
>> अरुण भंडारे
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतांच्या कुशीत कोरलेली बौद्ध, जैन आणि हिंदू लेणी हा शिल्पकलेचा एक प्रगत आविष्कार आणि यातील एक आश्चर्य म्हणजे वेरूळचे कैलास लेणे. याच शिल्पकलेचा एक आदिम आविष्कारही आपल्याला महाराष्ट्रातच कोकणात बघायला मिळतोय आणि तो म्हणजे कोकणात सापडलेली कातळावर रेखाटलेली ‘कातळशिल्पे’ कोकणातल्या या सडय़ावरल्या कातळावरच्या शिल्पांचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन त्यांचा इतिहास कथन केला आहे इतिहास संशोधक रवींद्र लाड यांनी आपल्या पहिल्याच ग्रंथात ज्याचे नाव आहे ‘‘कोकणातील कातळशिल्पे आणि सिंधू संस्कृती (इ.स.पूर्व 3000). लाड यांचे या विषयावरचे अनेक संशोधनपर लेख अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या वार्षिकातून आणि कोकण इतिहास परिषदेच्या त्रैमासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकातल्या कातळशिल्पावरच्या लेखांना एका सूत्रात गुंफून हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. अर्थात या रेखाचित्रासंबंधी माहिती प्रथम डॉ. दाऊद दळवी यांनी रत्नागिरी जवळच्या निवळी फाटय़ावरचे चित्र प्रकाशात आणून दिली.
कातळशिल्पांची माहिती देऊन लाड थांबलेले नाहीत. त्यांनी या शिल्पांच्या अनुषंगाने जगातील इतर संस्कृतींची माहिती देऊन या दोहोंमधले दुवे, साम्यस्थळे वाचकांसमोर मांडली आहेत. ही कातळशिल्पे, त्यावरील प्रतिमा रेखाटने यांचा संबंध सिंधू संस्कृतीशी आहे का हे शोधण्याच्या प्रयत्नात त्यांनी सुमेरियन मेसोपोटेमियन, इजिप्त संस्कृतीमधली साम्यस्थळे उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. कोकणातल्या कातळशिल्पांची; त्यांचा शोध घेतलेल्या संशोधकांची संक्षिप्त माहिती देऊन लाड यांनी विषय प्रवेश केला आहे. या शिल्पांची माहिती देणारे 6 लेख पुस्तकात आहेत. त्यांची नावे आहेत- 1) कोकणातील कातळशिल्पे, 2) देवगडमधील गिर्ये गावातील शिल्पे, 3) कोकणातील कातळशिल्पांचा साद्यंत अभ्यास, 4) कोकणात आतापर्यंत सापडलेल्या कातळशिल्पांची गावे, 5) राजापुरात सापडलेल्या कातळशिल्प चित्रांचा ठेवा, 6) लांजा तालुक्यातील प्राचीन कातळशिल्पांचा ठेवा खजिना.
या कातळशिल्पात वेळोवेळी रेखाटलेल्या स्त्री प्रतिमांचे मातृदेवतांशी, सात आसरांशी साम्य आहे असे लेखकाला वाटते. हाच धागा पकडून त्यांनी कोकणात तसेच इतरत्र पूजल्या जाणाऱया मातृदेवतांचा, त्यांच्यासाठी केल्या जाणाऱया क्रतांचा, विधींचा वाचकांना परिचय करून दिला आहे. मातृदेवतांना प्राचीन मातृसत्ताक संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व होते. या संस्कृतीचे अनेक अवशेष क्रते-विधींच्या रूपाने आजही अस्तित्वात आहेत. हे लेखक आपल्याला ‘‘मातृपूजनाच्या महाराष्ट्रातील परंपरा तसेच सात आसरांचे मातृत्व…’’ या लेखातून दाखवून देतात. या लेखात ‘लिंबलोण विधी, सीतेची न्हाणी, मासे यासंबंधी आपल्याला नव्याने समजते. या पुस्तकामुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या असे की, प्राचीन काळी मृत व्यक्तींना रानात. गिधाडे आणि मोर यांना त्या देहाचे मांस खायला मिळावे म्हणून टाकत असत मोर मांसभक्षी होते हे नव्याने समजले. गिधाडांमध्ये नर नसतात ही आणखी एक नवीन माहिती. या कातळशिल्पातील स्त्र्ााr प्रतिमा या नागवेष्टित आहेत, हा संदर्भ देऊन लेखक आपल्याला हिंदुस्थानातील प्राचीन नागसंस्कृती, तिचे मोहेंजोदरो येथील सिंधू संस्कृतीशी असलेले साम्य सांगतात आणि ही शिल्पे सिंधू संस्कृतीची समकालीन असावीत अथवा सिंधू संस्कृती लयाला गेल्यावर दशदिशांना पांगलेल्या स्थलांतरितांनी निर्माण केली असावीत असा एक ठाम निष्कर्ष काढतात, जो ग्रंथाच्या शीर्षकातच दिसून येतो.
या कातळशिल्पांचा कालखंड इ.स. पूर्व 3000 आहे, तसेच आर्यांच्या आक्रमणामुळे प्राचीन सिंधू आणि नागसंस्कृती लयाला गेल्या हे ग्रंथातले गृहितक हल्ली वादग्रस्त झाले आहे. अभ्यासकाला असे ठाम निष्कर्षाप्रत यायला मान्यताप्राप्त सबळ साधनांची, पुराव्यांची आवश्यकता लागते. या क्षेत्रात विचारांचे तसेच संशोधनांचे आदान-प्रदान महत्त्वाचे. या शिल्पांच्या अभ्यासातून कोकणातील अगदी पहिल्या मानवी वसाहतींचा वेध घेणे शक्य होणार आहे. या शिल्पांच्या जतनासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे.
कातळशिल्पांसंबंधी माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक आहे. मात्र यातील लेखांची मांडणी विस्कळीत वाटते. कोकणातील कातळशिल्पांवरील सर्व लेख एकत्र घेऊन मग त्यांचे इतर संस्कृतीशी तसेच मातृदेवतांच्या परंपरेशी असलेले साम्य उलगडून दाखवले असते तर विषय समजायला आणखी मदत झाली असती. या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील कातळशिल्पांचे सुबक फोटो.
कोकणातील कातळशिल्पे आणि सिंधू संस्कृती (इ.स.पूर्व 3000)
लेखक – रवींद्र लाड
पृष्ठ – 116, मूल्य -250 रुपये
संपर्क – पिठोरीमाया प्रकाशन
पृष्ठ – 116, मूल्य -250 रुपये
संपर्क – पिठोरीमाया प्रकाशन





























































