सीआयएससीई बोर्डाचा निकाल जाहीर; यंदा मेरिट लिस्ट नाही; महाराष्ट्राचा दहावीचा 99.96 तर बारावीचा 99.71 टक्के निकाल

आयसीएसई (10) आणि आयएससी (12) बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. यंदा बोर्डाने स्पर्धा टाळण्यासाठी मेरिट लिस्ट जाहीर केलेली नाही. यंदाच्या निकालात महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून दहावीचा निकाल 99.96 आणि बारावीचा निकाल 99.71 टक्के इतका लागला आहे. देश आणि विदेशातील निकालावर प्रकाश टाकला असता दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने तर बारावीच्या निकालात दक्षिण विभागाने प्रथम स्थान पटकावले आहे.

आयसीएसईच्या परीक्षेत देश आणि विदेशातील 2695 शाळांनी सहभाग घेतला त्यातील 2223 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर बारावीच्या परीक्षेत 1366 शालांपैकी 904 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. एकूण 2,43,617 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी 242328 विद्यार्थी पास झाले. निकालाची टक्केवारी 99.47 आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 99901 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 98088 जण पास झाले असून निकालाची टक्केवारी 98.19 इतकी आहे. या दोन्ही परीक्षेत मुलांपेक्षा मुलींची कामगिरी चांगली आहे. दहावीत 99.65 टक्के मुली तर 99.31 टक्के मुले पास झालीत. बारावीत 98.92 टक्के मुली तर 97.53 टक्के मुले पास झालीत.

महाराष्ट्राची चमकदार कामगिरी

आयसीएसई, आयएससी दोन्ही निकालात महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली. राज्याचा दहावीचा निकाल 99.96 टक्के लागला. तर बारावीचा निकाल 99.71 टक्के लागला. राज्यातही मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी सरस आहे. दहावीत 99.99 टक्के मुली तर 99.94 टक्के मुले तसेच बारावीत 99.86 टक्के मुली तर 99.54 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. राज्यातून दहावीच्या परीक्षेला 28 हजार 588 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 28 हजार 577 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 15 हजार 415 मुले तर 13 हजार 162 मुली आहेत. एकूण 3840 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 3829 जण उत्तीर्ण झाले. यात 1735 मुले तर 2094 मुली आहेत. राज्यातून परीक्षा दिलेल्या एसटी, ओबीसी प्रवर्गाचा दहावीचा  निकाल 100 टक्के तर बारावीचा निकाल अनुक्रमे 95.83 टक्के आणि 98.38 टक्के लागला. तर एससी प्रवर्गचा दहावीचा निकाल 99.92 टक्के आणि बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची 60 विषयांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात 20 हिंदुस्थानी भाषा, 13 परदेशी तर 1 क्लासिकल भाषेचा समावेश आहे.

बारावीच्या विद्यार्थ्याची 47 विषयांची लेखी परीक्षा झाली. त्यात 12 हिंदुस्थानी भाषा, 4 परदेशी आणि 2 क्लासिकल भाषांचा समावेश होता.

नियमित अभ्यास हेच यशाचे रहस्य

स्वामी विवेकानंद इंटरनॅशल स्कूलचा विद्यार्थी ईशान अरोटे याला दहावीच्या परीक्षेत 97. 2 टक्के मिळाले आहेत. वर्षभर नियमित अभ्यास हेच त्याच्या यशामागील रहस्य आहे. परीक्षेवेळी त्याने दररोज
8 ते 9 तास अभ्यास केला. त्याने जेईई परीक्षा दिली असून पुढे त्याला आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.

ठाण्याचा रेहान सिंग देशात पहिला

बारावीच्या     आयएससी बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला असून या परीक्षेत ठाण्याचा रेहान सिंग हा हिंदुस्थानात पहिला आला आहे. रेहान हा ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेतील विद्यार्थी असून त्याने 400 गुणांपैकी 399 गुण मिळवून मानाचा तुरा रोवला आहे. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय रेहानने हे यश मिळवले आहे.

आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे रेहान याने सांगितले. रेहान सिंग याने 3 विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या विषयात 100 आणि सोशोलॉजी 99 आणि इकॉनॉमिक्स मध्ये 96 गुण मिळाले आहेत. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय सेल्फ स्टडीवर भर देत रेहानने हे यश मिळवले आहे. बारावीनंतर पुढे रेहान सीयूटीईची तयारी करीत असून त्याला दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊन पोलिटिकल सायन्स किंवा हिस्ट्री विषय त्याला घ्यायचा आहे.

रेहानला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचण्याची तसेच कविता व विविध विषयांवर लिखाण करण्याची आवड आहे. यूपीएसीच्या माध्यमातून भारतीय परराज्य सेवेद्वारे देशाची सेवा करणे हेच आपले स्वप्न आणि ध्येय असल्याचे त्याने सांगितले. रेहानची आई गृहिणी असून त्याचे वडील प्रसून सिंग एचएसडीसी बँकेत उच्च पदावर काम करीत आहेत.