
यंदाच्या जनगणनेच्या कामासाठी पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. जनगणना करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना ब्रेक लावला आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने तसे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.
केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडेल, तर 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व गणना केली जाईल. यादरम्यान सुमारे 2 लाख 64 हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना कामाशी संबंधित ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी शुक्रवारी यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या अर्धशासकीय पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने कर्मचारी, शिक्षकांच्या बदल्यांबाबत हा निर्णय घेतला आहे.
जनगणना कामाशी संबंधित ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन 2026 ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने बदल्या होतात, मात्र जनगणनेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत.
अशैक्षणिक कामांचा बोजा
शिक्षकांना जनगणनेच्या कामांना जुंपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आणि सुट्टय़ांच्या काळात शिक्षकांवर जनगणेचे काम सोपवल्यामुळे अध्यापनात अडथळे निर्माण होण्याची भीती आहे.


























































