
सामना प्रतिनिधी । लातूर
खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांचा पूर्वीचा भागीदार चंदनकुमार यानेच २० लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवली. विशेष म्हणजे चव्हाण कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी तो त्यांच्यासोबतच बसून होता. पोलिसांनी चंदनकुमार याच्यासह पाच जणांना या खूनप्रकरणी अटक केली आहे.
अविनाश चव्हाण यांचा पूर्वीचा भागीदार व कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक चंदनकुमार छोटेलाल शर्मा यानेच २० लाखांची सुपारी दिली होती. अविनाश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी खुन्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आज पाच जणांच्या अटकेची माहिती दिल्यानंतर साडेअकरा वाजता अविनाश चव्हाण यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला व अंत्यसंस्कार करण्यात आले.
या खून प्रकरणातील मास्टर माइंड कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक चंदनकुमार छोटेलाल शर्मा आहे. तो अविनाश चव्हाणचा या क्लासेसच्या धंद्यातील पूर्वीचा भागीदार होता. त्याने महेशचंद्र प्रभाकर गोगडे (रेड्डी) यांच्याशी संपर्क केला. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथील शरद सूर्यकांत घुमे याला तयार केले. घुमे याने करण चंद्रपालसिंग गहेरवार याच्यावर जबाबदारी सोपवली. त्याने अक्षय शेंडगे याला सोबत घेऊन त्यांच्या मोटारसायकलवर बसून अविनाश चव्हाण यांना रस्त्यात गाठले व त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. २० लाखांच्या सुपारीत ८ लाख ५० हजार रुपये त्यांना देण्यात आले होते. परळी येथील एका इराणी व्यक्तीकडून दीड लाख रुपयात एक पिस्तूल आणि १५ काडतुसे मिळवण्यात आली. पिस्तूलची ट्रायल अंबा साखर कारखान्याच्या परिसरात घेण्यात आली. शरद घुमे याच्या घरातून पोलिसांनी पिस्तूल, काडतुसे, मोटारसायकल आणि २ लाख ३१ हजार रुपये जप्त केले आहेत.
करण, निलंगेकर यांचा अंगरक्षक
अविनाश चव्हाण यांच्यावर गोळय़ा झाडणारा शार्पशूटर करण चंद्रपालसिंग गहेरवार हा भाजपाचे नेते तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा खासगी अंगरक्षक होता. या हत्याकांडात करणचे नाव येताच खळबळ उडाली. यासंदर्भात निलंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ‘नॉट रिचेबल’ होते. काही दिवसांपासून करण त्यांच्याकडे नसल्याचेही सांगण्यात आले.




























































