बुस्टर डोस घेतला नाही, जिल्हाधिकाऱ्याने थांबवले 6 हजार कर्मचाऱ्यांचे पगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या वर्षभरापासून देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दोन डोस पूर्ण झालेल्यांना आता बूस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या आरोग्य सेवक आणि कोरोना योद्ध्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल, त्यांचे जानेवारी महिन्याचे पगार न देण्याचे आदेश दिले आहेत. यात जवळपास 6 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इंदूरचे जिल्हाधिकारी मनिष सिंग यांनी यापूर्वीही बूस्टर डोसबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला नसेल, त्यांचे पगार रोखण्यात येतील, असं सिंग यांनी बजावलं होतं. त्यानुसार त्यांचे पगार खरोखर रोखण्यात आले आहेत. यात ज्यांचा तिसऱ्या डोससाठीचा कालावधी अजून आला नसेल किंवा जे फ्रंटलाईन कर्मचारी नाहीत, अशांना त्यातून सूट देण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये 1678 पोलीस कर्मचारी, 1486 इंदूर मनपा कर्मचारी, 1289 इतर फोर्सेचे कर्मचारी, 742 आरोग्य कर्मचारी, 354 महसूल विभागाचे कर्मचारी, 178 पंचायत सदस्य, 46 न्यायालयीन कर्मचारी आणि 731 खासगी कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या बूस्टर डोसचे प्रमाणपत्र जोडल्यानंतरच त्यांचा जानेवारी महिन्यातला पगार देण्यात यावा, असे आदेश सिंग यांनी दिले आहेत.

या खेरीज सिंग यांनी खासगी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब आणि डायग्नॉसिस सेंटर्स यांना देखील नोटीस पाठवून कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घ्यावा, असे आदेश दिले आहेत. अन्यथा त्यांचे पगार रोखले जावेत, असे आदेश दिले आहेत.