मॉकड्रीलमध्ये अल्लाहू अकबरच्या घोषणा, धर्माची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी हल्ल्याचं मॉक ड्रील सुरू असताना दहशतवादी झालेल्या पोलिसांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचा प्रकार चंद्रपूर येथे उघडकीला आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना स्थानिक वकिलांनी तक्रार दिली आहे.

या तक्रारीनुसार, येथील महाकाली मंदिरात 11 जानेवारी दहशतवादी हल्ल्याचं मॉकड्रील करण्यात आलं होतं. या वेळी जे पोलीस दहशतवादी झाले होते, त्यांनी नारे तकबीर, अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. या घोषणांद्वारे असं दाखवण्यात आलं की, एका विशिष्ट धर्माचे अनुयायी हे दहशतवादी असतात. हे पोलिसांचे कृत्य संबंधित समाजाला बदनाम करणारे आणि इस्लाम हा दहशतवादी धर्म असल्याचा गैरसमज निर्माण करणारे आहे, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

जर अशीच भूमिका पोलिसांनी घेतली तर समाजात द्वेषाची भावना वाढीस लागेल. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होईल. राज्यघटनेत नमूद असलेल्या कर्तव्यांमध्ये सामाजिक बंधुत्व वाढीला लावणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत केली आहे. चंद्रपूर येथील पाच वकिलांनी ही तक्रार दाखल केली आहे.