर आरोप आहे. यात दोनशे कोटींचे मनी लाँडरिंग झाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडीने याचे आरोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्राची दखल घेण्याआधीच विशेष न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडी कायम असेल, असे आदेश जारी केले. त्याविरोधात या संशयित आरोपींनी अपील याचिका दाखल केली.

न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आरोपपत्राची दखल घेतल्याशिवाय व विनाकारण संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवता येणार नाही. तेव्हा विशेष न्यायालयाचे आदेश रद्द करावेत व आमच्या सुटकेचे निर्देश द्यावेत, अशी विनंती या संशयित आरोपींनी केली. याला ईडीने विरोध केला.

या संशयित आरोपींचा गुन्हा गंभीर आहे. कठोर अटी टाकल्या तरी हे संशियत आरोपी जामीन मिळाल्यावर देश सोडून पळून जाण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा ही याचिका फेटाळून लावावी व या संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत राहू द्यावे, अशी मागणी ईडीने केली. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली व संशयित आरोपींच्या सुटकेचे आदेश जारी केले.

हजर राहावे लागेल

आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहावे लागेल, या अटीवरच या संशयित आरोपींची कारागृहातून सुटका करा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.