ऐन निवडणुकीत दुर्दैवी घटना, काँग्रेसच्या बड्या नेत्याने जीवन संपवलं; कारण अद्याप अस्पष्ट

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस पक्षासाठी वाईट बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या भीलवाडा येथील मांजलगडचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते विवेक धाकड यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

काँग्रेस नेते विवेक धाकड यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. त्यांचे वडील कन्हैया लाल धाकड मॉर्निंग वॉकला गेले होते. ते घरी परतले तेव्हा विवेक धाकड खुर्चीवर बसलेले दिसले. पण त्यांच्या दोन्ही हात रक्तबंबाळ झाले होते. कन्हैया लाल यांनी तत्काळ त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विवेक धाकड यांच्या आत्महत्येच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सी. पी. जोशी यांची बुधवारी प्रचार रॅली झाली. या रॅलीत विवेक धाकड सहभागी झाले होते. सी. पी. जोशी यांनी अर्ज भरला त्यावेळी धाकडही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित होते. गुलाब वाटीत आयोजित केलेल्या सभेतही त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. रात्री उशीरापर्यंत ते सी. पी. जोशी यांच्यासोबत होते. आणि काँग्रेससाठी उत्साहाने प्रचार करत होते. मात्र, सकाळी उठताच त्यांनी आत्महत्या केली.

माजी आमदार विवेक धाकड हे काँग्रेसचे बडे नेते होते. 2019 मध्ये मांडलगड मतदारसंघातून विवेक धाकड हे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2013, 2018 आणि 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. वडील कन्हैयालाल धाकड यांची मतदारसंघात चांगली पकड आहे.