आसाममध्ये ढगफुटी; 37 जणांचा मृत्यू, 19 जिह्यांतील 4 लाख लोकांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये अक्षरशः ढगफुटी झाली असून मुसळधार पाऊस तसेच भूस्खलनामुळे आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाला. तर तब्बल 19 जिह्यांमधील जवळपास 4 लाख लोकांना महापुराचा फटका बसल्याचे वृत्त आहे. सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी 100 हून अधिक मदत छावण्या उभारल्या असून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री पोहोचवण्यासाठी 125 केंद्रे उभारण्यात आली आहेत.

अनेक ठिकाणी आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या. तर राष्ट्रीय महामार्ग 415 पाण्याखाली गेल्यामुळे अनेक वाहने फसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोठय़ा संख्येने पर्यटकही अडकून पडले आहेत. आसाममध्ये आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशातील 11 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्सूनदरम्यान देशाच्या विविध भागांत येणाऱ्या महापुराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली; परंतु त्यानंतरही अनेक राज्यांना पुराचा फटका बसला असून पाणी पुलाखालून वाहून गेल्यानंतर सरकार मदतीच्या उपाययोजना योजत असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत गृह, पाणी पुरवठा, नदी विकास, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण, रस्ते महामार्ग इत्यादी विभाग आणि त्यांचे सचिव तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी नागरिकांना महापुरापासून कशा पद्धतीने दिलासा देता येईल यावर चर्चा करण्यात आली. 

महाराष्ट्र, बिहार, झारखंड, गुजरात तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे. तर 27 जूनपर्यंत मान्सून दिल्ली, पंजाब आणि हरयाणामध्ये एण्ट्री करेल, तर 3 जुलैपर्यंत ही राज्ये पूर्णपणे व्यापेल असा अंदाज आहे. दरम्यान, पंजाब आणि दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.