
अभय मिरजकर । लातूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ठोकत सांगितले की, या मतदारसंघात काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसह महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लीकार्जुन खरगे आणि राहूल गांधी यांच्याकडेही केलेली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघ, औसा विधानसभा मतदारसंघ आणि निलंगा तालूक्यातील 65 गावांचा समावेश आहे. या भागाचे पुर्वी प्रतिनिधीत्व शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर येथे निलंगा, शिरुर अनंतपाळ आणि देवणी या भागातील 50 हजारापेक्षा अधिक नागरीक वास्तव्यास आहेत. या सर्वांना सोबत घेऊन लातूरसह जिल्ह्यातील बैठका आपण घेत असल्याचेही अशोक पाटील निलंगेकर यांनी सांगीतले. धाराशिव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली तर त्याचा लाभ महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण होईल असा दावाही यावेही करण्यात आला.





























































