
>> सुधाकर वसईकर
मंदिरात देवाला मनोभावे प्रसाद, अन्नपदार्थ वाहिलेले असतात. मंदिराच्या त्याच गर्दीत फाटकीतुटकी, मळकट कपडे घातलेली, दारिद्रय़ाने पिचलेली लहान मुले रेंगाळत असतात. संधी मिळताच ते पदार्थ उचलून पळ काढतात आणि कुठेतरी लपून खातात. आपण त्यांना बघतो. थोडी कणव मनात उत्पन्न होते आणि लगेच पुढच्या कामाला लागतो, विसरतो. पण या मुलांवर अशी वेळ का येते, याचा साधा विचार मनाला शिवत नाही.
अशाच एका ‘इजू’चे आत्मचरित्र परिस पब्लिकेशन, पुणे यांनी कोरोनाकाळात प्रकाशित केलंय. जे आहे विजय वडवेराव यांचं. मनोगतापासून विजय वडवेराव यांचं आत्मकथन अक्षरशः मनाला हादरे देत अस्वस्थ करून सोडतं. 55 प्रकरणांत लेखकाच्या संघर्षमय जीवनातील घडलेले प्रसंग सुटसुटीतरीत्या मांडले असून, वास्तव प्रसंगाशयातून अनोख्या शैलीत काही तत्त्वे उजागर केली आहेत, जी अस्वस्थ तर करतात. मात्र मनोमन पटतात.
हाल-अपेष्टा, वेदना-दुःख, उपासमार, अवहेलना, कुचंबणा भोगत उभं आयुष्य काढलेला ‘इजू’ आपल्याला भेटतो तो त्याचं एक प्रांजळ आत्मचरित्र घेऊन. सुरुवातीला ज्यात झोपडपट्टीतील कमालीचे दारिद्रय़ आणि हलाखीचं जगणं सामोरं येत असलं तरी जसजसं लेखक या दारिद्रय़ाशी, दुःखाशी दोन हात करत, मोलमजुरी करत आकी, आबा, चार भावंडे आणि आजी इतक्या मोठय़ा कुटुंबाचं उदरभरण करतो. वेळप्रसंगी दारोदारी दुधाच्या पिशव्या, वर्तमान पेपर टाकून, कष्टमय आयुष्याचं गणित व्यवस्थित सोडवत एका यशस्वी जीवनाचा टप्पा गाठतो आणि अंतिम चरणात हे आत्मकथन संघर्षमय जगण्याच्या एका सुखात्म शेवटाकडे जाते.
बालवयात शाळेकडे आकर्षिलेला लेखक हलाखीच्या परिस्थितीत शिकण्यासाठी धडपड भयंकर आहे. एक भाकर चार भावंडात चार तुकडे करून खातात आणि संपूर्ण दिवस ढकलतात. कधी कधी तर भाकर कोरडीच खावी लागत असे. लेखकाचं हे कोवळं, कुपोषित, करपून जाणारं बालपण रडवून सोडतं इतकं हृदयद्रावक आहे.
लहानपणी व्हिडीओ सेंटरला जाऊन पिक्चर बघून मित्रांबरोबर वडापाव पार्टी करण्याच्या नादापायी, त्या रात्री आईच्या पिशवीतून अनायसे बाहेर पडलेल्या चुरगळलेल्या नोटा चोरून आपल्या दप्तरात ठेवण्याचा मोह इजूला आवरला जात नाही आणि सकाळी चोरी पकडली जाऊन आकी इजूला झोडपून काढते. चोरी करू नये अशी जन्माची अद्दल घडते. बालसुलभ वयात कायम उपासमार सोसावी लागत असते. तेव्हा इजू सणवाराला मंदिरात मुद्दाम अभ्यासाला जाण्याचं नाटक करून, दगडाच्या देवाला वाहिलेले हळदीकुंकूने माखलेले, मुंगळे चिकटलेले पेढे खाऊन आपली तसेच भावंडांची भूक शमवतो. तेव्हा इजूला हे दगडी देव माजूर्डे वाटतात. कारण मनोभावे दिलेलं नैवेद्य, अन्नपदार्थ ते खात नाहीत आणि भूक लागलेली असताना इजूला देवळात कुणी विचारत नाही की, काही खाल्लं का? आणि खायला देत नाहीत. त्या गोष्टीचा राग भयंकर येतो. मग त्याने केलेल्या चोरीबद्दल, चोरी करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल या सगळ्यांना जबाबदार ठरवून, यांच्यावर इजूच्या बाल न्यायालयात युगानुयुगे केस चालणार आहे. बालसुलभ वयात लेखकाला इतकी समज देणारं, हे साधंसरळ भाष्य करणारं आत्मकथन गवसलंय.
गरिबी माणसाला गुन्हेगारी जगताकडे घेऊन जाण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्याच वेळी योग्य संस्कार आणि शिस्त लावणारं वडिलधारी कुणी जवळ असेल, तर त्यातून चांगलं व्यक्तिमत्व घडतं. त्याचचं इजू हे एक प्रातिनिधिक बोलकं उदाहरण सांगता येईल.
झोपडपट्टीतील अशा हलाखीच्या परिस्थितीत ज्या व्यक्ती लेखकाला भेटल्या त्यांनी मदत गेली. मग ती मदत कशाही स्वरूपातली असो. स्वतःचा डबा खाऊ घालणाऱया लोकरे मॅडम, मित्र श्रीधर (श्रिया), रमेश बोराना, शाळेच्या गेटबाहेर फुकट पेरू, बोरं खाऊ घालणारी माणिकची आई, संगीत शिक्षणाची गोडी लावणारे शिक्षक कै. गोविंद भिलारे, गझलची ओढ निर्माण करणारा जिवलग मित्र विशाल बोरे यांचं यथोचित कथन करताना लेखक दिसतो. कारण उपासमारीच्या, हलाखीच्या आयुष्यात इजूला भेटलेली ही खरीखुरी माणसंच आयुष्यात दिशादर्शक ठरतात. म्हणूनच परिस्थितीला किंवा दैवाला दोष न देता अथवा कोणालाही जबाबदार न ठरवता एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जिणं कंठत असतो.
परिस्थिती बदलून लेखक शिक्षक होतो. त्याचप्रमाणे चार भावंडेही शिकून चांगल्या हुद्दय़ावर नोकरीला लागतात. रखरखीत वाळवंटातील वृक्षाला पालवी फुटू पाहाते. कष्टप्रद आयुष्यात आता थोडासा आराम, वेळ मिळालेला असतो. तेव्हा वैचारिकतेला चालना मिळून लेखक आपले छंद जोपासू पाहातो. तो लेखनाकडे वळतो. गाणं शिकतो. आयुष्यातले कटूगोड अनुभव. सोसलेलं आयुष्य सुरेख कवनात मांडू लागतो. असं हे चित्तथरारक आत्मकथन अचंबित करणारं आहे.





























































