पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय चार आठवड्यांत घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना जून 2020 पर्यंत पोलीस महासंचालक पदावर ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. पडसलगीकर यांच्या या मुदतवाढीबाबतच्या प्रस्तावावर चार आठवड्यांत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारला दिले. तसेच याबाबतची याचिका निकाली काढतानाच याचिकाकर्त्यांना काही आक्षेप असल्यास हायकोर्टात पुन्हा दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

पोलीस दलात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट 2018 च्या अखेरीस सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांना शासनाने तीन महिन्याची मुदतवाढ दिली. नोव्हेंबरअखेरीस ही मुदतवाढ संपल्याने शासनाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. आता फेब्रुवारी 2019च्या अखेरीस पडसलगीकर सेवानिवृत्त होणार आहेत. पडसलगीकर यांना सरकारने वारंवार दिलेल्या मुदतवाढीला आक्षेप घेत ऍड. आर. आर. त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.